इसिसच्या ५ दहशतवाद्यांसह चार अन्य संशयितांना अटक

0
44

ठाण्यातील तिघांचा समावेश
नवी दिल्ली, २० एप्रिल 
मुंबई, जालंधर आणि बिजनोरमधून इसिसच्या पाच दहशतवाद्यांसह चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिस आणि दिल्ली पोलिस यांच्यासह पाच राज्यांच्या विशेष पथकाने संयुक्त मोहीम राबवत आज ही यशस्वी कारवाई केली.
इराक, सीरियासह जगभरात आपल्या क्रूरकृत्यांनी दहशत निर्माण करणार्‍या इसिस या दहशतवादी संघटनेत भारतात हल्ला घडवण्यासाठी नवीन तरुणांची भरती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दिल्ली पोलिसांची विशेष शाखा, उत्तर प्रदेश पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक यांच्यासह पाच राज्यांच्या पोलिसांनी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
ठाण्यातील मुंब्रा भागातून नाजिम शमशाद अहमद नावाच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा रहिवासी आहे. मात्र २०१४ पासून तो मुंब्य्राच्या देवरी पाडा परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास होता. मुंब्य्रातूनच गुलफाम आणि उजैफा अबरार या आणखी दोन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. नाजिमचे घरमालक गावाला गेल्यामुळे उत्तर प्रदेशातूनच आलेले गुलफाम आणि उजैफा ५ एप्रिलपासून त्याच्या घरी राहायला आले. ते दोघे आपले नातेवाईक असल्याची माहिती नाजिमने शेजार्‍यांना दिली होती.
अटकेतील दहशतवादी घातपात घडवण्याचा कट रचत असून, काही तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाब आणि बिहारच्या पोलिसांच्या मदतीने ५ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या सर्व दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू आहे. बिजनोरमधील बरहापूर, पंजाबमधील जालंधर आणि मुंबईतून तीन दहशतवाद्यांना अटक झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इसिस या दहशतवादी संघटनेने मुंबईत २६/११ सारखा हल्ला घडवण्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. सागरी मार्गाने हे दहशतवादी मुंबईत प्रवेश करतील, असा इशाराही गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. (वृत्तसंस्था)