पोलिसांनी रोखली आसूड यात्रा

0
147

– बच्चू कडूंसह शेकडो कार्यकर्ते ताब्यात
– आंदोलन चिरडण्याचा आरोप
नवापूर, २० एप्रिल
आसूड यात्रा घेऊन निघालेल्या आमदार बच्चू कडू यांना गुजरात पोलिसांनी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमारही केला.
महाराष्ट्र पोलिसांनी बच्चू कडू यांची आसूड यात्रा दुपारी बारा वाजता नवापूर सीमा तपासणी नाक्यावर रोखली होती. यानंतर गुजरातच्या वापी जिल्ह्याच्या उच्छाल तालुक्यातील गताडी येथून पोलिसांनी आसूड यात्रा रोखली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद झाला.
पोलिस बळाचा वापर करून आंदोलन चिरडू पाहत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तर, आमदार बच्चूू कडू यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले. गुजरातमधील काही लोकही आसूड यात्रेत सहभागी झाले. आमदार कडू यांना गुजरातच्या व्यारा पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. पाच पोलिस वाहनांतून गुजरात पोलिसांनी इतर आंदोलकांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेले आहे.
गुजरात पोलिस लाठीमार करीत असल्याचे चित्रीकरण पत्रकार करत असताना पोलिसांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. कॅमेरे ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. यापुढे गुजरात पोलिस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यात्रा अडविण्यासाठी दक्षिण गुजरात मधील सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. ३०० ते ४०० पोलिस ३० पोलिस अधिकरी व ५० वाहनांचा ताफा होता. यावेळी महाराष्ट्रातील पोलिस व अधिकारीही उपस्थित होते.  (वृत्तसंस्था)