चंद्रपुरात परिवर्तन…

0
57

वेध
चंद्रपूर, लातूर आणि परभणी महानगरपालिलांचे निकाल जाहीर झाले असून, चंद्रपुरात भाजपाने कॉंग्रेसला धोबीपछाड देत ३६ जागा जिंकून एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. तिकडे लातूरमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच कॉंग्रेसची मक्तेदारी संपुष्टात आली असून, तेथेदेखील प्रथमच भाजपाचे कमळ फुलले आहे. परभणीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हातून कॉंग्रेसने सत्तेचा घास हिरावून या पक्षाला ‘दे धक्का’ दिला आहे.
चंद्रपूर हा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर या दोघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या दोन्ही नेत्यांनी गेली २५ वर्षे या जिल्ह्याच्या गावागावांत पक्षाची पाळेमुळे बळकट केली, कार्यकत्यार्र्ंची फळी उभी केली आणि मोदी-शाह यांचे ‘वन बूथ, टेन युथ’ हे सूत्रदेखील राबविले. संघटनात्मक दृष्टीने या जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत त्यांनी लोकांच्या समस्यांची सोडवणूकदेखील केली. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेत भाजपाला मिळालेल्या सत्तेचे श्रेय या दोघांना द्यावेच लागेल. एक काळ असा होता की, या भागात भारतीय जनता पक्षाला उमेदवार शोधूनदेखील सापडत नसत! पण ती स्थिती भाजपाने सातत्याने कार्य करीत, विकास कामे ओढून आणत बदलली. विरोधी पक्षात असतानादेखील मुनगंटीवार आणि अहिर शांत बसत नसत. जगप्रसिद्ध कोळसा वाटप घोटाळा अहिरांनीच उघड केला होता. म्हणूनच मतदारांनी भाजपाला एकहाती कौल दिलेला आहे. याउलट कॉंग्रेस गाफील राहिली. शंभर वर्षांचा इतिहास असलेला हा पक्ष अजूनही, सर्वत्र पराभवाची फळे चाखूनदेखील त्यातून धडा घेण्यास तयार नाही. कॉंग्रेसचे जागावाटप अखेरपर्यंत रखडले. यातून अनेकांनी बंडखोरी केली. याचाच फटका त्यांना निवडणुकीत बसला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांनी तर एक काळ गाजवला आहे. पण, आज वय होऊनही ते नेतृत्व युवा पिढीकडे देण्यास तयार नाहीत. यातून विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार आणि त्यांच्यात मनभेद आहेत. त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर झाला नसता तरच नवल. अनेक ठिकाणी पक्षाचे अधिकृत तिकीट मिळूनही उमेदवारांना प्रचारासाठी कार्यकर्ते मिळाले नाहीत. भाजपातर्फे मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय नेत्यांची आणि राज्यस्तरीय नेत्यांची फौज प्रचारासाठी राबत असताना, कॉंग्रेसला तशी कुठलीच मदत मिळाली नाही. एकंदरीत सुसज्ज, संघटित भाजपापुढे दुभंगलेली, दुबळी कॉंग्रेस पराभूत झाली.
जोखडातून मुक्ती!
लातूरमध्ये तर भाजपाने इतिहास घडविला. गेल्या ६५ वर्षांत जे घडू शकले नाही, ते यंदा घडले आणि लातूरकरांची देशमुख घराण्याच्या जोखडातून मुक्तता झाली! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाला गवसलेले धडाडीचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर आणि या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले नागपूरचे आमदार प्रा. अनिल सोले यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित म्हणजे हा विजय आहे. निलंगेकरांनी लावून धरलेला लातूरचा पाण्याचा प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतला आणि रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची अशक्य कोटीतील बाब प्रत्यक्षात आणली, तेव्हाच लातूरकरांनी निवडणुकीत कमळ फुलवण्याचे व त्याच्या प्रत्येक पाकळीची काळजी घेण्याचे मनोमन ठरवून टाकले होते. लोकशाहीत एकदा दिलेले मतदान पाच वर्षांनीच बदलण्याची संधी मिळते. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग घेत त्यांनी हाताचा पंजा बाजूला सारत भाजपाची कमान उंच केली.लातूरमध्ये कॉंग्रेसला पराभूत करणे अवघड होते. कारण तेथे गतवेळी भाजपाला एकही जागा नव्हती. पण, विकासाच्या राजकारणाचा भाजपाने दिलेला मंत्र लातूरकरांना भावला.
भाजपाचा संपर्क वाढत असताना सरंजामी वृत्तीमुळे आमदार अमित देशमुख यांचा कार्यकत्यार्र्ंशी संपर्क तुटत चाललेला होता. लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची पुण्याई नसती, तर आज जेवढ्या जागा कॉंग्रेसला मिळाल्या, तेवढ्यादेखील त्यांच्या वाट्याला आल्या नसत्या! अमित देशमुखांनी प्रचार केला नाही, असे म्हणता येणार नाही. त्यांनी जिवाचे रान केले, पण मतदारांनीच जेव्हा, यंदा भीक घालायचीच नाही, असा निर्धार केला असेल तर तेदेखील काय करणार? त्यांचा नाइलाज झाला. भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत निवडणुकीत साधलेले मौनदेखील कॉंग्रेसच्या अंगलट आले. युवा मतदारांची मते खेचण्यासाठी लहान भाऊ व अभिनेता रितेश देशमुख याची रसद वापरण्याची शक्कल शोधली गेली, पण तीदेखील कामी आली नाही. देशभरातील युवक मोदींवर फिदा असताना लातूरकर युवक मागे कसे राहणार? त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत भाजपाचे कमळ हाती धरले. परभणी महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. येथे कॉंग्रेसचा एकही आमदार नसताना पक्षाने परभणीत मिळविलेले यश नेत्रदीपकच म्हणायला हवे. कॉंग्रेसला जे लातूर, चंद्रपूर आणि राज्यात इतरत्र जमू शकले नाही, ते परभणीत कसे साकार झाले, यावर श्रेष्ठींनी चिंतन करण्याची गरज आहे. परभणीदेखील भाजपाने पिंजून काढली होती. यातून त्यांच्या जागांमध्ये पूर्वीपेक्षा वाढ झाली असली, तरी इतरत्र मिळालेल्या यशापुढे ती थिटी म्हणावी लागेल. शिवसेनेने आपला नगरसेवकांचा आकडा कायम राखला आहे, हीदेखील बातमीच म्हणायला हरकत नाही!
चारुदत्त कहू ९९२२९४६७७४