‘शकुंतले’साठी मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

0
39

पुलगाव-आर्वी ब्रॉडगेज होणार
• आर्वी-वरूड रेल्वेमार्गासाठीही सर्वेक्षण
वर्धा, २१ एप्रिल 
लोकप्रिय शकुंतला एक्सप्रेस धावत असलेल्या पुलगाव-आर्वी ३५ किमीच्या नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी रेल्वे विभाग आणि राज्य सरकार यांच्यात संयुक्त भागीदारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाचा अर्धा खर्च राज्य सरकार करणार आहेे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यात मुंबई येथे झालेल्या एका बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. यातून वर्धा जिल्ह्याला फार मोठा दिलासा मिळणार आहे. आर्वी-वरूड या ६० किमी लांबीच्या नव्या रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण करून डिसेंबर २०१७ पूर्वी रेल्वे बोर्डाकडे सादर करा, अशाही सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या बैठकीत दिल्या. या सर्वेक्षणाच्या खर्चाची तरतूद केंद्र सरकारने अर्थसंकल्पात केली आहे. या दोन्ही निर्णयांमुळे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुका लाभान्वित होईल. दळणवळणाची साधने वाढणार असल्याने या भागातील अर्थकारणालाही चालना मिळणार आहे. बैठकीला रेल्वे मंत्रालय, राज्य सरकारच्या विविध खात्यांचे सचिव उपस्थित होते.
(तभा वृत्तसेवा)