सुवर्णयुगासाठी पराकाष्ठा करा

0
70

छत्तीसगड प्रदेश भाजपा कार्यसमिती बैठकीत धरमलाल कौशिक
रायपूर, २० एप्रिल
भाजपा छत्तीसगड प्रदेश कार्यसमिती बैठक येथे प्रारंभ झाली. राष्ट्रीय सहसंघटनमंत्री सौदान सिंह, प्रदेशाध्यक्ष धरमलाल कौशिक, मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह, विष्णुदेव साय, राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पाण्डेय, प्रदेश संघटनमंत्री पवन साय यांनी दीपप्रज्वलन करून बैठकीचा शुभारंभ केला.
उपस्थितांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष धरमलाल कौशिक म्हणाले, केंद्र सरकारने मागासवर्ग आयोग स्थापन करून या वर्गातील लोकांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा आयोग गठित केल्याबद्दल धरमलाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. ओडिशा राज्यात पंचायतींच्या निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल कौशिक यांनी राष्ट्रीय सह संघटन मंत्री सौदानसिंह व मुख्यमंत्री रमणसिंह यांचेही अभिनंदन केले. छत्तीसगड राज्यात भाजपा चौथ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या दिशेने अग्रेसर आहे तसेच यासाठी प्रत्येक कार्यकर्ता झटून कामाला लागला आहे, असे ते म्हणाले.
४५ अंश सेल्सिअस तापमानाची पर्वा न करता, मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी जनतेच्या समस्यांच्या निवारणासाठी संपूर्ण राज्याचा दौरा केला आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ते अथक परिश्रम घेत आहेत, या शब्दात कौशिक यांनी मुख्यमंत्री रमणसिंह यांचा गौरव केला.
सुवर्णमय भाजपा व सुवर्णमय भारताच्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत, असे सांगून ते म्हणाले की, यासाठी आम्हाला अधिकाधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे.
मंत्री महेश गागडा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कार्यसमितीच्या प्रत्येक सदस्याने वृक्षारोपणाला प्रोत्साहित करावे. पंतप्रधानांनी एक व्यक्ती-एक वृक्ष, तसेच मुख्यमंत्र्यांनी, एक व्यक्ती-४ वृक्ष लावण्याचे आवाहन केले आहे. आपल्या वनखात्याची माहिती देत ते म्हणाले की, मानवाच्या प्रगतीसाठी जंगले आवश्यक आहेत.
वनौपज वस्तूंची खरेदी आधारभूत किमतीवर करणे तसेच मोफत मीठ व स्वस्त तांदळाची व्यवस्था केल्याने वनवासींची दलालांपासून सुटका झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या प्रसंगी, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राम विचार नेताम, प्रदेश सरचिटणीस गिरधर गुप्ता, डॉ. सुभाउराम कश्यप व पदाधिकारी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)