तेजबहादूर यादव बडतर्फीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार

0
63

नवी दिल्ली, २० एप्रिल
तेजबहादूर यादव यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे बीएसएफने जाहीर केल्यानंतर आपण या निर्णयाविरुद्ध न्यायालयात न्याय मागणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे.
बीएसएफच्या जवानांना अतिशय निष्कृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे त्यांनी व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर समोर आणले होते. बीएसएफवर कॉन्स्टेबल रँकच्या जवानाने खोटे आरोप केल्याचा अहवाल या प्रकरणातील चौकशी अधिकार्‍यांनी दिला. बीएसएफच्या नियमांचे उल्लंंघन करत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला. या निर्णयाच्या विरोधात अर्ज करण्यासाठी त्यांच्याकडे तीन महिन्यांचा कालावधी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तेजबहादूर यादव यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. सेवेतून मला बडतर्फ करण्यात आले आहे. मी याविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार आहे. मला न्याय मिळेल, अशी आशा आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्‍वास आहे. तुम्ही जेव्हा सत्य परिस्थिती समोर आणता तेव्हा हे घडते आणि गेली अनेक वर्षे असेच घडत आहे, असे म्हणत यादव यांनी आपल्यावरच्या कारवाईवर निराशा व्यक्त केली आहे. यादव यांनी यावर्षीच्या जानेवारीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. बीएसएफ जवानांना दिले जाणारे जेवण निष्कृष्ट दर्जाचे असते, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. (वृत्तसंस्था)