उन्हाळी सुट्यांचा आस्वाद घ्या!

0
87

बालपण
शाळा आणि कॉन्व्हेंटला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की उन्हाळी शिबिर, हॉबी क्लासेस यांचा भडिमार लहान मुलांवर होत असतो. हे नित्याचेच प्रकार झाले आहेत. कुणाचा स्विमिंग शिकण्याकडे तर कुणाचा विविध खेळ, कलागुण शिकण्याकडे कल असतो. यामुळे क्लासवाल्यांची चांदी असते. मुलांच्या पालकांनासुद्धा मुले भर उन्हातानात खेळत राहण्यापेक्षा कुठेतरी गुंतून राहिलेली बरी असे वाटत असते. वर्षभर शिक्षणाच्या ओझ्याखाली मुले दबून असतात. जेव्हा पहावे तेव्हा मुलांच्या पाठीवर अभ्यासाचे ओझे टांगलेले असल्याने मुलांना आपले मन मोकळे करण्यासाठी वेळ नसतो. मुले वर्ग शिक्षकांच्या, मुख्याध्यापकांच्या दबावाखाली वावरत असतात. रटाळ पुस्तकी अभ्यासांचा मुलांना कंटाळा आलेला असतो. यात आता डिजिटल तंत्रज्ञानाने भर घातली असून, सरकारी शाळासुद्धा डिजिटल तंत्रज्ञानाने अद्ययावत होत आहेत. मास्तरांची डोकी जरी जुनी असली तरी नवीन तंत्रज्ञानाची भर घालून इंग्रजी शाळांची कॉपी मारण्यात धन्यता मानणारे राज्यकर्ते व अधिकारी यांनी स्वत:चे डोके न वापरता मराठी शाळांची वाट लावल्याने ग्रामीण भागातील शाळेमधील मुलांचे शिक्षणाचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत आहे. ही गंभीर बाब असतानासुद्धा इंग्रजी शाळेचे मानगुटीवर बसलेले भूत उतरविण्यात शासन कुठेतरी कमी पडते आहे. याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आज आपल्यावर आलेली आहे. आपला देश हा कृषिप्रधान देश असताना शेतीशी निगडित अभ्यासक्रमाची गरज आजही प्रकर्षाने जाणवते आहे; परंतु याकडे दुर्लक्ष करून आपण शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतो आहे. याकडे सरकारचे, समाजाचे आणि राज्यकर्त्यांचे लक्ष का आकर्षिले जात नाही हे न उलगडणारे कोडे आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यकर्त्यांना जागे करणे हे जनतेचे काम आहे. राज्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षातील नेत्यांना खदाखदा हलवून झोपेतून उठविणे भाग झाले आहे. त्यांच्या झोपेभरल्या तोंडावर पाणी मारून जागविणे गरजेचे झाले आहे.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो हे दूध पितो तो वाघिणीसारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेले सत्य आचरणात आणणे राज्यकर्त्यांना शक्य झालेले नाही. मातृभाषेतून शिकवले गेलेले शिक्षण हे काळजास जाऊन भिडते. याची माहिती असतानासुद्धा इंग्रजी शाळेतील शिक्षणाचा आग्रह का धरला जातो याचा विचार होताना दिसून येत नाही. पालक वर्गसुद्धा याबाबत विशेष आग्रही नाही ही दु:खाची बाब आहे. मुलांना इंग्रजी भाषेत शिकविण्याच्या अट्टहासापायी मुलांची भावनिक कुचंबणाही होते आहे. मुले आपली मते शिक्षकांजवळ खुलेपणाने व्यक्त करू शकत नसल्याने मुलांचा भावनिक विकास कुठेतरी कुंठीत होतो आहे. यामुळे मुले ही निर्धास्त, कुणाचेही न ऐकणारी, आपल्याच मनाने निर्णय घेणारी, पालकवर्गाला अंधारात ठेवून विविध कारणाने पैसे उकळणारी आणि पॉकीट मनीच्या नावाने पालकवर्गाकडून पैसे प्राप्त करून मौजमजा, दंगामस्ती करून पालकांच्या खिशाला चुना लावणारी निघत आहेत. पालकांनी शिक्षणाकरिता दिलेले पैसे हे सांभाळून खर्च करायचे असतात, याचे भान ठेवून वागणे आज गरजेचे वाटत नाही. जी गरीब घरची मुले याचे भान ठेवून वागतात तीच मुले अभ्यासात पुढे गेल्याची कितीतरी उदाहरणे सांगता येतील. स्पर्धा परीक्षेत त्यांचेच वर्चस्व दिसून येते आहे. ही चांगली बाब आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मुले स्पर्धा परीक्षेत मागे पडलेली आढळून येतात. तरीसुद्धा पालकवर्गाचे इंग्रजी प्रेम कमी होताना आढळून येत नाही. सुट्या लागल्या की, शिकवणी वर्गांचा बोजा मुलांवर टाकण्यात येतो. अगदी पाचवीपासून शिकवणी लावण्यात येते. तो मुलगा तणावमुक्तपणे खेळणार केव्हा? त्याच्या शरीराला काही आराम मिळू देणार की नाही?
मुलांच्या बुद्धीवरील ताण कमी करण्यासाठी आणि त्यांची शरीरयष्टी सुदृढ होण्यासाठी विशेष परिश्रम घेणे आवश्यक आहे. जे आज स्वच्छतेच्या नावाखाली होताना आढळून येत नाही. मुलांना खेळताना मार लागणार नाही, मुले आजारी पडणार नाहीत याची विशेष काळजी घेतली जात असल्याने मुले नाजूक होत आहेत. केंद्र व राज्य सरकारचा नुसता शिक्षणावर भर असल्याने मुलांच्या बौद्धिक प्रगतीकडेच लक्ष दिले जात आहे. मुलांची सर्वांगीण प्रगती होत नसल्याने व मुले लाडात वाढवली जात असल्याने आईवडिलांच्या प्रेमाच्या ओझ्याखाली त्यांचे खेळकर बालपण हे संकटात सापडले आहे. बाहेर उन्हात जाणे कठीण झाल्याने घरच्या घरी सोंगट्या, पत्ते, कॅरम, बुद्धिबळ इत्यादी खेळणे व अवांतर वाचन करणे अपेक्षित असताना मोबाईलवरचे गेम खेळणे मुले जास्त पसंत करताना आढळून येतात. यामुळे ज्ञानात कोणतीही भर न पडता सतत मोबाईलवर लक्ष केंद्रित केल्याने डोळ्यांच्या विकारात वाढ होते आहे.
आज आमराई ही कालबाह्य झाली असल्याने, गावठी आंबे टोपल्यांनी खायला मिळत नाहीत. पूर्वीच्या काळी वटवृक्षांच्या पारंब्यांना पकडून झोके घेण्याचा आनंद आता इतिहासजमा झाला आहे. फक्त खेड्यातील मुलांनाच हा आनंद उपभोगता येतो. त्यामुळे व्यायामासह उंची वाढते, हेही आपण विसरलो. कुलर, एसी याचा वापर घराघरांत वाढल्यामुळे उन्हात बाहेर निघणे आणि उन्हाचे चटके सहन करणे ही बाब शहरांत तरी दुर्मिळ होत चालली आहे. ग्रामीण भागातसुद्धा मातीची घरे कालबाह्य झाल्याने सिमेंटची घरे ही उष्णता निर्माण करीत आहेत. उन्हाळ्यात थंड अन् हिवाळ्यात गरम राहणारी मातीची घरे ध्वस्त झाल्याने कॉंक्रीटची घरे उष्णतामानात भर घालीत आहेत. पाण्याचे माठ, रांजण यातील पाणी पिल्यानेच गळ्याची खरी तहान ही भागत असते. नैसर्गिक जीवनाचा आस्वाद घेणे हीसुद्धा एक कला आहे. ती आत्मसात करण्यातच जीवनाचे खरे रहस्य दडलेले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात हे समजून घेऊन वागणेच स्वहिताचे ठरणारे आहे. ग्रामीण भागातील वास्तव हे वेगळेच आहे. ना तिथे स्विमिंग क्लास आहे, ना खेळण्याचे मैदान आहे, ना नॉलेज हब आहेत. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांचा ओढा हा शहराकडे झुकत आहे. शेतीतील दाहकता ही भीषण आहे. शेतीत काम करणे कमीपणाचे, अशिक्षितपणाचे लक्षण समजले जाते. शेतीला पूर्वीचे भरभराटीचे दिवस प्राप्त व्हावेत, अशी सरकारची मनीषा नसल्याने प्राथमिक स्तरावरील शिक्षण शेतीशी निगडित असावे असे सरकारला वाटत नाही. शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी सरकारचे धोरण काय असावे याचा उलगडा होत नाही. उन्हाळी सुट्यांमध्ये तरी ग्रामीण भागातील भटकंतीला वाव देऊन ग्रामीण जनतेचे प्रश्‍न, जंगलाचे वास्तव, पक्ष्यांची दिनचर्या, भौगोलिक परिस्थिती, नदी-नाले व पहाडी सौंदर्य याचा अभ्यास करून मनुष्याच्या जीवनातील त्याचे स्थान समजून घेणे आवश्यक आहे. शेतमळे, पानमळे, उसाची लागवड, केळी व फळांची बागायत, पशुपक्षी निरीक्षण, शेती व जंगलाची ओळख करून घेऊन, शेतीमधील मनुष्यबळाचे महत्त्व समजून घेऊन, यात काही तांत्रिक सुधारणा करून शेतीमध्ये आवड असलेल्यांची फौज निर्माण करणे क्रमप्राप्त झाले आहे. जय जवान, जय किसान हे देशाचे आधारस्तंभ आहेत. याची जाणीव ठेवून शेतीत प्रत्यक्ष राबणार्‍या शेतकर्‍यांना जवानांचा दर्जा देऊन जवानांना असणार्‍या सोयी-सुविधा शेतकर्‍यांनासुद्धा पुरवाव्या, अशी रास्त मागणी करण्यास काहीही हरकत नसावी असे वाटते. उन्हाळी सुट्यांचा आस्वाद घेण्यासाठी आणि मानवी जीवनातील आनंदाचे क्षण टिपण्यासाठी विविध ठिकाणी भेटी देऊन, पाहणी करून नैसर्गिक पद्धतीने जगण्याची कला आत्मसात केल्यास मानवी जीवन हे सुखी आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते आहे.
– मिलिंद गड्डमवार
८६००२०३४२८