‘१९३०’ नंतर प्रथमच हर्षलचे मेष संक्रमण

0
130

भविष्य

हर्षल ग्रहमालेतील दहावा ग्रह. आपल्या भारतात हा ग्रह ‘प्रजापती’ म्हणून ओळखला जातो. या ग्रहाचा १३ मार्च १७८१ साली विल्यम हर्षल याने शोध लावला.
सूर्यापासून हा ग्रह अत्यंत दूर आहे. तो दुर्बिणीवाचून नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. सूर्याभोवती त्याची प्रदक्षिणा ८४ वर्षांनी पूर्ण होते. म्हणजे एका राशीत हा ग्रह साधारण ७ वर्षे तरी राहतो. हा ग्रह वर्षातून जवळ जवळ सहा महिने ऑगस्ट ते जानेवारी या दरम्यान वक्री असतो. हा ग्रह मेष राशीत १ जून २०२४ पर्यंत राहणार आहे. हर्षल (प्रजापती) हा तमोगुणी ग्रह मानला गेला आहे. मेष ही मंगळाची रास असून, हर्षलचे गुणधर्मही मंगळाच्या स्वभावाशी जमू शकतात. चिडखोरपणा किंवा एखादे अशुभ फळ देण्याकडे किंवा अविचारी कृत्य करण्याकडे याचा कल आढळतो. हा विचित्र व स्वतंत्र स्वभावाचा ग्रह असल्याने कुठल्याही कार्यात, संशोधनात आणि उद्योगातही चौकशी वा चिकित्सा करून नंतरच निर्णय घेण्याची वृत्ती देतो. त्यामुळे मोठमोठ्या संशोधकांच्या कुंडलीत हर्षलला विशेष स्थान व महत्त्व प्राप्त झालेेले आढळते.
हर्षल सुधारणावादी व विक्षिप्त ग्रह असल्याने आचारविचार, रूढी, परंपरा या गोष्टींचा त्याला तिटकारा आहे. सदैव काळाच्या पुढे चालणे अशी त्याची धारणा असते.
स्वातंत्र्य, क्रांती व बदल यासाठी हर्षल महत्त्वाचा ग्रह ठरतो. प्रत्येक व्यक्तीला जीवनात बदल हवा असतो आणि ती व्यक्ती ज्या समाजात राहते, त्यामध्ये त्याला व्यक्तिगत व सामाजिक स्वातंत्र्य हवे असते. काही सुदैवी व्यक्तींना स्वातंत्र्य सहजगत्या लाभते तर इतरांना त्यासाठी झगडावे लागते. त्यासाठी क्रांतिकारक व हुकूमशहा वृत्तीचा हर्षल ग्रह कारणीभूत असतो.
गॅलेलियोने अत्यंत महत्त्वाच्या लावलेल्या शोधामुळे शनीकक्षेपलीकडील ग्रहांचा अभ्यास करणे सुलभ ठरले. टेलिस्कोपच्या शोधामुळे हर्षल ग्रहाचा प्रथम शोध लागून अभ्यास करणे शक्य झाले. सर्व असामान्य, विक्षिप्त व्यक्ती आणि घटना हर्षलच्या अमलाखाली येतात. व्यक्तीच्या मनात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी, प्रखरतेने बंड उभारण्यासाठी तीव्र इच्छा हर्षल निर्माण करतो. परंपरागत चालत आलेल्या गोष्टी झुगारून देऊन हर्षल जीवनात बदल घडवतो. बहुतांशी बदल जुन्या पारंपरिक मतप्रणाली झुगारून देऊन केले जातात. शनीप्रमाणेच हर्षलसुद्धा ज्या स्थानातून, ज्या राशीतून भ्रमण करतो त्यानुसार कायम स्वरूपाचा ठसा ठेवतो. मेदिनीय ज्योतिषाच्या दृष्टीने पाहता देशांच्या पत्रिकेतही ज्या ज्या राशीतून हर्षल भ्रमण करतो त्या विषयी देशामध्ये अकस्मात व नाट्यपूर्ण पद्धतीने नवा इतिहास घडवला जातो. पुढील ७ वर्षे हर्षल मेष राशीतून भ्रमण करणार आहे. इंग्लंड, जपान, सीरिया, पॅलेस्टाईन, जर्मनी, डेन्मार्क हे देश तसेच भारतातील बडोदा (गुजरात), चेन्नई, म्हैसूर ही प्रमुख शहरे मेष राशीच्या अमलाखाली आहेत. या भागात पुढील ७ वर्षांत नक्कीच काहीतरी चमत्कारिक घडामोडी घडतील हे नक्की.
मेष राशीत तीन नक्षत्र येतात. अश्‍विनी, भरणी आणि कृत्तिका. या मेष राशीतले हर्षलचे (प्रजापती) भ्रमण खालीलप्रमाणे या नक्षत्रातून होणार आहे.
अश्‍विनी नक्षत्र ७ एप्रिल २०१७ ते ११ मे २०२०, भरणी नक्षत्र १२ मे २०२० ते ४ एप्रिल २०२४, कृत्तिका नक्षत्र ५ एप्रिल २०१४ ते १ जून २०२४, अशा प्रकारे अश्‍विनी, भरणी, कृत्तिका या नक्षत्रातून अनुक्रमे ३ वर्षे, ४ वर्षे, २ महिने असा हर्षलचा प्रवास राहील.
मेषेत हर्षल १९३० मध्ये यापूर्वी येऊन गेला आहे. ती पिढी आता जवळ जवळ संपुष्टात आली आहे. एवढे मात्र नक्की की, हे भ्रमण देशात क्रांतिकारी बदल घडवणारच.
अश्‍विनी, भरणी हे अनुक्रमे केतू व शुक्राची नक्षत्रे आहेत. त्यातून होणारे हर्षल भ्रमण शुभ फलदायी होईल. मात्र कृत्तिका नक्षत्रातून भ्रमण करणारा हर्षल नेत्रविकार, दृष्टिदोष उत्पन्न करेल. विकृत संतती निर्माण करणे अशी भयानक फळे हा देऊ शकेल.
मेषेतून प्रवास करताना हर्षल समोरील (पत्रिकेतील) तूळ राशीवर अधिक परिणाम साधेल. त्यामुळे ऑक्टोबर १९७३ ते १९८० दरम्यान जन्मलेली तरुण पिढी म्हणजे आता ४३ ते ४५ च्या दरम्यान असलेली पिढी यांच्यावर हा हर्षल चांगले वाईट परिणाम करणारच. ज्यांच्या पत्रिकेत तुळेचा हर्षल, बुध, शुक्र, गुरू मंगळाचे प्रथम दर्जाचे योगात असेल त्यांच्या जीवनात संस्मरणीय शुभ घटना पुढील ५-६ वर्षांत घडणार आहे. मेषेतील हर्षल हा सिंह राशीतील ग्रहांशी व धनू राशीतील ग्रहांशी नवपंचम हा शुभयोग साधणारा आहे. साधारणपणे १९६० ते १९६६ व १९८७ ते १९९४ मध्ये हर्षल हा अनुक्रमे सिंह व धनू राशीत होता त्याचे शुभसंबंधित परिणाम अनुभवास येतील.
मी ज्या आंतरराष्ट्रीय ज्योतिष विश्‍वविद्यापीठाचा ‘कुलगुरू’ आहे त्या ठिकाणी एका अमेरिकन ज्योतिषाने हर्षलसंबंधी पीएच.डी.साठी प्रबंध सादर केला होता. त्यात त्याने सांगितले आहे की, २०१७ नंतर पुढील ७ वर्षांत जन्माला येणारी बालके यांची मानसिक वाढ याकडे लक्ष द्यावे. यासाठी बालकांवर योग्य संस्कार करण्याकडे भर द्यावा. आक्रस्ताळेपणा, आक्रमक आणि रागीट मुली-मुले जन्मतील. आई-वडिलांची सत्वपरीक्षा पाहणारी ठरतील. मुलांवर संस्कार व त्यांना योग्य वळण लावण्यासाठी पालकांना त्यांचा कल पाहून, विचारात घेऊन शिक्षण द्यावे लागेल.
मेषेतील हर्षल हा डोक्यावर, विचारांवर, मनावर परिणाम करणारा असल्याने, मुलांची बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन शैक्षणिक कार्यक्रम राबवावा लागेल. हर्षलच्या मेष राशीतील भ्रमणाच्या काळात वेगळ्या क्षमतेची, वेगळा विचार करणारी, प्रस्थापित गोष्टी बदलवून टाकणारी पिढी निर्माण होणार असल्याने आईवडिलांना त्याबरोबर विद्युतवेगाने स्वत:मध्ये बदल घडवावा लागेल.
मेष राशीतील हर्षल यंत्रयुगावर परिणाम करेल. ‘इनोव्हेशन’ हा पुढील ७ वर्षांचा मूळमंत्र राहणार आहे. संगणक क्षेत्राचा वापर, उत्पादन, यंत्रनिर्मिती व उत्पादन क्षेत्रात काही महत्त्वाच्या सुधारणा हा हर्षल करणार आहे. पूर्वेकडील देशात मोठे नावीन्यपूर्व शोध मानवाला अचंबित करतील. मेष ही मंगळाची रास असल्याने ७ एप्रिल २०१७ पासून गतिमान युगाचा आरंभ झालेला आहे. भारत, चीन जपान व आफ्रिकन देशातील मोठे क्रांतिकारी शोध जगाची विचारसरणी पालटून टाकतील. मेषेचा संबंध मेंदूशी आहे. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर नवीन विचार, नवीन दिशा दर्शविणारी पिढी पुढील ७ वर्षांत जन्माला येईल. वाहन क्षेत्र, दळणवळण क्षेत्र, पर्यटन क्षेत्र यावर दूरगामी चांगले परिणाम दिसून येतात. मोदी सरकारच्या नेत्रदीपक प्रगतीसाठी हा मेषेचा हर्षल हातभार लावणारा ठरणार आहे.
डॉ. अनिल वैद्य ९३७१८३८९५१