माजी नगरसेवकासह भूमाफिया गजाआड

0
69

– बिल्डरचे आत्महत्या प्रकरण
नागपूर, २० एप्रिल
पैशाच्या वादावरून एका बिल्डरने आत्महत्या केल्याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकासह भूमाफियाला देखील अटक केली.
माजी नगरसेवक राजेश माटे आणि भूमाफिया दिलीप ग्वालबंशी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भूपेश चंद्रकांत सोनटक्के (४२) असे आत्महत्या करणार्‍या बिल्डरचे नाव आहे. ते बैरामजी टाऊन येथे राहत होते.
जाटतरोडी येथील जाधव नावाच्या इसमाची गोरेवाडा येथे शेती होती. २००१ मध्ये बिल्डर सोनटक्के याने शेती खरेदी करण्याचा करारनामा केला होता. ६ लाख रुपयात शेती खरेदी करण्याचा सौदा झाला होता. त्यानंतर ती शेती भूमाफिया दिलीप ग्वालबंशी याला विकण्याचा सौदा झाला. हा सौदा १२ लाखात झाला होता. त्यापैकी ग्वालबंशीने ६ लाख रुपये सोनटक्केला दिले होते. सौद्यानुसार ग्वालबंशीने उर्वरीत पैसे सोनटक्केला दिले नव्हते. त्यामुळे सोनटक्केने सौदा रद्द केला होता. तरीही दिलीप ग्वालबंशीने बोगस कागदपत्रे तयार करून ती जमीन स्वत:च्या नावे करून घेतली आणि माजी नगरसेवक राजेश माटे यांना विकली.
हा प्रकार लक्षात येताच सोनटक्के संतप्त झाला. त्यानंतर सोनटक्के व आरोपींमध्ये बैठक झाली. या बैठकीत प्रत्येकाला ३ लाख रुपये देण्याचे ठरले. परंतु, ग्वालबंशीने केवळ दीड लाख रुपये दिले. या कारणावरून २९ ऑक्टोबर २०१६ पूर्वी सोनटक्केने अन्नाबाबानगर, एमबी टाऊन समोर असलेल्या जिममध्ये गळफास लावला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
आत्महत्या करण्यापूर्वी सोनटक्केने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. चार दिवसांपूर्वी ती चिठ्ठी सोनटक्के कुटुंबियांच्या हाती लागली. त्यात दिलीप ग्वालबंशी आणि राजेश माटे यांनी संगनमत करून कोट्यवधीची जमीन बळजबरीने बळकावली. मारण्याची धमकी देत दीड लाखात आपसी समझौत्यावर सोनटक्के यांची सही घेऊन जमिनीचा व्यवहार मोकळा केला. चिठ्ठीत लिहिल्यानुसार सोनटक्केला आरोपींकडून साडेदहा लाख रुपये घ्यायचे होते. परंतु, पैशासाठी आरोपी टाळाटाळ करीत असल्याने सोनटक्केवर लोकांचे कर्ज झाले. त्यापोटीच आत्महत्या करीत असल्याचे सोनटक्केने नमूद केले. याप्रकरणी सोनटक्केची बहीण स्वाती चंद्रकांत सोनटक्के हिच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी १२०(ब), ३०६, ३८४ अन्वये गुन्हा नोंदवून ग्वालबंशी आणि माटे यांना अटक केली.