महाराजबागेतील दीड वर्षाचे काळवीट दगावले

0
73

– आठवडाभरात उष्माघाताचा दुसरा बळी
नागपूर, २० एप्रिल
आठवडाभरातच महाराजबागेत उष्माघाताचा दुसरा बळी पडला आहे. दीड वर्षाचे मादी काळवीट उष्माघाताने दगावले आहे. मागील आठवड्याच्या शेवटी-शेवटी महाराजबागेतील एक आठ वर्षाचा इमू याच कारणाने दगावला होता. त्यानंतर लगेच गुरुवारी काळवीटाच्या मृत्यूमुळे महाराजबाग प्रशासनावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता एन. डी. पार्लावार यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास महाराजबागेचे कर्मचारी हरणांच्या पिंजर्‍यात चारा टाकण्यास गेले असता त्यांना सदर काळवीट मृतावस्थेत आढळून आले. महाराजबागेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बावस्कर हे सुटीवर अकोला येथे गेले असल्याने प्रा. इंगोले यांच्याकडे देखभालीची जबाबदारी सोविण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले. सदर काळवीट हे उष्माघाताने दगावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित अधिकार्‍यांच्या समोरच मृत काळवीटाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल उद्या शुक्रवारी २१ एप्रिलला मिळण्याची शक्यता आहे. हा अहवाल आल्यानंतरच काळवीटाच्या मृत्यूचे खरे कारण समजू शकेल. यावेळी इंगोले देखील उपस्थित होते.
प्रभारी सुटीवर, महाराजबाग वार्‍यावर
महाराजबागेचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर हे स्ध्या सुटीवर गेले आहेत. २५ एप्रिलपर्यंत ते सुटीवर आहेत. या दरम्यान प्रा. इंगोले यांच्यावर महाराजबागेची देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वीच वेतनवाढीच्या मागणीसाठी महाराजबागेतील कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे संपूर्ण एक दिवस सर्वच प्राणी अन्नाविना राहिले होते. ७१ पैकी ६९ पदे रिक्त आहेत. अशातच डॉ. बावस्कर हेही सुटीवर गेल्याने सध्यातरी महाराजबाग वार्‍यावर असल्याचे चित्र आहे.
तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार
महाराजबागेतील सध्याचा कारभार तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखाच आहे. मागील आठवड्यात इमू दगावला. पण महाराजबाग प्रशासनाने म्हणावी तशी काळजी घेतली नाही. बहुधा त्याचाच परिणाम म्हणून गुरुवारी एक काळवीट दगावले. ही घटना देखील बर्‍याच उशिरा समजली. घटनेेने आरडाओरड होणारच हे लक्षात घेऊन मग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना पत्र लिहून प्राण्यांच्या आरोग्याकडे लक्ष पुरविण्यासाठी पशुवैद्य पाठविण्याची विनंती केली आहे.