दंडाचा निर्णय योग्य; पण स्वत:च्या दोषासाठी काय?

0
39

वाचकपत्रे
विमानात गोंधळ घालून विमानाच्या उड्डाणाच्या विलंबास कारणीभूत ठरणार्‍या प्रवाशाला यापुढे पाच ते पंधरा लाख रु. दंड ठोठावण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतल्याचे वाचले. निर्णय योग्य आहे. कदाचित शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणामुळे असा निर्णय घेतला गेला असावा. पण, असा निर्णय एखाद्या कंपनीला घेता येतो काय? आणि एअर इंडिया जर विमानाच्या विलंबास कारणीभूत ठरली तर मग काय? एअर इंडियाचा इतिहास फारसा चांगला नाही. तसेच फक्त एक्झिक्युटिव्ह क्लासचे तिकीट उपलब्ध असल्याचे सांगून प्रत्यक्षात विमानात ती श्रेणी नसणे, असे घडले तर एअर इंडिया प्रवाशालाही तेवढाच दंड भरून देणार आहे काय? असे अनेक प्रवाशांसोबत घडते आणि मग हुज्जत होते. म्हणून विमानात इकॉनॉमी श्रेणीच्याच जागा असल्यास प्रवाशांकडून एक्झिक्युटिव्ह क्लासच्या नावावर अधिकचे पैसे वसूल करून फसवणूक करू नये. एक बोट दुसर्‍याकडे असताना, चार बोटे आपल्याकडे आहेत, याचा विसर एअर इंडियाला पडू नये!
अभ्युदय देशमुख
नागपूर

सुब्रतो रॉय आणि विजय मल्ल्यांना दणका!
सामान्य नागरिकांची दिशाभूल करून त्यांना लुटणार्‍यांच्या मुसक्या बांधण्याचे काम सर्वोच्च न्यायालय करीत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. सहारासारख्या जगप्रसिद्ध उद्योगाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी कर्ज न चुकविल्यामुळे आता, त्यांनी बांधलेल्या अलिशान ऍम्बी व्हॅलीचा लिलाव करून पैसे वसूल करावे, असे आदेश नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिले. तिकडे लंडनमध्ये किंगफिशर विजय मल्ल्या याची शिकार करण्यासाठी भारतातून सीबीआयचे पथक टपलेलेच आहे. मल्ल्याला नुकतीच लंडनच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्गही मोकळा होण्याच्या वाटेवर आहे. सरकारने आणखी एक केले पाहिजे. ज्या लोकांनी मोठमोठी कर्जे घेऊन ती बुडवली, त्या सर्व लोकांची संपत्तीही जप्त करून लिलावात काढली पाहिजे. तेव्हाच सामान्य जनतेचा पैसा लुबाडणार्‍यांना जरब बसेल.
वसंत देशपांडे
नागपूर

यंदाही चांगला पाऊस येऊ देरे बाबा…
गतवर्षीप्रमाणे यंदाही सरासरीएवढाच पाऊस होणार असल्याची आनंदाची बातमी विविध वेधशाळांनी दिली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. आधीच्या चार वर्षांत भीषण दुष्काळ पडल्याने शेतकरी अक्षरश: हवालदिल झाला होता. पण, फडणवीस सरकार आले आणि वरुण राजा प्रसन्न झाला. पण, अजूनही शेतकर्‍यांची तूर खरेदी झाली नाही. तो, तूर केव्हा खरेदी होणार याच विवंचनेत आहे. तेव्हा, शासनाने तातडीने तूर खरेदी करावी. जलयुक्त शिवाराची कामे तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले टाकावीत. कारण, महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यातच येणार असल्याचे अनुमान हवामान केंद्राने वर्तविले आहे. तेव्हा आतापासूनच नियोजन केले पाहिजे.
भाऊराव तिजारे
यवतमाळ

अजानच्या मुद्यावर कॉंग्रेसही सकारात्मक
सोनू निगम यांच्या, अजान देताना भोंग्यांचा वापर करू नये या मागणीवर, सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी सकारात्मक भूमिका घेणे, ही समाधानकारक बाब आहे. पटेल यांनीही म्हटले आहे की, नमाजसाठी अजान आवश्यक आहे, पण त्यासाठी लाऊडस्पीकर लावण्याची गरज नाही. कारण, आता जुना काळ राहिला नसून संपर्काची अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत. तेव्हा अजानसाठी भोंगे वाजविण्याची गरज नाही, असे पटेल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. अन्य पक्षांनीही आपली भूमिका स्पष्ट करायला हवी.
अनिल जाधव
अमरावती

एसटी बसला लागलेली आग आणि काही प्रश्‍न…
रिधोर्‍याजवळ सायंकाळच्या सुमारास एका धावत्या बसला आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. एका प्रवाशाच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला आणि ३८ प्रवाशांचे प्राण वाचले. कशामुळे ही आग लागली असावी? एसटी बसेसच्या वर लोखंडी पत्रे असतात. ते अति तापमानामुळे गरम होतात. इंजीनही गरम होते. अशा वेळी शॉर्टसर्किट होण्याचा धोका अधिक असतो. या घटनेतही शॉर्टसर्किटमुळेच इंजिनात आग लागली, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. एसटीने आपल्या बसगाड्यांचे इंजीन व्यवस्थित आहे की नाही, हे तपासून घ्यावे. जेणेकरून असे अपघात पुन्हा होणार नाहीत.
विश्‍वास सहारे
बुलडाणा