सायंकाळ झाली की सुरू होतात कार बार!

0
139

नागपूर, २० एप्रिल
राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५०० मीटर अंतरावरील वाईन शॉप, बार, बीअर शॉपी आणि देशी दारूची दुकाने हटविण्याचा निकाल न्यायालयाने काय दिला, शहरात कार बारची संख्या आता वाढू लागली आहे. चौकाचौकातील वाईन शॉपजवळ सायंकाळी व रात्री कार बार सजू लागले आहेत.
याशिवाय फूटपाथवर आता बार थाटले जाऊ लागले आहे. वाईन शॉपजवळील ब्रेड-ऑम्लेट्‌सची दुकाने वाढू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून अचानकच वाईन शॉपमधील गर्दीही वाढू लागली असल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कागदोपत्री असलेल्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारूची सर्वच प्रकारची दुकाने बंद करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील सक्करदरा, बर्डी, सीताबर्डी, रामदासपेठ, अमरावती रोडप्रमाणेच कामठी रोड आदी अनेक प्रमुख भागांमधील बार बंद झाले आहेत. शिवाय वाईन शॉपवरही गंडांतर आले आहे. ही संख्या आणि त्यांच्या ग्राहकांची संख्याही जास्त असल्यामुळे या सर्वच ग्राहकांना आता इकडेतिकडे आपला डेरा हलवावा लागला आहे. त्यामुळेच की काय वाईन शॉपमधील गर्दी वाढलेली दिसून येत आहे. सध्या उन्ह चांगलेच तापू लागले आहे. त्यामुळे बीअर घेणार्‍यांची संख्या वाढली आहे. त्यातही युवकांचा समावेश जास्त दिसत असून अधूनमधून या युवकांच्या घोळक्यात युवतीही दिसून येतात. त्यामुळे आपली युवा पिढी कुठे चालली आहे, असा प्रश्‍न निर्माण होतो.
वाईन शॉपमधून दारू किंवा बीअर घ्यायची. लगतच असलेल्या पानठेल्यावर किंवा दुकानांमधून प्लास्टिकचा प्याला आणि ज्याला मद्यपी चखणा म्हणतात, असे काही खारा मालाचे पॅकेट्‌स घ्यायचे, सोबत पाण्याच्या बॉटल्स, गरज पडल्यास शीतपेयाच्या बॉटल्स घ्यायच्या आणि कारच्या टबावरच बार थाटायचा, ही नवीन पद्धत आता रूढ होताना दिसू लागली आहे. बजाजनगर चौक ते अभ्यंकर नगर चौक या मार्गावर रात्री आठ-नऊ वाजतानंतर हमखास हे चित्र दिसून येते. काही कारचालक व त्यांचे मित्र चालत्या कारमध्येच बारचा आनंद घेतात आणि काचेच्या बॉटल्स व इतर साहित्य सर्रास रस्त्यांवर फेकून देतात. त्यामुळे इतर कोणाला त्रास होत असेल याची त्यांना अजीबात पर्वा नसते.
काही दारू दुकान मालकांनी इतर नागरिकांना आपल्या ग्राहकांचा त्रास होऊ नये म्हणून दुकानांसमोर सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केली आहे. मात्र, अनेकांनी हा फालतू खर्च कशाला म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाहतुकीला त्रास तर होतोच शिवाय आजूबाजूला राहणार्‍या नागरिकांना विशेष करून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना जास्त त्रास होतो, असे लक्षात येते.
प्रशासकीय पातळीवरील संबंधित विभागाने आणि अधिकार्‍यांनी या घटनांची दखल घेऊन वेळीच कारवाई करावी, अशी या घटनांचा त्रास असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.