महिला न्यायाधीश करते काळा झगा काढून योगासने

0
189

न्यूयॉर्क, २० एप्रिल 
न्यायालयाचे कामकाज सांभाळून अमेरिकेतील एक महिला न्यायाधीश लोकांना योगासनांचे धडे देत आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी ही न्यायाधीश न्यायालयाबाहेरच्या हिरवळीवर योगासने करते.
डुवाल काऊंटीच्या जज एलेनी डर्की या जॅक्सनव्हिला येथील आपल्या न्यायालयात योगासने करतात. या आसनांचे धडे घेण्याची इच्छा ज्यांना असते अशा व्यक्तींसाठी किंवा न्यायालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे धडे मोफत असतात. डर्की या २०१४ पासून हे धडे देत असून, आतापर्यंत त्यांनी ७०० तासांची शिकवणी पूर्ण केली आहे. त्याकरिता न्यायालयातील कर्मचारी त्यांची टिंगलही करतात. मात्र, त्या आपल्या मतावर ठाम आहेत.
अत्यंत तणावपूर्ण जीवनात योगामुळे काही क्षण का होईना शांती मिळते, असे त्या म्हणतात. काही काही वेळेस खटल्याच्या सुनावणीदरम्यानही त्या वकिलांना ताणमुक्त होऊन दीर्घ श्‍वसन करण्याचा सल्ला देतात.
लोकांना हे करण्यासाठी तयार करणे आणि ते त्यांच्यासाठी चांगले असते, हे समजावणे अत्यंत कठीण असते, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या धड्यांच्या दिवशी एलेना योगासने करण्यास अनुकूल कपडे परिधान करूनच येतात. जेणेकरून त्यांना काळा कोट काढून थेट योगासने करता येतील. पचनसंस्थेचा आजार झाल्यानंतर एका नातेवाईकाच्या सल्ल्यावरून त्यांनी योगासने करणे सुरू केले. आता हा आजार नाहीसा होण्याच्या बेतात असल्याचे त्या सांगतात. (वृत्तसंस्था)