झाकिर नाईकविरुद्ध आणखी एक वॉरण्ट

0
98

मुंबई, २० एप्रिल 
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईस्थित विशेष न्यायालयाने दहशतवादाला प्रोत्साहन देणारा कथित मुस्लिम धर्मगुरू झाकिर नाईक याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरण्ट जारी केला आहे. एका दहशतवादाच्या प्रकरणात त्याच्या कथित सहभागाबद्दल एनआयएला चौकशी करायची आहे.
गेल्या वर्षी एनआयएने नाईकविरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. एनआयएने न्यायालयाला सांगितले की, या संदर्भात एनआयएनने झाकिर नाईकला तीन समन्स पाठवूनही तो हजर झाला नाही. त्याला भारतात परत आणण्यासाठी इंटरपोलची मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी अजामीनपात्र अटक वॉरण्ट काढण्याची आवश्यकता आहे.
गेल्याच आठवड्यात, मुंबईतील आणखी एका न्यायालयाने झाकिरविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरण्ट जारी केला होता. एका मनी लॉण्डरिंग प्रकरणात त्याच्याविरुद्ध सक्त वसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. सक्त वसुली संचालनालयाने सांगितले की, झाकिर नाईक सध्या संयुक्त अरब अमिरातीत लपलेला आहे.
गेल्या वर्षी ढाका येथे दहशतवादी हल्ला केलेल्या अतिरेक्यांनी, आम्ही झाकिर नाईकमुळे प्रेरित झालो, असा कबुलीजबाब दिल्यानंतर, होणारी अटक टाळण्यासाठी झाकिर भारत सोडून पळला आहे. ढाका हल्ल्यानंतर एनआयएनने झाकिर नाईक व त्याच्या इस्लामिक रीसर्च फाऊंडेशनच्या काही पदाधिकार्‍यांविरुद्ध भादंवि १५१ए अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  (वृत्तसंस्था)