आवड-निवड

0
59

चिंतन
आवड आणि निवड या दोन शब्दांचं इतकं घट्ट नातं आहे की, बहुतेक वेळी प्रत्येकाच्या तोंडून हे दोन्ही शब्द एकाच वेळी बाहेर पडतात. म्हणजे दोन जुळी बाळं असावी ना अगदी तसेच नाते या दोन शब्दांचे एकमेकांशी आहे. मात्र या दोघांच्याही अर्थामध्ये साम्यता नाही. दोघांची आपली वेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि तरीही ती एकमेकांना पूरक आहेत. दोन भिन्न अर्थाच्या शब्दांची एकमेकांशी असलेली मैत्री म्हणजे दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तिमत्त्वाची एकमेकांसोबतच्या मैत्रीसारखीच. म्हणजे असे की, आपल्याला आवडलेलं आपण निवडतो आणि जे निवडतो ते केवळ आवडलं असतं.
आपल्या प्रत्येकाला आवडीचं स्वातंत्र्य असतं. आपल्यातला प्रत्येकच जण आपली आवड सांभाळण्यासाठी प्रयत्न करीत असतो आणि त्याप्रमाणे वागत असतो, त्यासाठी जगतही असतो. आपल्या आवडीचं आपल्याला कौतुक असते; परंतु आपल्याला जे आवडलं ते निवडण्याचं स्वातंत्र्य असतेच असं नसतं. जे आवडलेलं असतं ते निवडण्याचं कधी आपल्या हातात नसतं तर कधी कधी नशिबातही नसतं. कधी कधी आपल्याला आवडलं म्हणून जे निवडलेलं असतं ते आपल्याला शेवटपर्यंत आवडत राहीलच असंही नसतं. व्यक्तिपरत्वे आवड आणि निवड बदलत असतात. कालपरत्वे, वयानुसार आणि परिस्थितीनुसार प्रत्येकाच्या आवडी आणि निवडीमध्ये बदलही होत असतो. कधी बदल करावा लागतो तर कधी होणारा बदल मान्य करून घ्यावा लागतो.
आवड आणि निवडीची प्रक्रिया सुरू होते ती आपल्या प्रत्येकाच्या बाल्यावस्थेतील समज आलेल्या वयापासून. बालकाला आवडलेल्या वस्तूकडे किंवा खेळण्याकडे तो आकर्षिला जातो आणि त्या आजूबाजूला पडलेल्या इतर वस्तूंमधून किंवा खेळण्यांमधून तो त्या आवडलेल्याची निवड करीत असतो. या आवडीने निवडलेले हातात मिळविण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होतात आणि ते प्राप्त झाले की त्याच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहू लागतो. काही कारणाने ते प्राप्त झाले नाही तर त्याची चिडचिड सुरू होते आणि संयम संपला की बालक भोकांड पसरतं आणि त्याद्वारे ते मिळविण्याचा प्रयत्न करतो.
मनुष्य स्वभावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे विविध गोष्टींची आवड त्याच्या मनात निर्माण होत असते. खाण्या-पिण्याची, बघण्याची, अनुभवाची, वस्तूची एवढेच नव्हे तर प्राणी, वनस्पती आणि व्यक्तींचीही आवड त्याला असते आणि त्यातलं योग्य वाटणारं तो निवडत असतो. ते प्राप्त करण्याची त्याची धडपड सुरू असते. काही ते निवडलेले प्राप्त करण्यासाठी संयम राखतात तर काही मात्र ते कुठल्याही मार्गाने त्वरित मिळवतात.
आपल्या प्रत्येकाला आपल्या आवडीची आणि निवडीची इच्छा पूर्ण होते असं नाही घडत. अशा वेळी प्रत्येकाच्या मनात साहजिकच निराशेची भावना निर्माण होते. या निराशेच्या भावनेचा अतिरेक होऊन कधी कधी व्यक्ती आत्महत्येचा मार्ग निवडताना आढळतात. अशा वेळी मनावर संयम ठेवण्याची गरज असते. प्रत्येक आवडीचे निवडलेले हे केवळ आपलेच व्हावे यासाठी अनेक वेळी गुन्हेदेखील घडतात आणि त्याचे अतिशय घृणास्पद स्वरूपही आपल्याला समाजातील अशा विकृत माणसांच्या कृतीतून दिसून येते. जी गोष्ट आवडली तरीही आपली होऊ शकत नाही म्हणून त्याची निवड टाळून जे केवळ आपल्या प्रयत्नातून साध्य होणार असेल अशा गोष्टीची निवड करणे कधीही योग्य ठरते. आवडलेल्या आणि निवडलेल्या परंतु अप्राप्त अशा गोष्टीला आपल्या मनातून काढून टाकले तर आपल्या मनावरील दडपण किंवा मनातील दु:ख आपण स्वत:च दूर करू शकतो.
आपल्याला आवडलेलं आणि आपण निवडलेलं साध्य करण्यासाठी प्रथम ते योग्य असावयास हवे. त्यापासून इतरांचे नुकसान होणार नाही तर आपल्याप्रमाणे इतरांनाही त्याचा लाभ होईल त्याचीच निवड आपण करायला हवी. आवडलेले आणि निवडलेले प्राप्त करण्यासाठीचे आपले प्रयत्न हे प्रामाणिक असावयास हवे. एवढेच नव्हे, तर आवडलेलं प्राप्त झाल्यावर त्याचा अहंकारही आपल्याला व्हायला नको. आपल्या आवडलेल्या आणि निवडलेल्याच्या लक्ष्यप्राप्तीमध्ये केवळ आपलाच प्रयत्न असतो असे नाही तर त्यासाठी अनेक हात, अनेक आचार, अनेक विचार, अनेक इच्छा, अनेक शुभेच्छा, अनेक संवाद आणि अनेकांचे आशीर्वादही महत्त्वाचे ठरत असतात. ही भावना कायम आपल्या मनात ठेवा. हे समजून घेतले की ती आवड, तिची निवड आणि तिची प्राप्ती हे सारे आयुष्यातील समाधानाचा कळस गाठत असते. काहींची आवड आणि निवड मात्र केवळ आवड निवड कशाची उरली, जठराग्नीची तृप्ती केली एवढीशीच असते.
मधुसूदन (मदन) पुराणिक
९४२००५४४४४