स्त्री स्वावलंबनाचा विचार हरपला : श्रीकांत तिडके

0
65

– स्व. जया द्वादशीवार श्रद्धांजली सभा
नागपूर, २० एप्रिल
स्वतंत्र, संपन्न असे जयाताईंचे व्यक्तीमत्व होते. त्यांचा साहित्याचा व आकलनाचा गाभा मोठा होता. त्यांनी आपल्या लेखनातून अनेकदा स्त्रीवादी भूमिका मांडली. स्त्रीच्या स्वावलंबनाचा विचार मांडला. त्यांच्या जाण्याने स्त्री स्वावलंबनाचा विचार हरपला, अशी शोकसंवेदना ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत तिडके यांनी व्यक्त केली
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नागपूरतर्फे २० एप्रिलला आयोजित ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत स्व. जया द्वादशीवार यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस, सविता भट, डॉ. कन्ना मडावी, डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे उपस्थित होते.
तिडके म्हणाले, कोणाला चांगलं म्हणण्याची आपल्याला आज सवयच राहिली नाही. पण, तो मोठेपणा जया वहिनींमध्ये होता. सहृदयता त्यांच्यात होती. त्यांचे वात्सल्य, मातृत्व व कर्तृत्व फार मोठे होते. आज शहर स्मार्ट होत आहे. पण, विचार स्मार्ट होण्याची गरज आहे. त्यासाठी जयाताईंचे महिलाविषयक विचार समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी चंद्रपुरात त्यांच्या नावाची व्याख्यानमाला सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सविता भट म्हणाल्या, श्रीमंती मिरविणारे अनेक मिळतील. परंतु श्रीमंती वाटणारे क्वचितच मिळतात. त्यापैकी जयाताई ही श्रीमंती वाटणारी होती. तिचे व्यक्तीमत्व स्वयंभू होते. लेखन, वाचन, अध्ययन, चिंतन हाच तिचा विरंगुळा होता. त्यामुळेच ती एक चांगली वक्ता होती. वैचारिक बैठकीशी तिने कधीही तडजोड केली नाही. जयाताई आमच्यासाठी मार्गदर्शक होती. तशीच ती एक उत्तम बँकर होती. तिच्याच अध्यक्षीय कारकीर्दीत सन्मित्र महिला बँकेला दोनदा पुरस्कार मिळाला आणि पाच शाखेत बँकेचा विस्तार झाला. तिच्या जाण्याने आमची अपरिमित हानी झाली आहे.
जयाताई आमची माय होती. आम्हाला वाढविताना कधी तिने या गोष्टींचा उदोउदो केला नाही आणि जाती-पातीचा विचार केला नाही. म्हणूनच माझ्यासारख्या मुलाला तिने आपल्या पुत्रासारखे वाढविले. त्या स्पष्ट वक्ती होती, तेवढीच प्रेमळही होती. ती आपल्यात नाही, हा विचारच मी सहन करू शकत नाही, असे सांगताना डॉ. कन्ना मडावी यांच्या डोळ्यात अश्रु तरळले. शोभाताई फडणवीस म्हणाल्या, सदैव हास्यवदन, प्रेमळ आणि विद्वत्त व्यक्तीमत्व जया वहिनींचे होते. माझ्या आत्मचरित्राचे प्रत्यंचा हे नाव तिनेच दिलेले आहे. आजारपणाच्या अखेरच्या क्षणी सुद्धा तिच्या मेंदूची प्रगल्भता काम करीत होती. जुन्या आठवणींच्या वलयात ती अखेरच्या क्षणी रमत होती. समोर मृत्यू असतानाही तिच्यात स्थितप्रज्ञता होती. महिला बँकेच्या यशात तिचा वाटा मोठा आहे. मात्र, बँकेच्या इमारतीचे स्वप्न आम्ही तिच्या हयातीत पूर्ण करू शकलो नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी केले. कार्यक्रमाला जया द्वादशीवार यांच्या मित्र परिवाराची मोठी उपस्थिती होती.