मालकाच्या मृत्यूला गायीने घेतले शिंगावर

यमदूत होऊन आलेला बिबट्या शेपूट घालून पळाला

0
116

रवी नवलाखे

धारणी, २१ एप्रिल
गोहत्या बंदीवरून सध्या देशात काही लोकांत अस्वस्थता आहे. बुद्धीप्राण्यवाद्यांची डोकी या विषयावर धावू लागली आहे. म्हातार्‍या माय-बापांना वृद्धाश्रमात टाकण्याला ‘रॅशनल’ मानणारे आता गायीचे इतर उपयोग संपले की तिला मारून खाण्याच्या पाशवी वृत्तीचे समर्थन करू लागले आहेत. अशा वातावरणात माणसांचे भक्ष ठरू पाहणारी गाय रानात बिबट्याची शिकार होऊ पाहणार्‍या आपल्या मालकाचे प्राणरक्षण करण्याची घटना वर्तमानावर नेमके भाष्य करणारीच!
धारणीपासून ६ किमी अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशातील नागोतार गावात बुधावर, २० एप्रिल रोजी हे अघटित घडले. चंपालाल बाटू (५०) आणि पूनमचंद शोभाराम (२५) हे गुराखी रानात गुरे चरायला घेऊन गेले असताना बिबट्याने या दोघांवर हल्ला केला. मांसभक्षक प्राणी बघताच तृणभक्षी बिथरतात. मात्र, खूनशी बिबट्या आपल्या मालकावर मरणाची झेप घेतो आहे, हे पाहून कळपातील एका गाईने बिबट्यावर आक्रमण केले. मालकाच्या अंगावर चाल करून आलेले मरण गायीने शिंगावर घेतले. या अनपेक्षित हल्ल्याने बिबट गोंधळला. कळपातील इतर जनावरांनीसुद्धा जोरजोराने ओरडणे सुरू केल्याने चंपालालच्या दिशेने पूर्ण शक्तिनिशी धावलेला बिबट घाबरला व त्याने माघार घेतली. चंपालालच्या पाठीवर वाघाचा पंजा आदळला होताच. वाघनखांची जखम घेऊनच चंपालालने गावाच्या दिशेने पळ काढला.
गावालगतच्या जंगलात अजूनही बिबट्या लपून बसला असल्याची माहिती मध्यप्रदेश वन विभागाचे हिरालाल विश्‍वकर्मा यांनी दिली. पूनमचंदच्या पायाला चावा घेतल्याने दोन्ही जखमींवर उपचार करण्यात आले… गायीवरून आईची गोष्ट आठवली. आपल्या आईचे काळीज कापून ते घेऊन धावत सुटलेल्या कृतघ्न मुलाला धावता धावता पायाला ठेच लागली तर त्याच्या हातातले त्याच्या आईचे काळीज म्हणाले, ‘‘बेटा फार लागले नाही ना रे!’’ …लाखो गायींची कत्तल देशात सुरू असताना एका गायीने माणसाचे प्राण वाचविल्यावर रात्री उपचार सुरू असताना गाय करुण डोळ्यांनी मूकपणे म्हणाली असेल, फार लागले नाही ना मालक!
बिबट सध्या तापी नदीपलीकडील किनार्‍यावर असून रात्री-बेरात्री धारणीच्या दिशेने येऊ शकतो. सीमेवरील सोनाबल्डी, खार्‍या, दहेन्डा गावांतील नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा धारणीचे वनपरिक्षेत्राधिकारी भुजाडे यांनी दिला आहे. चंपालाल म्हणत असेल रानात बिबट असतील पण आमच्याकडे गाय आहे!  (तभा वृत्तसेवा)