सद्गतीची चतु:सूरी!

0
84

शतश्‍लोकी

दानं ब्रह्मार्पण यत्क्रियत इहा नृभि: स्यात्क्षमाक्रोधसंज्ञा|
श्रद्धास्तिक्यं च सत्यं सदिति परमत: सेतुसंज्ञं चतुष्कम्‌|
तस्याद्बन्धाय जन्तोरिति चतुर इमान् दानपूर्वेश्‍चतुर्भि:|
तीर्त्वा श्रेयोऽमृतं च श्रयत इह नर: स्वर्गतिं ज्योतिराप्तिम्‌॥
या जगतात मानवाद्वारे केले जाणारे ब्रह्मार्पण (भावनायुक्त) दान, अक्रोधात्मक क्षमा, आस्तिक्य भावनायुक्त श्रद्धा (तथा) ब्रह्मासत्यत्वाचा ठाम विश्‍वास हे चार मोक्षमार्गाचे पूल आहेत. या विपरीत (स्वार्थ, संताप, नास्तिकता आणि देहासक्ती) हे चार जीवांच्या बंधनाची कारणे होत. त्यामुळेच (ज्ञानी, विवेकी) माणूस या चार मार्गांनी तरून कल्याणाचा, अमृताचा, उत्तमगतीचा, चैतन्यस्वरूपाचा अनुभव घेतो.
जगतात सुखेनैव जीवन जगण्याचा राजमार्ग सांगताना पू. आचार्यश्री येथे चार सूत्रांचा विचार मांडत आहेत. दान, अक्रोध, श्रद्धा तथा ब्रह्मसत्यता या चार बाबींना आचार्यश्रींनी जीवन कल्याणाचे साधन रूपात वर्णिले आहे.
हे दोन कसे? तर ब्रह्मार्पण भावनेने केलेले. अन्य दानांनी व्यावहारिक लाभ घडतीलही कदाचित. पण, अंतिम कल्याण असंभव आहे. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी दानाचेही तथा तामस दान स्वरूपाचे प्रकारभेद वर्णिले आहेत. त्या स्वरूपातील दान येथे अपेक्षित नाही. दान हे भगवदार्पण बुद्धीनेच केलेले हवे. त्यात काहीही प्रतिप्राप्तीची अपेक्षाच नसते. अशा ब्रह्मार्पण बुद्धीने युक्त दानास आचार्यश्री प्रथम साधन म्हणत आहेत.
दुसरे साधन आहे क्षमा. पण, ती कशा स्वरूपातील? तर अक्रोधयुक्त असलेली. कारण तीच खरी क्षमा होय. क्षमा हे बलवंताचे भूषण आहे. त्यांच्या क्षमेत दयाबुद्धी असते. बलहीनांची क्षमा विनोदाचे कारण ठरते. ती हत्ती आणि मुंग्यांची कथा नाही का? झाडाला हत्ती घासून गेला. वर दोन मुंग्या होत्या. हत्तीने धक्का दिल्याने एका मुंगीचा तोल गेला. ती हत्तीच्या पाठीवर पडली. झाडावर चिपकलेली मुंगी तिला म्हणते, दाबून टाक त्याला. त्यावर पाठीवर पडलेली मुंगी म्हणते, जाऊ दे गं! माफ करू. तो एकटा आहे. आपण दोघी आहोत. लोक काय म्हणतील? आता ही काय क्षमा थोडीच आहे? अशक्तही क्षमा करतात. पण, त्या क्षमासमयी ते अंतरी संतापाने खदखदत असतात. अशा वेळी त्यांची क्षमा शांती, समाधानाचे कारण नसते, तर ती हतबलतेची परिणती असते. ती क्रोधाचेच कारण ठरते आणि तो क्रोधही त्यासमोरच्याचे नव्हे, तर क्रोधधारीचेच नुकसान करणारा असतो. अशा अक्रोधयुक्त क्षमेला आचार्यश्री द्वितीय सूत्र रूपात वर्णितात.
तिसरे सूत्र आहे श्रद्धा. ही श्रद्धा कशी? तर आस्तिक्य भावनायुक्त. अर्थात ‘परमेश्‍वर आहे’ यावरील आहे रूपश्रद्धा. यात असणे महत्त्वाचे आहे. दिसणे नाही. एकाने एका साधूंना प्रश्‍न विचारला, तुम्ही देव पाहिला का? जर नाही तर विश्‍वास का ठेवता? साधूंनी त्याला अजब उत्तर दिले. ते म्हणाले, तुझ्या भागात रात्री चोर शिरला तर कुत्रे काय करतात? म्हणे सगळे एकदम ओरडतात. साधू म्हणाले, त्या सगळ्याच कुत्र्यांनी चोर पाहिला असतो का? तो म्हणाला नाही. तरी ते का भुंकतात? हा म्हणाला, त्या पहिल्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे हे भुंकतात. मग साधू शांतपणे म्हणाले, जर ते कुत्रे न पाहता इतर कुत्र्यांवर विश्‍वास ठेवू शकतात, तर आपण साधूसंतावर विश्‍वास ठेवायला काय हरकत आहे? ही आहे आस्तिक्य श्रद्धा. भगवान दिसण्याचा नाही असण्याचा विषय आहे. त्याच्या असण्यावरचा विश्‍वास. त्याच्याबद्दल निरपेक्ष बुद्धीने सांगणार्‍या संतांवरचा, ग्रंथांवरचा विश्‍वास, ही आहे आस्तिक्य श्रद्धा. ही तिसरी साधन संपत्ती आहे. आत्मकल्याणाचे तृतीय सूत्र आहे.
चतुर्थ सूत्र आहे परब्रह्म तत्त्वाच्याच सत्यत्वाची ठाम निश्‍चिती. एका परब्रह्माशिवाय अन्य कशाचेही अस्तित्व हे वास्तव नाही. चिरंतन नाही. शाश्‍वत, सनातन नाही, या विश्‍वासासह ही निश्‍चिती अपेक्षित आहे. पर्यायाने केवळ त्या परब्रह्म साक्षात्काराचीच आस ही चौथी सूत्ररचना आहे.
देहाद्वारे दान, मनाद्वारे अक्रोधयुक्त क्षमा, बुद्धीद्वारे आस्तिक्य श्रद्धा आणि आत्मस्वरूपाने ब्रह्मसत्यत्वाचा अनुभव, अशी ही चतुरंग उपासना आहे. क्रमविकास आहे. याचा आरंभ होतो दानापासून. कशाचे दान? आचार्यश्री दानाचा आरंभ अन्नदानापासून करीत आहेत. त्यापूर्वी ते अन्नग्रहण कसे असावे, ते सांगत आहेत. अन्न कशाला म्हणतात, हेच स्पष्ट करीत आहेत. पुढील श्‍लोकात आचार्यश्री अन्ननिरूपण आरंभ करतात.
प्रा. स्वानंद गजानन पुंड