महिलांना संधी हवी ः साक्षी मलिक

0
97

टोकिओ ऑलिम्पिकचे सुवर्ण हेच लक्ष्य
हरिद्वार, २० एप्रिल 
कोणत्याही क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा कमी नाही. उत्तराखंडमध्येही महिला बर्‍याच प्रतिभावान आहेत, परंतु संधीचा अभाव असल्यामुळे पुढे येत नाही. जर सरकारने इच्छाशक्ती दाखवून महिलांना संधी दिली, तर भारताला प्रत्येक खेळात अव्वल स्थानावर पोहोचवू शकते, असे मत पद्मश्री महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने व्यक्त केले.
रिओ ऑलिम्पिकचे कांस्यपदक विजेती साक्षी मलिक मंगळवारी उशिरा रात्री हरिपूर कला येथे आपला दीर वीर पहेलवान यांच्या निवासस्थानी आली होती. पती सत्यव्रत व अन्य नातेवाईकांसोबत ती हरिपूर कलामध्ये दाखल झाली होती. त्या प्रसंगी ती प्रसारमाध्यमांशी बोलत होती. ती म्हणाली, आता २०२० टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे हेच माझे लक्ष्य असून, त्याकरिता तयारीला लागली आहे. पुरुष पहेलवानांप्रमाणे महिला पहेलवानांनासुद्धा समान सन्मान द्यायला पाहिजे. कारण महिला कुस्तीपटूसुद्धा पुरुष कुस्तीपटूंप्रमाणे मेहनत करतात.
पद्मश्री माझे सौभाग्य
अलीकडेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्याबाबत बोलताना साक्षी म्हणाली की, पद्मश्री मिळणे हे माझे सौभाग्य आहे. महिलांना सरकारकडून अशा तर्‍हेचा सन्मान देऊन त्यांचे मनोधैर्य अधिक वाढवायला पाहिजे. जेव्हा कुणी महिला देशासाठी काही चांगले कार्य करते, तेव्हा सरकारनेसुद्धा त्यांच्यासाठी असा गौरव करायला पाहिजे, जेणेकरून त्यांनी केलेले परिश्रम, त्याग व्यर्थ ठरणार नाही.
कांस्यपदक जिंकणे ऐतिहासिक क्षण
२०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने ५८ किलो वजनगटात फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. साक्षीने रेपेचेजच्या अंतिम सामन्यात किर्गीस्तानची पहेलवान एसुलू तिनिवेकोव्हाला मात देऊन रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. हा क्षण माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण होता, असे ती म्हणाली. (वृत्तसंस्था)