धोनी फॉर्ममध्ये येण्याची आशा

0
92

पुणे, २१ एप्रिल 
धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणातून सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिल्यानंतर आता रायझिंग पुणे सुपरजायण्ट्‌सचा महेंद्रसिंग धोनी आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकेल आणि शनिवारी गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत तो पुन्हा फॉर्मात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आयपीएलमध्ये आपल्या दुसर्‍या चरणात खेळत असलेला पुणे संघ तीन सामने गमावून गत पाच सामन्यात आतापर्यंत चार गुणांसह तालिकेत सातव्या स्थानावर आहे.
पुणे संघाला लागोपाठ पराभवाचा सामना करावा लागला, परंतु स्टीव्ह स्मिथच्या सवंगड्यांनी गत सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभवाची मालिका खंडित केली आणि संघ आता या लयीला पुन्हा उद्याच्या सामन्यात कायम राखण्यासाठी आसुसलेला राहील. पुणे संघासाठी माजी कर्णधार धोनीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. त्याने आतापर्यंत नाबाद १२, ०५, ११, ५ व २८ धावांची खेळी केली आहे आणि या धावा त्याच्या गतकाळातील धडाकेबाज फलंदाजीच्या प्रतिमेपेक्षा वेगळ्या आहे. क्रिकेटमधला एक सर्वोत्तम फिनिशर म्हणून धोनीची ओळख आहे आणि त्याचा पूर्वीचा संघ चेन्नई सुपरकिंग्जसाठी त्याचे प्रदर्शन नेहमीच महत्त्वपूर्ण ठरले असून, त्यानेच आपल्या नेतृत्वाखाली २०१० व २०११च्या मोसमात आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. म्हणून धोनीने आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परत यावे, अशी रायझिंग पुण्याला अपेक्षा आहे.
पुण्याची फलंदाजी आतापर्यंत कर्णधार स्टीव्ह स्मिथ व अजिंक्य रहाणेवरच अवलंबून राहिली असून ते सर्वाधिक धावा गोळा करणारे खेळाडू आहेत. गत सामन्यानंतर स्मिथने आपल्या पत्नी व मुलांसोबत दुबई दौर्‍यावर जाण्याचा निर्णय घेतला. या ब्रेकमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू ताजेतवाने होऊ इच्छित आहे. कारण त्याचा फॉर्म संघासाठी महत्त्वाचा आहे. (वृत्तसंस्था)