बीसीसीआय व्यवहारात चोख सचिनलाही सूट नाही!

0
126

नवी दिल्ली, २१ एप्रिल 
सचिनच्या जीवनावरील आगामी चित्रपट ‘सचिन ः ए बिलियन ड्रीम्स’करिता २०० नॉटआऊट प्रॉडक्शन कंपनीने काही व्हिडीओ फुटेज बीसीसीआयला मागितले होते. या व्हिडीओच्या किमतीत काही सवलत हवी होती, परंतु बीसीसीआयने थेट नकार दिला. यावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व्यवहारात किती चोख आहे, हे स्पष्ट होते.
बीसीसीआय सचिनच्या निवृत्तीच्या भाषणाचा त्यांच्याजवळ असलेला ३ मिनिट ५० सेकंदाचा व्हिडीओ निःशुल्क देण्यास तयार आहे, परंतु अन्य फुटेजकरिता त्याला सवलत देण्यास राजी नाही. कारण बीसीसीआयच्या मते या व्हिडीओचा व्यावसायिक वापर होणार आहे.
विश्‍वविक्रमी सामने खेळणार्‍या सचिनचा चित्रपट ‘सचिन ः ए बिलियन ड्रीम्स’ २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सचिनच्या जीवनावर होणारा आतापर्यंतचा हा पहिला चित्रपट आहे.
धोनीनेही चुकते केले एक कोटी!
सवलत नाकारण्याचा प्रकार केवळ सचिनबाबतच घडलेला नाही. कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाकरिता सहनिर्माते अरुण पांडे यांनीही धोनीच्या काही मॅचच्या फुटेजसाठी सुमारे एक कोटी रुपये बीसीसीआयला चुकते केले होते. अरुण व धोनी जिवलग मित्र असूनही त्यांना सवलत मिळाली नाही. धोनीपूर्वी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीलासुद्धा स्वतःच्या फुटेजसाठी बीसीसीआयला पैसे चुकते करावे लागले होते. (वृत्तसंस्था)