सावरकर, पवार आणि गाईची उपयुक्तता

0
102

न मम…
गाईंची उपयुक्तता ती मरेपर्यंत संपत नाही. त्यामुळे तिची उपयुक्तता संपली की गोमांस भक्षण करायला हरकत नाही, असा वितंडवाद कुणी करू नये. उलट, संपूर्ण देशात गोवंशहत्याबंदीची अत्यंत कठोरतेने अंमलबजावणी कशी करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. तरच आणि तरच या देशातील शेतकर्‍यांची स्थिती सुधारेल. दुसरा मार्ग नाही!

रक्तात कम्युनिस्ट विचारसरणी असलेल्या, पण व्यवहारात कॉंग्रेसी असलेल्या शरद पवारांनादेखील, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका वचनाला उद्धृत करावे लागले. यावरून गोमातेची शक्ती किती महान आहे, हे लक्षात यावे. गाय ही गोमाता नसून ती एक उपयुक्त पशू आहे व तिची उपयुक्तता संपल्यावर तिचा भक्षणासाठी उपयोग करणे चूक नाही, अशा अर्थाचे वाक्य, शरद पवार यांनी उच्चारले. नवी दिल्लीत, शरद पवार यांच्या आत्मवृत्ताच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन झाले. त्या वेळी मनोगत व्यक्त करताना ते असे म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची अनेक मते हिंदू समाजाने अस्वीकारली आहेत. त्यात हेही मत आहे. हे शरद पवारसारख्या चाणाक्ष नेत्याला माहीत असलेच पाहिजे. तरीही त्यांनी हा संदर्भ दिला. कारण सध्या भारतात गोहत्याबंदीवरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. गोहत्याबंदीच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, हाच पवारांचा एकमेव उद्देश असला पाहिजे. अन्यथा ते आपल्या ‘सेक्युलर’ मुखातून ‘जातीयवादी’ सावरकरांचे नाव कशाला घेतील? असो. वाद, चर्चा, संभ्रम-विभ्रम हे सर्व प्रकार सुरूच राहणार. आपल्याला त्यात पडायचे नाही. कारण त्याने काहीच साध्य होणार नाही. पक्ष-प्रतिपक्षातील बौद्धिकवीरांची मते, या चर्चांनी काही बदलायची नाहीत. आपण मात्र वेगळ्या कोनातून या चर्चेकडे बघू या.
सावरकरांचे मत क्षणभरासाठी मान्य केले, तरी प्रश्‍न उपस्थित होतो की, गाईची (गोवंशाचीही) उपयुक्तता कुठल्या क्षणी संपते. एखादी गाय या क्षणापासून निरुपयोगी आहे, हे कुणी व कसे ठरवायचे? ते ठरले की, मग त्या गाईची काय वासलात लावायची, ते बघता येईल. गाईने दूध देणे बंद केले, म्हणजेच ती भाकड झाली, की तिची उपयुक्तता संपते, असे मानायचे काय? जो कास्तकार आहे, त्याला हा प्रश्‍न विचारला तर तो याचे उत्तर नाही असे देईल. कारण, गाय ही मरेपर्यंत मानवाच्या उपयोगाची आहे. अगदी मेल्यानंतरही आहे. पूर्वी, खेड्यात प्रचंड संख्येत गोधन असायचे. एकेका घरी ३०-४० गाई असायच्या. १९८४ साली मी खेड्यात राहायला गेलो, तेव्हा आमच्याकडे ४० गाई होत्या. या गाई दुधासाठी नक्कीच नव्हत्या. त्यांचे दूध कुणी काढत नसे. त्यांची वासरेच ते पीत. वासरे बांधून ठेवली जात नसत. मोकळी असायची. याच वासरांतून जे गोर्‍हे असतील, त्यांना शेतीसाठी बैल म्हणून तयार करायचे आणि कालवडी असतील, त्या गोधनात समाविष्ट होत. अशी प्रथा होती. शेतीला घरचा बैल मिळणे, हे शेतकर्‍यांसाठी आर्थिकदृष्ट्या खूप फायद्याचे असते. आजचा विचार केला, तर साधारण बैलजोडी एक ते दीड लाखांची मिळते. शेतकर्‍याला घरचाच बैल शेतीला मिळाला तर त्याचा हा खर्च निश्‍चितच वाचतो. दुसरे महत्त्वाचे असे की, या गोधनापासून शेणखत मिळायचे. आज सर्वत्र रासायनिक खतांचा, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा बोलबाला आहे. तरीही शेणखताचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. शेतात पुरेसे शेणखत नसले तर रासायनिक खतेदेखील जास्त उपयोगाची नसतात, हे अनुभवानेही सिद्ध झाले आहे. एखाद्या शेत-खंडात एकदा पुरेसे शेणखत भरले की, तीन वर्षे ते पुरते. ‘टाईम रीलिज कॅप्सुल’सारखे त्याचे काम चालते. चौथ्या वर्षी त्या शेत-खंडात पुन्हा शेणखत भरायचे. अशा रीतीने, संपूर्ण शेतात शेणखत प्रचुर मात्रेत राहायचे. अशा शेतीला खेड्यात, खताने माजून असलेली शेती म्हणतात. हे चक्र सुरळीत सुरू राहण्यासाठी जितके शेणखत आवश्यक आहे, त्याची व्यवस्था या गाई करीत. शेतकरी त्यानुसार आपल्याकडे गाई ठेवीत असे. म्हणजेच, शेतकरी दुधासाठी गाई पाळत नसे, तर शेणखत व गोर्‍हे यांच्यासाठी पाळत असतो. ही पारंपरिक पद्धत जोपर्यंत सुरू होती, तोपर्यंत कितीही नैसर्गिक संकटे आलीत, तरी शेती पिकतच होती. उत्पन्नही भरपूर होत होते. शेतकर्‍यांवर वैफल्यग्रस्त होण्याची पाळी येत नव्हती. गावखेड्यातील हे गोधन झपाट्याने कमी झाले आणि शेतीला अवकळा आली. आमच्या गावात सुमारे ४ ते ५ एकर आराजीचे गोठाण आहे. शेतकरी सकाळी आपल्या घरची गुरे तिथे आणून सोडून देत असे. सर्व गुरे गोळा झाली की, गायकी ते गोधन चरायला घेऊन जात. पूर्वी गुरे गोळा झाली की, या गोठाणावरून पायी जाणेदेखील शक्य होत नसे. इतकी त्यांची संख्या होती. आता तर एकही गुर तिथे दिसत नाही. दुसरे असे की, शे-पाचशे गुरांचे हे गोधन दिवसभर चार्‍यासाठी गावाभोवती असलेल्या पडीत किंवा गायरानाच्या परिसरात फिरत. तिथल्या जमिनीवर या गुरांचे शेणमूत पडे. पर्यायाने पडीत भाग सुपीक होत असे व पावसाळ्यात तिथे चांगल्या तर्‍हेचे गवत वगैरे उगवत असे. म्हणजे केवळ वाहतीतील शेतीच नाही, तर पडीत जमीनदेखील सुपीक करण्याचे कार्य हे गोधन करीत असे. शेणखताचे महत्त्व, कुठलेही रासायनिक खत घेऊ शकत नाही. शेणखतात, शब्दश: असंख्य सूक्ष्म जीव-जिवाणू असतात. हे सर्व मित्र किडीच्या वर्गातील असतात. शेतजमिनीत शेणखत पडल्यावर हे असंख्य जीव-जिवाणू शेतजमिनीचा कस वाढवितात. पूर्वी उन्हाळ्यात शेतावर गुरे-ढोरे व बैल बांधण्याची पद्धत होती. शेतात एका विशिष्ट जागी दावण बांधून त्याला ही गुरे बांधली जात. एक-दोन महिने ही गुरे शेतात राहात. ज्या जागी त्यांची दावण बांधली असायची, त्या जागेवरील पीक ओळखूच यायचे. एकच शेत, एकच जमीन; पण जिथे दावण बांधलेली होती, तिथले पीक व त्याचे उत्पन्न चांगलेच असायचे. जे शेतकरी आहेत, त्यांच्या हे लक्षात असेल. मग वर्षानुवर्षे शेतात शेणखत टाकण्याच्या पद्धतीमुळे शेतजमीन किती सुपीक झाली असेल आणि अशा सुपीक जमिनीतून कमीतकमी खर्चात किती चांगले उत्पन्न निघत असेल, याची आपण कल्पना करावी. गोहत्याबंदी नसल्यामुळे शेतकरी पैशासाठी दारची गुरेढोरे कसायाला विकू लागला. आपण स्वत:च स्वत:साठी खड्डा खणतो आहे, याचे त्याला भान राहिले नाही. त्यामुळे गावातील गोधन संपले. त्यामुळे शेणखत मिळेनासे झाले. शेणखत नसल्याने शेतीचा कस गेला. परिणामी लागवडीचा खर्च वाढला अन् उत्पन्न घटले. या अशा दुष्टचक्रात शेतकरी फसला. आजही तो त्यात असहायपणे गरगरा फिरत आहे. म्हातार्‍या गुराढोरांना कसायाला विकण्याची सवलत असावी, असेही बरेच जण म्हणतात. तसे होणे शक्य नाही. कुठल्याही गुरांच्या बाजारात जाऊन बघावे. सर्वात मोठा खरीददार कसाईच असतो. त्याने खरेदी केलेली गुरे बघावीत. त्यात म्हातारी गुरे कमी व तरणीबांड गुरेच जास्त दिसतील. गोहत्याबंदी कठोरतेने लागू झाली, तर शेतकर्‍याला गुरे विकायला जागाच मिळणार नाही. नाइलाजाने त्याला गुरे घरी ठेवावी लागतील. त्याने त्याला पुरेसे शेणखत मिळेल. शेणखताने शेती कसदार होईल. त्यामुळे कमी उत्पादन खर्चात चांगले उत्पन्न मिळेल. जोडीला अत्याधुनिक तंत्रज्ञान व रासायनिक खते व औषधी आहेतच. सांगायचे तात्पर्य हेच की, गाईंची उपयुक्तता ती मरेपर्यंत संपत नाही. त्यामुळे तिची उपयुक्तता संपली की गोमांस भक्षण करायला हरकत नाही, असा वितंडवाद कुणी करू नये, उलट संपूर्ण देशात गोवंशहत्याबंदीची अत्यंत कठोरतेने अंमलबजावणी कशी करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. तरच आणि तरच या देशातील शेतकर्‍याची स्थिती सुधारेल. दुसरा मार्ग नाही! गोमांसाच्या निर्यातीमुळे देशाला प्रचंड परकीय चलन मिळते, हा युक्तिवादही फसवा आहे. गोहत्याबंदी कडकपणे राबविली, तर केवळ पाच वर्षांतच भारतातील गोधन कितीतरी पटीत वाढेल आणि त्याचा थेट प्रभाव कृषिउत्पन्नात दिसून येईल. गोहत्याबंदीमुळे शेतीचे उत्पन्न वाढून निव्वळ नफा वाढला, तर गोमांसामुळे मिळणार्‍या परकीय चलनापेक्षा कितीतरी पटीने अधिक चलन देशाला मिळेल. शिवाय देश सर्व प्रकारच्या अन्नधान्यांत स्वयंपूर्ण होईल. म्हणून शरद पवारादी चाणाक्ष व शेतीच्या तज्ज्ञांनी, कर्जमाफीसाठी नाही, तर गोहत्याबंदीच्या समर्थनार्थ संघर्ष यात्रा काढली पाहिजे. हेच त्यांच्या, त्यांच्या पक्षाच्या व अंतत: देशाच्या भल्याचे असेल.
– श्रीनिवास वैद्य