नरकाची दारे तीन!

0
162

शतश्‍लोकी
कामो बुद्धावुदेति प्रथममिह मनस्युद्दिशत्यर्थ जातं|
तद्गृह्मातीन्द्रियास्यैस्तदनधिगमत: क्रोध आविर्भवेच्च| प्राप्तावर्थस्य संरक्षणमतिरुदितो लोभ एतत्रयं स्यात्
सर्वेषां पातहेतुस्तदिह मतिमतां त्याज्जमध्यात्मयोगात्‌॥
येथे (या जगात, संसारात) प्रथम बुद्धीच्या ठिकाणी काम (इच्छा, मनीषा) निर्माण होतो. त्याच्या अर्थाची (म्हणजे ती कामना पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या पदार्थाच्या जमवाजमवीची इच्छा) मनात उत्पन्न होते. त्यानंतर इंद्रियांच्या द्वारे त्या विषयांचा आस्वाद घेतला जातो. तो प्राप्त झाला नाही तर क्रोध निर्माण होतो. जरी इच्छित गोष्ट प्राप्त झाली तरी ती सांभाळून ठेवण्याच्या विचारांनी लोभ निर्माण होतो. हे तीनच या जगात सगळ्यांच्या अध:पतनाचे कारण आहेत. त्यामुळे बुद्धिमंताने अध्यात्माच्या आधारे या तिन्हींचा त्याग करावा.
या पूर्वी ११ व्या श्‍लोकात आचार्यश्रींनी कठोपनिषदाचा सुस्पष्ट उल्लेख केला होता. येथे प्रत्यक्ष ग्रंथनामाचा उल्लेख नसला, तरी या श्‍लोकाची श्रीमदभवद्गीतेशी असणारी समविषयता वाचकांना क्षणात लक्षात येते. ‘त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मन:|’ म्हणणारी भगवद्गीता येथे आठवली नाही तरच नवल? वेगळ्या शब्दांत आचार्यश्रींनी आरंभी उपनिषद आणि आता गीता साम्यवर्णित प्रकरण ग्रंथांची श्रुतिस्मृतिपुराणोक्त परंपरानुगामी वृत्तीच अधोरेखित केली आहे.
आचार्यश्रींनी येथे अध:पतनाची कारणमीमांसाही केली आणि सारही वर्णन केले आहेत. ते म्हणतात, काम प्रथम बुद्धीत निर्माण होतो. मग मन त्याची साधने गोळा करते आणि शेवटी इंद्रियांद्वारे त्याचा आस्वाद घेतला जातो. उदाहरण घेऊ म्हणजे ही प्रक्रिया व्यवस्थित लक्षात येते. समजा मला एक पोषाख घेण्याची इच्छा झाली. ही इच्छा म्हणजे बुद्धीत प्रगटलेला ‘काम’, कोणतीही कामना प्रथम बुद्धीतच प्रसवणार. मग ती बुद्धी त्यासाठी मनाला प्रेरित करते.
मनाचे कामच आहे संकल्प विकल्प करणे. पोषाख कसा घ्यायचा? कुठून घ्यायचा? कोणत्या प्रकारचा? कोणत्या रंगाचा? किती किमतीचा इ. अनेकानेक विकल्पांवर मन कार्य करते. अनेक पर्याय स्वीकारते तर अनेक नाकारते. शेवटी एक पोषाख निश्‍चित होतो.
असा पोषाख एकदा निश्‍चित झाला की, मग शरीरावर तो चढवला की, त्वचेद्वारे स्पर्श, डोळ्यांद्वारे रंग इ. रूपात त्याचा इंद्रियांकडून आस्वाद घेतला जातो.
या सगळ्या प्रक्रियेत मनात उद्भवलेल्या संकल्पात एक तर पूर्ण होणे वा अपूर्ण राहणे, हे दोन पर्याय संभवतात. हा संकल्प पूर्ण झाला नाही, मनासारखा पोषाख मिळाला नाही तर राग येतो. चिडचिड वाढते. संताप येतो. आणि समजा मिळाला तर त्याला आता काहीही होऊ नये तो असाच राहावा असे वाटते. जे की असंभव असतेे. पण, त्याच्या सांभाळण्याची जी प्रक्रिया घडते तिलाच लोभ म्हणतात.
अर्थात, इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध आणि पूर्ण झाली तर लोभ. म्हणजे दोन्हीकडे दु:ख ठरलेलेच आहे. कारण या दोन्हींच्या मुळाशी काम आहे. त्याची परिणती काही झाली तरी काम+क्रोध वा काम+लोभ ही दोनच समीकरणे आहेत आणि दोन्ही क्लेशदायीच आहेत.
याचकरिता आचार्यश्री सांगतात की, ही परंपराच सकल अध:पतनाचे कारण होय. मग उपाय काय? शास्त्राने उपाय सांगितला सोप्यापासून सुरू करा. बुद्धीला वा मनाला आवर घालणे सोपे नाही, पण इंद्रियांना शरीराला आवरणे तुलनेने सोपे आहे. त्यासाठीच संत सांगतात- ‘मन गया तो जाने दो| मत जाने दो शरीर|’ अर्थात कदाचित मनात येतीलही कामना. पण, प्रथम शरीर अडवा. ते अधिक जड आहे. त्याला अडवले की मग ‘नाहीच मिळत’ म्हटल्यावर मनही हळूहळू थांबते. पण, ज्याला शरीरही अडवता येत नाही त्याच्या अध:पतनाला पर्यायच नाही. अत एव आचार्यश्री या सगळ्यांना, काम, क्रोध, लोभ या त्रिकूटाला अध:पतनाधार म्हणत आहेत.
यांचा त्याग घडावा. पण कसा? तर आध्यात्मिक मार्गाने. अर्थात उदात्ततम मानसिक, बौद्धिक वैराग्यासह. तरच तो त्याग खरा त्याग ठरतो. घरात खायलाच काही नाही अशा कफल्लकाला घडलेल्या उपासमारीला उपवास म्हणत नाहीत. त्याच्या अनुपलब्धीला त्याग म्हणत नाहीत. त्याग हा शुद्ध मार्गानेच हवा. शास्त्रसंमत रीतीने हवा. तीच रीती आतापर्यंत सांगितली.
विवेकाद्वारे अयोग्याची जाणीव होते, त्याज्य वस्तूंची निश्‍चिती होणे आणि वैराग्यद्वारे पुनरपी इच्छा ही न उद्भवता त्याग घडणे हाच खरा त्याग. आचार्यश्री यालाच आध्यात्मिक मार्गाने केलेला त्याग म्हणत आहेत. हाच त्यागाचा मुख्य मार्ग आहे. सुखाचा राजमार्ग आहे.
प्रा. स्वानंद गजानन पुंड