प्रवासी वाहन प्रकारात मारुती सुझुकी अव्वल

0
79

नवी दिल्ली, २१ एप्रिल 
प्रवासी वाहन प्रकारात आपले स्थान मजबूत करण्यासाठी मारुती सुझुकी प्रयत्नशील आहे. गेल्या आर्थिक वर्षात या प्रकारातील वाहनांच्या विक्रीत कंपनीला चांगले यश मिळाले. २०१६-१७ मध्ये विक्री करण्यात आलेल्या १० प्रवासी वाहन प्रकारात मारुती सुझुकीची ७ मॉडेल्स आहेत. सलग १३ व्या वर्षी कंपनीची अल्टो ही कार सर्वात जास्त विक्री होणारी कार ठरली आहे.
देशात विक्री करण्यात आलेल्या प्रवासी वाहनांची आकडेवारी सियाम या संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आली. २०१५-१६ मध्ये अव्वल १० प्रवासी वाहन प्रकारात मारुतीची ६ मॉडेल्स होती. २०१७ या आर्थिक वर्षात प्रवासी वाहनांच्या ३०,४६,७२७ युनिट्सची विक्री करण्यात आली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये ९.२३ टक्क्यांनी वाढ झाली. यात मारुती सुझुकीच्या १०,७४,९३७ युनिट्सचा समावेश आहे. कंपनीचा या प्रकारात ३५ टक्के वाटा आहे. गेल्या वर्षात कंपनीने एकूण १४,४३,६४१ युनिट्सची विक्री केली होती.
गेल्या आर्थिक वर्षात विक्रीच्या बाबतीत अल्टो कार अव्वल राहिली होती. या कारच्या विक्रीत ८.२७ टक्यांनी घसरण नोंदविण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात २,४१,६३५ युनिट्सची विक्री करण्यात आली. मारुती सुझुकीची वेगन आर दुसर्‍या स्थानी असून १.६४ टक्के वाढीसह १,७२,३४६ युनिट्सची विक्री करण्यात आली.
अव्वल दहा कारमध्ये हयुंदाई कंपनीच्या दोन आणि रेनॉल्टची एक कार आहे. (वृत्तसंस्था)