आश्रमशाळा शिक्षक-कर्मचारी वेतनापासून वंचित

0
129

– विभागाच्या विरोधात कँडल मार्च
नागपूर, २० एप्रिल
आदिवासी विभागातील अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक कर्मचार्‍यांना जानेवारी महिन्यापासूनचे वेतन मिळाले नाही. या विषयावर संबधित अधिकार्‍यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र याकडे विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे विभागाच्या भूमिकेविरोधात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने गुरुवारी सायंकाळी ७ ते ८ या वेळात आदिवासी विकास विभागात कॅन्डल लावून निदर्शने केली.
विभागाकडे निधी नाही. पगार करणे शक्य नसल्याचे उत्तर शिक्षकांना देण्यात येत आहे. मात्र नियमित वेतनाचा निधी पुरवणी देयकात खर्च केल्याचा आरोप यावेळी शिक्षकांनी केला. याला जबाबदार कोण? आदीवासी विभागाकडे शासनाचे लक्ष नाही. त्यांना सर्वसाधारण सुविधांपासूनही वंचित ठेवण्यात येत आहे. विद्यार्थांना निकृष्ट दर्जाचे भोजन काही शाळांमध्ये दिले जाते. या विषयी तक्रारी करूनही गैरमार्गाने प्रकरण हाताळले जाते, असाही आरोप शिक्षकांनी केला. शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ नेहमीच बंद राहते. त्यामुळे अर्ज भरण्यास विलंब होतो. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळत नाही. २०१६-१७ ची शिष्यवृती विदयार्थांना शैक्षणिक वर्ष संपत आले तरी मिळालेली नाही. या सर्व समस्येकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनात विठ्ठल जुनघरे, प्रमोद रेवतकर, तेजराज राजुरकर, चंद्रमणी गायकवाड, हेमंत कोचे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी शिक्षक व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.
वरिष्ठ श्रेणी मान्यतेचे प्रस्ताव पडून
शासनाच्या वतीने वरिष्ठ श्रेणी मान्यतेचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. पण त्याचे आदेश प्रकल्प कार्यालयात पडून आहे. त्यामुळे कामाच्या नियोजनात अडचणी येत आहेत. यासोबतच शिक्षक व कर्मचार्‍यांना आठवड्यातून एक दिवस सुटी न मिळणे हा प्रघातच पडला आहे. याकडे देखील शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे शिक्षकांनी सांगितले.