लोकेश राहुलचे खेळणे शंकास्पद

0
108

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी
नवी दिल्ली, २१ एप्रिल 
भारतीय संघाचा सलामी फलंदाज लोकेश राहुल खांद्याच्या दुखापतीमुळे आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणे शंकास्पद आहे. राहुल अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरू शकला नाही आणि चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत तो बरा होणेसुद्धा शंकास्पद आहे. या दुखापतीमुळेच राहुल आयपीएल-१०मधून बाहेर आहे.
एका वृत्त संकेतस्थळावरून राहुलने म्हटले की, माझी प्रतीक्षा करावी लागेल, परंतु सध्या तरी माझी खेळण्याची शक्यता कमी आहे.
अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान राहुलला पहिल्या कसोटीत दुखापत झाली होती. पुण्यात झालेल्या या सामन्यानंतरसुद्धा राहुल दुखापत घेऊनच पूर्ण मालिकेत खेळला. राहुल म्हणाला की, मला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. फलंदाजी करताना दुखापत झाल्याने डॉक्टरसुद्धा चकित झाले आहे. वास्तविक अशा तर्‍हेची दुखापत दोन खेळाडूंची टक्कर झाल्याने होत असते, परंतु ही दुखापत स्टीव्ह ओकीफेच्या गोलंदाजीवर षटकार हाणताना झाली, असेही राहुल म्हणाला.
राहुलकरिता ही मालिका बरीच यशस्वी ठरली होती. त्याने ७ डावात सहा अर्धशतकांसह ३९३ धावा काढल्या होत्या. त्याची सरासरी ६५.५० अशी होती. तो या मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर होता. (वृत्तसंस्था)
भारत खेळणार दोन सराव सामने
नवी दिल्ली, २१ एप्रिल 
गतविजेता भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडमध्ये होणार्‍या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड व बांगलादेशसोबत दोन सराव सामने खेळणार आहे. स्पर्धा १ जून पासून प्रारंभ होणार असून १८ जून रोजी अंतिम सामना होणार आहे. मुख्य सामन्यांपूर्वी प्रत्येक संघ दोन सराव सामने खेळणार आहे. सराव सामन्यांची सुरुवात २६ मे रोजी ऑस्ट्रेलिया व श्रीलंकादरम्यानच्या सामन्याने होईल. भारत २८ मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध ओव्हल येथे पहिला सराव सामना, तर ३० मे रोजी ओव्हल येथेच बांगलादेशविरुद्ध दुसरा सराव सामना खेळेल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी तीन वाजतापासून सुरू होतील. (वृत्तसंस्था)