तीन जहाल महिला नक्षल्यांना अटक

0
174

गडचिरोली, २१ एप्रिल 
गडचिरोली व छत्तीसगड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संयुक्त नक्षलविरोधी अभियानादरम्यान संड्रा जंगल परिसरातून तीन जहाल महिला नक्षलींना अटक करण्यात आली.
मैनी ऊर्फ जिमो उंगा लाती (३२) रा. पालनार, ता. जि. बिजापूर (छत्तीसगड), सरिता ऊर्फ मुळे कट्टा मडकाम (२३) रा. कोठमेठ्ठा, पो. भैरमगड, ता. जि. बिजापूर, व पाकली ऊर्फ कारी बुधू गडे (२८) रा. दुप्पाळ परसेगड एरिया ता. जि. बिजापूर अशी अटक करण्यात आलेल्या महिला नक्षलींची नावे आहेत.
छत्तीसगड व गडचिरोली पोलिस संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना संड्रा जंगल परिसरात संशयास्पद हालचाली करून काही महिला पळून जाताना दिसल्या.
पोलिसांनी पाठलाग करून तिन्ही महिलांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. यातील मैनी ऊर्फ जिमो उंगा लाती २००३ पासून संड्रा दलममध्ये कार्यरत आहे. सरिता ऊर्फ मुळे कट्टा मडकाम ही २०१३ पासून संड्रा जंगल परिसरात कार्यरत आहे, तर पाकली ऊर्फ कारी बुधू गडे ही २०१२ पासून संड्रा दलममध्ये कार्यरत आहे.
आतापर्यंत या तिन्ही महिला नक्षलींचा अनेक चकमकींमध्ये सहभाग असून, जाळपोळीच्या घटना, भूसुरुंगस्फोट घडविणे, सामान्य नागरिकांच्या हत्या अशा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाचे भैयाजी कुळसंगे, गंगाराम सिडाम व छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे. (तभा वृत्तसेवा)