आम्ही चालवू हा पुढे वारसा…

0
80

स्मरण
महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजेच अण्णा हे लोकोत्तर पुरुष होते. एक ध्येय समोर ठेवून ध्येयसिद्धी प्राप्त होईपर्यंत अथक अविरत परिश्रम करणे आणि एकदा का काम मार्गी लागले की, पुन्हा तशाच नवीन उत्तुंग ध्येयाची कामना करून पुन्हा त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नरत होणे, ही महर्षी कर्वे म्हणजेच अण्णांची जीवनसाधना! आपण स्वीकारलेला मार्ग खाचखळगे आणि काट्यांनी भरलेला आहे, हे माहीत असूनही किंबहुना असाच मार्ग निवडून त्यावर सतत मार्गक्रमण करणारे अनेक महात्मे या भारतात होऊन गेलेत. अशा लोकोत्तर पुरुषांच्या माळेतील अग्रणी ‘भारतरत्न’ महर्षी धोंडो केशव कर्वे! १०४ वर्षांचे तप:पूत आणि कृतार्थ जीवन जगणारे अण्णा.
प्रथम घर सुधारू : कोणत्याही लोकोत्तर कार्याची सुरुवात दुसर्‍यास उपदेश देऊन होत नसते, तर स्वत:चा आदर्श समाजापुढे घालून द्यावा लागतो. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार अण्णांनी स्वत: विधवा पुनर्विवाह करून दाखविला आणि कदाचित म्हणूनच समाजाने त्यांच्या कार्यास मान्यता मिळवून दिली असावी. ते म्हणत- ‘‘प्रथम घर सुधारू, म्हणजे मग समाज सुधारेल, मग त्याची आच आपोआपच लागेल. आपली विचारधारा वाढेल. देशभरात बदल दिसू लागेल.’’
स्थितप्रज्ञ अण्णा : जीवनात सर्वच कसोटीच्या प्रसंगी अण्णा धीरोदात्त वृत्तीने सामोरे गेल्याचे बघायला मिळते. आपल्या प्रिय पुत्राच्या वियोगाची वा महिला विद्यापीठाचे आर्थिक अनुदान थांबवण्याची आलेली बातमी असो, प्रसंगी अण्णा एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे निर्णय घेत. निर्भेळ आनंद वा निर्भेळ दु:ख या गोष्टी जीवनात तशा दुर्लभच. अशाच वेळी कार्यकर्त्याची कसोटी असते आणि अण्णा अशा प्रत्येक प्रसंगांना सहज तोंड देत असत. अण्णा, मानमरातब मिळाल्याने कधी सुखावले नाहीत वा त्यांना दु:खाने विकल झालेलेही कुणी बघितले नाही.
अविरत श्रमणे : इतकी महान कार्ये उभी करणारा हा महापुरुष, मात्र लोकेषणा, वित्तेषणापासून सदैव दूरच! माझे काम एखाद्या टिटवीने अथांग समुद्र रिकामा करण्याचे धाडस दाखविण्यासारखे आहे, असे अण्णा म्हणत. समता-संघाची स्थापना करताना वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचा कामाचा उरक आणि उत्साह अगदी १८९३ च्या वेळेसचा विधवा विवाहोत्तेजक मंडळी स्थापना करतानाचा किंवा अनाथबालिकाश्रमाची सुरुवात करतानाचा (१८९६). महिला विद्यालय आणि निष्काम-कर्म-मठ (१९०७, १९०८) किंवा १९१६ मधील महिला विद्यापीठ स्थापनेच्या वेेळेसचा जसा होता, अगदी तसाच किंबहुना काकणभर जास्तच असावा.
पाथेय : अण्णांनी स्वत: उभ्या केलेल्या कार्याबद्दलचे मनोगत व्यक्त केले ते असे- ‘‘हे कल्पनासृष्टीतले राज्य जडसृष्टीत दिसणे अत्यंत कठीण तर खरेच, पण केवळ अशक्य कोटीतले नव्हे! मात्र, चालकांचा उत्साह आणि लोकांचा विश्‍वासही वाढत गेला पाहिजे. मतभेद तर सर्वत्र असावयाचेच. पण त्यांच्या मुळाशी व्यक्तिविषयक भावना नसून राष्ट्रीय भावना असली पाहिजे. म्हणजे मग ते आपल्या सद्बुद्धीने चालविलेल्या प्रयत्नांच्या आड येणार नाहीत. हल्लीचा काळ संघशक्तीचा आहे. या कामाविषयी देेशबांधवांमध्ये प्रेम उत्पन्न झाल्यास आणि त्यास अल्पसे दृश्यस्वरूप मिळाल्यास एकच काय, पण अनेक स्थळी कार्य उभे राहून ती भारताच्या राष्ट्रीय जीवनाचे केंद्र बनतील. गरज आपल्या घोर निद्रेतून खडबडून जागे होऊन कार्याचा विचार करण्याची आहे.’’ ‘‘माझ्या मनाने पसंत केलेल्या या राष्ट्रीय उद्योगासाठी माझ्या जिवात जीव आहे, तोपर्यंत परमात्म्याने मला काम करण्याची बुद्धी व सवड द्यावी, एवढेच त्याच्याजवळ माझे मागणे आहे. माझ्या कल्पनेतील चित्र या जन्मीच पाहण्याचे भाग्य मला लाभो. अन्यथा पुनर्जन्माच्या कल्पनेप्रमाणे जीवात्म्याने पुन्हा नवशरीर धारण करून प्रारब्धकर्म पूर्ण करावे व मगच परमात्मस्वरूप लीन व्हावे, एवढीच माझी इच्छा आहे.’’
एष: पंथा: : आज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कर्वेंच्या पुण्याईवर अवघ्या महाराष्ट्रात त्यांच्या कल्पनासृष्टीतील चित्रास खरोखरच मूर्त रूप देताना दिसतात. जवळपास २५,००० विद्यार्थिनी संस्थेच्या ६२ शिक्षण प्रकल्पांमधून शिक्षण घेत आहेत. हा ज्ञानयज्ञ विगत १२० वर्षांपासून ‘शिक्षणाद्वारे महिला सबलीकरण’ हे ब्रीद घेऊन अव्याहत सुरूच आहे आणि वृद्धिंगत होतो आहे. त्यांच्याच प्रेरणेने महाराष्ट्राच्या उपराजधानीत नागपुरात गत अनेक वर्षांपासून त्यांचे कार्य कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालयाद्वारे सुरू आहे. कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय आज विदर्भातील एक अग्रगण्य असे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून ओळखले जाते ते कर्वेंच्या विचारांवर चालल्यामुळेच!
उजाळून देऊ दिशा दाही दाही : हे युगद्रष्टा, आपल्या १५९ व्या जन्मदिनी आम्हा सर्वांचा आपणांस दंडवत! तुमचे कार्य तुम्ही ‘याचि देही याचि डोळा’ पूर्णत्वास नेलेत. तुमचीच परंपरा पुढे नेत आता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झालाय्, नव्हे, साक्षात कल्पवृक्ष झालाय्. संस्थेसोबत जोडले गेलेले आम्ही सर्व भाग्यवंत तुमचा हा वसा असाच पुढे चालवीत राहू, असा दृढ विश्‍वास व्यक्त करतो. एका शिक्षिकेच्या या समर्पक ओळी…
‘‘केलेस त्वां, तप खडतर बनविण्यास, स्त्री-जीवन निर्भर
त्यातील बनावे, मी एक ‘कर’ द्यावा आशीष, हे मुनीवर!’’
– प्रा. योगेश वसंत दांडेकर
नागपूर