अरे, हा धर्मनिरपेक्ष देश आहे बाबा!

0
149

चौफेर

लाड पुरवण्याच्या नादात देशाची फाळणी मान्य करणारे लोक मशिदीतील अजानीवरील टीका गुमान मान्य करतील, ही अपेक्षा तशी बावळटपणाची नाही का! सोनू निगम त्याचाच अनुभव घेतोय् सध्या. त्याला वाटलं हा धर्मनिरपेक्ष देश. इथे सर्व धर्मियांना समान संधी असणार. शिवाय जगातील या सर्वात मोठ्या लोकशाही देशात स्वातंत्र्याच्या सात दशकांत व्यक्तिस्वातंत्र्याची परिभाषा अधिक परिपक्व झाली असण्याची शक्यताही निगमच्या मनात डोकावली असणार… त्यामुळेच मनाला वाटले ते त्याने बोलून दाखवले. अगदी स्पष्टपणे.

मुस्लिम नसतानाही सकाळी उठल्याबरोबर मशिदीवरच्या भोंग्यातून कानावर पडणारी अजान मी का म्हणून ऐकायची, हा सोनू निगमांचा सवाल, खरं तर या देशातल्या अनेकांच्या मनातला, पण कित्येकांना पोटशूळ उठवून गेला आहे. एरवी, आपली कथित धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपण्यातच उभी हयात घालविणार्‍या अन् त्यातच धन्यता मानत आलेल्या चित्रपट जगतातील एखाद्या कलावंताने कुणाच्याही ध्यानीमनी नसताना एक दिवस अचानक अजानीवर नोंदविलेला आक्षेप अनेकांच्या भुवया उंचावून गेला. ‘त्याला प्रसिद्धीचं याड लागलं’ इथपासून तर, ‘इतके करूनही तो अरिजीतसिंहांच्या पुढे जाऊ शकणार नाही,’ इथपर्यंतची अफलातून विधाने देशाच्या कानाकोपर्‍यातून प्रतिक्रियेस्वरूपात उमटली. राजकारण्यांपासून तर कलावंतांपर्यंत झाडून सर्वांनी टीकेची झोड उठवली. जणू काय भलामोठा गुन्हाच केल्याच्या थाटात सारेच तुटून पडले बिचार्‍यावर. विरोध अजानला नव्हता. भोंग्यांना असल्याने त्यावर कडवी टीका होणे हा भारतीय समाजाचा ‘सहजभाव’ या प्रकरणी व्यक्त झाला. मग, मंदिरांवरच्या भोंग्यांतून कानावर पडणार्‍या भजनांचे काय, असा प्रतिसवाल काहींच्या श्रीमुखातून उपस्थित झाला. मग काय, अजान कर्कश्श अन् भजनं कर्णमधुर वाटावीत इथे लोकांना? असे बिनबोभाटपणे वाटायला हे काय हिंदुराष्ट्र आहे? अरे, नेहरूंच्या प्रभावात घडलेले निधर्मी राष्ट्र हे. नंतरच्या काळात कॉंग्रेसने ज्याचा कित्ता गिरवला तो धर्मनिरपेक्ष देश हा. धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदूंना झोडपणे केव्हा सुरू झाले अन् मुस्लिमांचे लांगूलचालन केव्हा टिपेला पोहोचले कळलेच नाही कुणाला. त्यामुळे मुस्लिमांच्या विरोधात चकार शब्द काढायचा नाही इथे कोणी! अगदी त्यांनी काश्मिरात रस्त्यावर उतरून आपल्याच सैन्यावर दगडफेक केली तरी त्यांच्याविरुद्ध बोलायचे नाही. त्यांच्यावर कारवाईसुद्धा करायची नाही. त्यांनी लाज काढली आपल्या सैन्याच्या ताकदीची अन् या देशाप्रतीच्या नीच भावनांचे जाहीर प्रदर्शन मांडले, तरी त्यांच्याविरोधात ब्र काढायचा नाही. मुस्लिम आहेत ना ते! मग? त्यांना राग आला तर? आधीच तर कायद्याला भीक घालत नाहीत ते. शिवाय राजकारणात मतं किती महत्त्वाची असतात त्यांची! ते दुखावले तर कसे चालेल? मग आमीर खानला मोदींची सत्ता आल्यापासून हा देश असुरक्षित वाटू लागला, तरी त्याच्या आरत्याच ओवाळायच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली तर त्याचाही जाहीर निषेध करायचा फक्त. जमेल तेवढा जळफळाटच व्यक्त झाला पाहिजे असल्या प्रकरणात.
दहशतवादी मोठ्या प्रमाणात मुस्लिम असले तरी त्याबाबत काही एक बोलायचे नाही, पण दहशतवादाला आसरा देणार्‍या देशातील स्थलांतरितांना प्रवेशबंदी केली म्हणून अमेरिकेवर मात्र त्वेषाने तुटून पडायचे… ‘खान’ आडनाव असल्यामुळे अमेरिकेच्या विमानतळावर शाहरुखची कसून झालेली तपासणी जगभरातील मुस्लिमांना अपमानास्पद वाटू लागते. त्यावरून बावचळलेली मंडळी त्या विषयाला धरून भारतात एखादा चित्रपट काढून मोकळी होते. कारण त्यांच्या लेखी विमानतळावरच्या त्या कडक तपासणीलाही मुस्लिम आयाम असतो. २६/११चा मुंबईवरील हल्ला करणारे कोण होते, हा प्रश्‍न महत्त्वाचा नसतोच त्यांच्या दृष्टीने. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानावरील शहीदांच्या स्मृतीवर लाथा हाणल्यानेही कुणाचेच काही बिघडत नाही इथे. कारण या कथित धर्मनिरपेक्ष देशात मुस्लिमांचे तसले वागणे गृहीतच धरले आहे सर्वांनी. पण अजानवरचा आक्षेप…? छे! तो नाहीच अपेक्षित इथे कोणाला. आक्षेप नोंदवायचा तो हिंदूंच्या सणांवर. वेळेचे बंधन घालायचे ते नवरात्रीच्या गरब्यावर. टीका करायची ती मंदिरांमधून कानावर पडणार्‍या भजनांवर. संगीताच्या साथीने सजलेल्या भजनांच्या सामूहिक स्वरांचा किती त्रास होतो, याचा पाढा वाचला परवा कुणीतरी. पण, बोललं कुणी त्याच्या विरोधात? नाहीतरी, भजनावरची टीका अपेक्षितच असते एखाद्या धर्मनिरपेक्ष देशात. पण, भोंग्यातून ऐकू येणार्‍या अजानीवर टीका? जाहीर आक्षेप? छे! छे! काहीतरीच. एका निधर्मी राष्ट्रात असले कृत्य म्हणजे घोर अपराध. इथे सर्वदूर विखुरलेले कम्युनिस्ट, स्वयंघोषित पुरोगामी, समाजवादी… कुणाला म्हणून कुणालाच मुस्लिमांविरुद्ध असा अपराध केलेला खपत नाही, हे ध्यानात कसे आले नाही सोनू निगमांच्या? अहो! हा मुद्दा म्हणजे राजकारणाचे मूळ आहे त्यांच्या. त्यांना कसे चालेल मशिदींवरच्या भोंग्यांवर अन् त्यावरून कानावर पडणार्‍या अजानीवर कुणी आक्षेप नोंदवलेला?
इतिहास तपासून बघा जरा. अरे! या देशाचे तुकडे झालेलेदेखील मान्य केले इथल्या नेत्यांनी. पण, ते दुखावतील म्हणून मुस्लिमांना ठणकावून विरोध करण्याची हिंमत झाली नाही कुणाची. मूठभर मुस्लिमांनी मागितला अन् यांनी देऊन टाकला! पण, काहीही झालं तरी पाकिस्तानची निर्मिती होणार नाही, असे त्यांना बजावून सांगण्याची गरज कुणालाच वाटली नाही. त्यांचे लाड पुरवण्याच्या नादात देशाची फाळणी मान्य करणारे लोक मशिदीतील अजानीवरील टीका गुमान मान्य करतील, ही अपेक्षा तशी बावळटपणाची नाही का! सोनू निगम त्याचाच अनुभव घेतोय् सध्या. त्याला वाटलं हा धर्मनिरपेक्ष देश. इथे सर्व धर्मियांना समान संधी असणार. शिवाय जगातील या सर्वात मोठ्या लोकशाही देशात स्वातंत्र्याच्या सात दशकांत व्यक्तिस्वातंत्र्याची परिभाषा अधिक परिपक्व झाली असण्याची शक्यताही निगमच्या मनात डोकावली असणार… त्यामुळेच मनाला वाटले ते त्याने बोलून दाखवले. अगदी स्पष्टपणे. या देशातील वातावरण इथे राहण्याजोगे राहिलेले नसल्याची बाब बोलून दाखवताना आमीर खानला जर कवडीची खंत वाटत नाही, तर मग अजानवर आक्षेप नोंदविताना सोनू निगमवर का बंधनं यावीत? पण तसं काही घडलं नाही. प्रगल्भ लोकशाही व्यवस्थेतील परिपक्व व्यक्तिस्वातंत्र्याचा बोध अजूनही दुर्मिळ असल्याच्याच निष्कर्षाप्रत यावे लागत असल्याचे धगधगते वास्तव यानिमित्ताने अधोरेखित झाले. कारण इथे गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात भोंगे वाजविण्याला घातले गेलेले वेळेचे बंधन म्हणजे नियमांचे काटेकोर पालन असते आणि त्याच नियमाच्या पालनाची मशिदीसंदर्भातील मागणी म्हणजे, कुणाच्यातरी धार्मिक स्वातंत्र्याला बाधा ठरते. ‘‘नमाजसाठी अजान आवश्यक आहे, भोंगा नाही,’’ हे अहमद पटेलांचे विधान कानावरूनही जात नाही कुणाच्या. कारण ते राजकीय दृष्टीने सोयीचे नसते कुणाच्याच. पण, निगमांच्या पाठराखणीसाठी मैदानात उतरलेल्या शिवम् रायचा उज्जैनमध्ये मुडदा पाडला गेला तरी निषेधाचा सूर उमटत नाही कुणाच्याच. कसा उमटेल? शिवम् रायचा मृत्यू आड थोडीच येणार आहे इथे कुणाच्या राजकारणात. पण, अजानवर आगपाखड करणार्‍या सोनू निगमवर तुटून पडलं की डाव साधता येतात राजकारणाचे. गणितं जुळवता येतात मग मतांची. खरं तर, सोनू निगमला एव्हाना हे कळायला हवं होतं.
इतक्या वर्षात या देशातल्या राजकारण्यांची आणि त्यांच्या राजकारणाची तर्‍हा ध्यानात आली नसेल, तर मग उपयोग काय त्याचा? तेव्हा सोनू निगम, यापुढे मुस्लिमांविरुद्ध चुकूनही अवाक्षरही काढायचं नाही. मशीद, मशिदीवरचे भोंगे, त्यावरून दिली जाणारी अजान… यांना भारतातील कायदे, नियम लागू होत नाही, ही बाब ध्यानात घ्यावी. ते लागू करण्याची नुसती मागणी केली तरी तो अपराध ठरतो या देशात. असा ‘अपराध’ करणार्‍याला माफी नाहीच! आणि हो! तरीही आपला देश जगाच्या पाठीवरील एक महान, धर्मनिरपेक्ष देश आहे, ही बाब नि:शंकपणे मनाशी बाळगावयास हरकत नाही…!
सुनील कुहीकर ९८८१७१७८३३