सेमिनरी हिल्सच्या जंगलाला आग

0
129

-वृक्षांचे घर्षण हेच कारण
-घातपाताचा संशय
-प्राण्यांना इजा पोचण्याची शक्यता
-दोन तासात नियंत्रण
-अग्निशमन विभागाचे पाच बंब कार्यरत
नागपूर, २० एप्रिल
मागील काही दिवसांपासून नागपूर शहराचे तापमान सातत्याने वाढत आहे. या स्थितीत आज सायंकाळी अचानक सेमिनरी हिल्स येथील जंगलाला आग लागली आणि पाहता-पाहता आगीने जंगलाचा ५ किलोमीटर परिसर आपल्या कवेत घेतला. या आगीची सूचना मिळताच नागपूर मनपा अग्निशमन दलाचे २५ अधिकारी व कर्मचारी पाच बंबांसह घटनास्थळी रवाना झाले आणि दोन तासात ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. वृक्षांच्या घर्षणाने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. अंधार पडल्यानंतर ही आग लागल्याने अग्निशमन दलाला त्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागले. या आगीत जंगलातील प्राण्यांना इजा पोचली असावी असा कयास आहे. मात्र त्याविषयी उद्या पाहणीअंती निष्कर्ष काढता येईल असे अधिकार्‍यांचे मत आहे.
सिव्हिल लाईन्स हा भाग वृक्षराजीने नटला आहे. त्यात सेमिनरी हिल्सचे संरक्षित जंगल शहराला लागून असल्यामुळे सायंकाळनंतर अनेक नागरिक याठिकाणी थंडाव्याची अनुभूती घेण्यासाठी येतात. पण गुरुवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास मनपा अग्निशमन मुख्यालयातील फोन खणखणला आणि सेमिनरी हिल्सच्या जंगलाला आग लागल्याची सूचना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, अग्निशमन विभागाने आपल्या सर्व स्थानकांना याची सूचना दिली आणि सिव्हिल लाईन्स, गंजीपेठ, कॉटन मार्केट, नरेंद्रनगर आदी ठिकाणाहून पाणी व अग्निशमन साहित्य घेऊन अधिकारी व कर्मचारी सेमिनरी हिल्स परिसरात पोचले. जपानी गार्डन चौकातून एसएफएस कॉलेजकडे जाणार्‍या मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलातील शुष्क वृक्षांनी व पालापाचोळ्याने पेट घेतल्याचे दिसत होते. हळूहळू या आगीने रौद्ररूप धारण केले आणि जपानी गार्डनपासून सेंटर पॉईन्ट स्कूल पर्यंतच्या चौकाकडील भागात आगीचे लोळ दिसत होते. रस्त्याच्या कडेला अग्निशमन विभागाचे बंब उभे राहिले आणि होस पाईपच्या माध्यमातून या आगीवर पाण्याचा मारा सुरू झाला. ही आग जंगलातील जमिनीला समांतर पसरत असल्यामुळे त्यावर पाणी फवारणे हा एकमेव उपाय नव्हता त्यामुळे अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी बिटींग सिस्टिमचा वापर पाण्यासोबत केला. या दोन्ही प्रकारे आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले.
आग जाणीवपूर्वक लावली असावी ः मल्लिकार्जुन
सेमिनरी हिल्स परिसरात गुरुवारी सायंकाळी जोरदार आग लागली. जवळपास ५ किलोमीटर परिसरात पसरली होती. याबाबत विभागीय वनसंरक्षक मल्लिकार्जुन यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी ही आग जाणूनबुजून लावली असल्याचा संशय व्यक्त केला. परिसरात तीन ते चार ठिकाणी ही आग लावल्याचे परिसराला भेट दिल्यानंतर लक्षात आले. त्यामुळेच आग जाणूनबुजून लावली असावी असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी अग्निशमन विभाग व पोलिस विभागाचेही चांगले सहकार्य मिळाले. याबद्दल मल्लिकार्जुन यांनी दोन्ही विभागाचे तसेच परिसरातील नागरिकांचे आभार मानले. तसेच जनतेने परिसरात बिडी, सिगारेट पेटवू नये असेही आवाहन त्यांनी केले.
पक्ष्यांचे पलायन, घरटी खाक
या आगीमुळे शंभर वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाडांना फटका बसला आहे. तर काही झाडांच्या फांद्या जळाल्या आहेत. अनेक पक्षी सुद्धा या आगीमुळे इतरत्र गेलेत तर अनेक घरटीही या आगीत जळून खाक झाली आहेत.
बिटींग सिस्टिमचा वापर : चंदनखेडे
जंगलाच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्याकडे विशेष यंत्रणा नाही पण आम्ही आज पाण्यासोबत बिटींग सिस्टिमचा वापर केला. त्यात झाडांच्या मोठ्या फांद्या तोडून जंगलातील जमिनीवर पसरलेल्या आगीवर या फांद्या आपटायच्या आणि आगीची झळ उभ्या वृक्षांना लागू नये तसेच ती पसरू नये यासाठी प्रयत्न केले व त्यात यश आल्याची माहिती मनपाचे चीफ फायर ऑफिसर बी. पी. चंदनखेडे यांनी दिली.