इंदूरमध्ये फटाक्यांच्या दुकानास आग

0
69

७ जिवंत जळाले
इंदूर, २० एप्रिल 
शहराच्या मध्यभागी रानीपुरा बाजारात दुपारी एका फटाक्यांच्या दुकानास भीषण आग लागली. येथे दुकानदारांनी अवैध स्वरूपात फटाक्यांचा साठा करून ठेवला होता.
जळत्या फटाक्यांमुळे काही मिनिटांतच जवळपासच्या नऊ दुकानांनादेखील आगीने कवेत घेतले व संपूर्ण बाजारात भीती, गडबड, गोंधळाचे वातावरण पसरले. यात दुकान मालकासह सात व्यक्ती जिवंत जळाल्या. दोघांचा जागेवर मृत्यू झाला आणि उर्वरित पाच जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती आहे. रस्त्यावर उभ्या १२ गाड्या, ठेले व दुकानांच्या गल्ल्यात ठेवलेले लाखो रुपयेही जळाले. अग्निशमन दलाच्या एस. पी. अंजना तिवारी यांनी सांगितले की, दिलीप फटाका नावाच्या दुकानात पावणेतीन वाजता आग लागली होती. येथे मोठ्या प्रमाणात अवैध फटाक्यांचा साठा होता. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. आगीच्या प्रखरतेमुळे कोणालाही पळून जाण्याची संधी मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सात बंब बोलविण्यात आले.
जवळपास ३५ टँकर पाणी आणि साडेतीनशे लिटर फोमच्या मदतीने सहा तासात ही आग आटोक्यात आणली. हाटपीपला येथील एक व्यापारी खरेदीसाठी आला होता. जळत्या फटाक्यांपासून वाचण्यासाठी तो एका दुकानात लपला. परंतु आगीने त्या दुकानासही आपल्या कवेत घेतले. अखेर मलब्यात त्याचा मृतदेह मिळाला. आगीच्या घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांनी संपूर्ण रानीपुरा बाजारात फटाका व्यापार्‍यांच्या दुकानांवर छापे मारले. अनेक व्यापार्‍यांच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा अवैध साठा मिळाला. या सर्वांविरुद्ध फटाका अधिनियमांतर्गत कारवाई केली.  (वृत्तसंस्था)