वीर सावरकर म्हणजे अंधारात तळपणारी वीज : अमित शाह

अ. भा. सावरकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन

0
93

ठाणे, २१ एप्रिल 
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अंधारात तळपणारी वीज असल्याचे गौरवोद्गार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काढले. २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन ठाण्यात शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती.
सावरकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगून अमित शाह पुढे म्हणाले, सावरकर हे गद्य आणि पद्य अशा दोन्हींमध्ये श्रेष्ठ होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे येणार्‍या पिढ्यांना दिशा दाखवण्याचे काम केले. त्यामुळे त्यांची जे लोक निंदा करतात, त्यांनी एकदा तरी सावरकर वाचवे, म्हणजे त्यांना वस्तुस्थिती कळेल.
शाह यांनी यावेळी आपल्या भाषणात कॉंग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, वीर सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर शंका उपस्थित करणार्‍यांना, भविष्यातील पिढ्या कधीच माफ करणार नाहीत. अटलजींच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने अंदमानमध्ये सावरकर ज्योती सुरू केली. पण, कर्मदरिद्री संपुआ सरकारने ही ज्योती बंद केली. पुन्हा भाजपा सरकार सत्तेत आल्यावर आपण स्वत: ही ज्योत पुन्हा प्रज्वलित केली. सावरकरांच्या नावाने सुरू केलेली ही ज्योत नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे.
सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी या संमेलनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्या पृष्ठभूमीवर अमित शाह म्हणाले की, संपूर्ण भारतीयांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी दिली. त्यासाठी काही करावे लागले नाही. सावरकरांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ते केवळ साहित्यापुरतेच मर्यादित नाहीत. त्यांचे विचार अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांचे विचार संपूर्ण देशाला कळावेत, असे सांगून साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी हे संमेलन केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशातही भरावे, अशी मागणी यावेळी केली. सावरकर
साहित्य संमेलन तीन दिवस चालणार आहे. (वृत्तसंस्था)