न्यूझीलंडमध्येही परदेशी कामगारांच्या रोजगारावर संकट

0
108

सरकारचा ‘किवीज फर्स्ट’चा नारा
वेलिंग्टन, २० एप्रिल
अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापाठोपाठ आता न्यूझीलंडमध्येही परदेशी कामगारांच्या रोजगारावर संकट आले आहे. न्यूझीलंडमधील नोकर्‍यांमध्येही स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी ‘किवीज फर्स्ट’ असा नारा या देशाने दिला आहे. परदेशी कामगारांचे प्रमाण कमी करण्यासाठी न्यूझीलंडने हा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंडचे इमिग्रेशन मंत्री मिशेल वूडहाऊस यांनी गुरुवारी सरकारी धोरणाची माहिती दिली. आपल्या देशातील कंपन्या बाहेरच्या देशांमधील कामगारांवर अवलंबून आहेत. पण, आता परदेशी तरुणांना नोकरी देणे कठीण आहे. त्यामुळे आता ‘न्यूझीलंड फर्स्ट’ या धोरणानुसार सर्वात जास्त कौशल्य असलेल्या परदेशी नागरिकांनाच व्हिसा दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. परदेशी कर्मचार्‍यांना न्यूझीलंडमध्ये काम करण्यास परवानगी देताना लावण्यात येणार्‍या निकषांची काठीण्यपातळी वाढवू, असे त्यांनी नमूद केले. नवीन निकषांमुळे न्यूझीलंडमध्ये येणार्‍या परदेशी कर्मचार्‍यांच्या संख्येला लगाम बसेल आणि उत्तम दर्जाचे कामगार आमच्याकडे उपलब्ध असतील, असे ते म्हणाले.
दरम्यान, बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा प्रणालीत सुधारणांवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानुसार सोडत पद्धतीने हा व्हिसा मिळविण्यास सर्वाधिक कुशल आणि उच्च वेतनमान असलेले कर्मचारीच पात्र ठरणार आहेत.
त्या बाजारपेठेत कार्यरत भारतीय आयटी कंपन्यांसाठी ही बाब खर्चात लक्षणीय वाढ करणारी ठरेल. तर दुसरीकडे ऑस्ट्रेेलियाने व्हिसा नियमात बदल केल्याने भारतीय तरुणांच्या रोजगारावर संकट आले होते.  (वृत्तसंस्था)