विकासाची इच्छाशक्ती कायम ठेवा

0
97

बदल होणारच, एकत्र येऊन काम करा
पंतप्रधानांचा प्रशासकीय अधिकार्‍यांना संदेश
नवी दिल्ली, २१ एप्रिल 
देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्ती माझ्यात अजूनही पूर्वीइतकीच कायम आहे. आपला देश आता बदलणारच आहे, तेव्हा तुम्ही देखील आपली मरगळ झटकून एकत्र या, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिला.
बदलत्या काळानुसार आपल्या कार्यपद्धतीतही बदल करणे आवश्यक असते, असे पंतप्रधानांनी येथे नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले. या कार्यक्रमात उत्तम कामगिरी बजावणार्‍या अधिकार्‍यांना सन्मानित करण्यात आले.
राजकीय इच्छाशक्तीने विकास साधला जाऊ शकतो. ही इच्छाशक्ती माझ्यात अजूनही कायम आहे आणि त्यासाठी मी आणखी पुढे यायला तयार आहो. पण, त्यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. शिवाय, नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
सुरुवातीच्या काळात जनता आरोग्य सेवा पुरविण्यासापासून तर उद्योग उभारणीपर्यंत सरकारवर अवलंबून होती. या सर्वच क्षेत्रांमध्ये सरकारी विभागांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. मात्र गेल्या १५ वर्षांत स्थिती बदलली आहे. आता लोकांकडे पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास लोक खाजगी विमान सेवा किंवा खाजगी आरोग्य सेवांचा वापर करीत आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
पंतप्रधानांनी यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे महत्त्व विशद केले. ई-गव्हर्नन्स, एम-गव्हर्नन्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे यामुळे सोपे आहे. सोयी-सुविधांचे लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविणे आता शक्य झाले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
लोकांच्या आयुष्यात, त्यांच्या दैनंदिन जीवनात बदल घडायला हवा. राजकीय नेतृत्त्वात बदल झाल्यावर धोरणांमध्ये बदल होतात. मात्र हे बदल लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासकीय अधिकार्‍यांचेच असते. सरकारच्या धोरणांमध्ये जनसामान्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण असतो. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासकीय अधिकार्‍यांचे आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकार्‍यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय देशहिताचा असायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.