रोहित्रांजवळील परिसरात स्वच्छता मोहीम

0
108

– महावितरणचा स्तुत्य उपक्रम

नागपूर, २० एप्रिल
वीज वितरण रोहीत्र, वितरण पेटी किंवा विजेचा खांब दिसला की त्या सभोवतालची जागा आपल्या हक्काची कचराकुंडी असल्याचा गैरसमज करून घेत तेथे बिनधोकपणे घरातील केर-कचरा टाकायचा उद्योग राजरोसपणे अनेक सुज्ञ नागरिकांकडून केला जातो. काही मोजक्या नागरिकांच्या अशा कृतीचा फ़टका मात्र सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून महावितरणने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला पाठबळ देत रोहित्रांखाली नागरिकांनी टाकलेला कचरा उचलून परिसर स्वच्छ केला.
महावितरणने यावर अनेकदा जनजागृती करूनही स्थितीत काहीही बदल झालेला नसल्याने अखेर आज गांधीगिरी करीत महावितरणच्या सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचार्‍यांनी नागपूर परिमंडळांतर्गत असलेल्या विविध ठिकाणी हे अभियान राबविले.
वीज वाहिन्या किंवा ट्रान्सफॉर्मर फीडर पिलरजवळ कचरा टाकणे आणि तो जाळण्याच्या प्रकारामुळे वीज यंत्रणेला धोका निर्माण होत असतो. शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या, फिडर पिलर, रोहीत्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स किंवा डीपी अशा वीज यंत्रणेजवळील उघड्या असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. अनेकदा तो जाळलाही जातो.
वीजयंत्रणाही उन्हामुळे तापलेली असल्याने अशा प्रकारांमुळे धोका वाढला आहे. ओव्हरहेड वीजवाहिन्यांखाली असलेल्या कचर्‍याचे ढिग पेटल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका असतो. याशिवाय टाकलेला कचरा खाण्यास येणार्‍या पशू-पक्ष्यांमुळेही अपघात किंवा वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. या सार्‍या बाबींकडे सामान्य नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठीच महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी ‘गांधीगिरी’चा निर्णय घेत आज गुरुवारी सकाळी ८.३० वाजतापासून वीज यंत्रणेला कचर्‍याचे उकीरडे केलेल्या प्रत्येक वितरण रोहीत्र, वितरण पेटी आणि खांबांजवळ स्वच्छता अभियान राबविले.
मुख्य अभियंता रफिक शेख, अधीक्षक अभियंता मनीष वाठ, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांनी स्वत: आपल्या सहकार्‍यांसह शंकरनगर येथील बटुकभाई ज्वेलर्स मागिल रोहीत्र, शंकरनगर चौकातील वीज खांबाजवळील परिसर स्वच्छ केला. अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे, वर्धा मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांनीही आपापल्या भागात हे स्वच्छता अभियान राबविले. या अभियानादरम्यान महावितरणतर्फे नागपूर जिल्ह्यात सुमारे १८४ तर वर्धा जिल्ह्यात १३८ ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. महावितरणने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत एसएनडीएलनेही त्यांच्या भागातील वितरण रोहित्राजवळील कचर्‍याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ केला.
जाहिराती करणे महागात पडणार
जाहिराती करण्यासाठी अनेक वीज वितरण यंत्रणेवर बॅनर्स, पोस्टर्स आणि पॉम्पलेट्स लावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महावितरणतर्फे देण्यात आला आहे. आपल्या यंत्रणेवर असे काही आढळल्यास त्यावरील प्रकाशित माहितीच्या आधारे संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.