अबब! महालाचे विजेचे बिल ४ कोटीे!

0
144

अंकारा, २० एप्रिल
जगाच्या पाठीवर अनेक मोठे राजवाडे पाहायला मिळतात. काही राजवाड्यांचे आता हॉटेलांमध्ये रूपांतर झाले असले तरी काही राजवाडे अद्यापही आपला बाज कायम ठेवून आहेत. त्यामध्ये शाही कुटुंब अद्यापही राहतात. इंग्लंडचा बकिंगहॅम पॅलेस हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे. काही ठिकाणी आधुनिक काळात प्रासादतुल्य शासकीय निवासस्थानेही बांधण्यात आली. तुर्कीमध्येही असाच एक भव्य राजवाडा आहे. या राजवाड्यात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तय्यप अदरेआन राहतात. चार हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या पॅलेसच्या देखभालीसाठीही बराच खर्च येतो. त्याचे विजेचे बिलच चार कोटी रुपयांचे असते!
तुर्कीत राष्ट्राध्यक्षांचे शासन आणण्याबाबत करण्यात आलेल्या एका जनमत चाचणीत राष्ट्राध्यक्ष रेचेप यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सुमारे ९९.४५ टक्के मतांपैकी ५१.३७ टक्के लोकांनी त्यांच्या बाजूने मते दिली. तय्यप हे तुर्कीमधील लोकप्रिय नेते आहेत. शिवाय ते त्यांच्या शाही थाटाच्या जीवनाबाबतही ओळखले जातात. ते जगातील सर्वात मोठ्या राजवाड्यात राहतात. अक-सराय नावाचा हा पॅलेस अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपेक्षा तीस पटीने अधिक मोठा आहे. या पॅलेसमध्ये ११०० खोल्या असून त्यापैकी २५० खोल्या केवळ राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आहेत. (वृत्तसंस्था)