धरमजी तर त्यांना मारणारच होते
नवी दिल्ली, २० एप्रिल 
आमदार बच्चू कडू यांना कोर्टात खेचणार असल्याचे भाजपा खासदार तसेच अभिनेत्री हेमामालिनी यांनी गुरुवारी स्पष्ट केले. आमदार कडू यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना, धरमजी (अभिनेता धर्मेंद्र) त्या माणसाला रागाच्या भरात मारणारच होते असेही हेमा यांनी स्पष्ट केले.
सर्वप्रथम वादग्रस्त वक्तव्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय मी घेतला होता. त्यांना (बच्चू कडू) हवी असलेली फुकटची प्रसिद्धी मला द्यायची नव्हतीच. पण, माझ्या जवळच्या लोकांनीच त्या व्यक्तीला सोडू नये असे सांगितले. धरमजी तर एवढे संतप्त होते, की रागाच्या भरात त्या माणसाला मारणारच होते. माझे आणखी एक मित्र शत्रुघ्न सिन्हा (अभिनेते) यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला. मित्रमंडळी आणि मुलींच्या सांगण्यावरूनच मी कडू यांच्या विरुद्ध कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे हेमामालिनी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. यासंदर्भात आपल्या वकिलांशी बोलणे झाले असून आमदार बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाच्या मानहानीचा खटला दाखल केला जाईल, असेही त्या पुढे म्हणाल्या.  (वृत्तसंस्था)