झाडीपट्‌टीतील लावणीचा वसंत अन्…

0
86

लोककला

चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हा झाडीपट्‌टीचा प्रांत. लतावेलींनी सजलेला, तलावांनी भिजलेला आणि वैनगंगामाईने पुलकित झालेला प्रदेश आहे. इथं नाटक ग्रीष्मातही बहरते. नाटकातील संविधानकाला विनोदाची फोडणी असल्यामुळे रसिकांत हंशा पिकतो आणि लावणी लवल्यामुळे झाडीरसिकांना आगळी नशा चढते. लावणीचे लावण्य व अनेकपदरी विनोद हा येथील नाट्यशौकिनांचा अधोरेखित भाग आहे.
ललित साहित्यात नाटक हा साहित्यप्रकार दृक्‌श्राव्य कलाप्रकार म्हणून रूढ आहे. रात्रभर फाटक लावून पहाटेपर्यंत नाटक पाहणारा खरा रसिक महाराष्ट्रात फक्त झाडीत सापडतो! या नाट्यपंढरीची वारी झाडीत न्यारी आहे. वडसा (देसाईगंज), नवरगाव, सिंदेवाही, ब्रह्मपुरीत हौशी, व्यावसायिक नाट्यमंडळे शंभराहून अधिक आहेत. एप्रिलच्या उन्हाच्या काहिलीतही इथं नाटक अजूनही चालूच आहेत. नाट्यमंडळे नाटकं करतात अन् झाडीमाणसं नाटकं टक टक पाहतात, हे लोभसवाणं चित्र झाडीचे विशेष दर्शविते.
वसंताच आगमन मनाला हवंहवंसं वाटणारं. वसंत कुणालाही पसंतच येईल असा अविरत मोसम आहे. या फुलांच्या हंगामात झाडीचा माणूस फुलून येणार नाही तर नवलच. नाटक हे त्याच्यासाठी सतीचं वाण आहे आणि त्यातील लावणी ही आण, बाण शान आहे. लावणी म्हणजे शंभर जागी लवणीच! पण या लवणीत नादमयता, रंजकता अन् रगेलता असल्यामुळे ती सरळ रसिकाच्या हृदयात शिरते. लावणी इष्काच्या भात्यातून सुटलेला मदनाचा बाण. लवण म्हणजे सुंदर म्हणून स्त्री सौंदर्यावर रचलेली रचना म्हणजे लावणी, हे अ. ब. कोल्हटकरांचे सांगणे महत्त्वपूर्ण वाटते.
लावणी तशी महाराष्ट्राची ओळख. पेशवाईत हा कलाप्रकार उगवला, फुलला, चालला आणि रुजला. आतातर लावणीचे स्वतंत्र कार्यक्रम व्हायला लागलेत. याच लावणीने पूर्व विदर्भातील नाट्यरंगभूमीला चार चॉंद लावलेत. ती मनोरंजनासाठी आली. वन्समोरसाठी आली. सुरकुतलेला चेहरा प्रसन्न करण्यासाठी आली अन् झाडी रसिकांचं दिल धक धक लवण्यासाठी झाडीनाटकात लवत लवत लावणी आली. या लावणीला इथल्या रसिकाने मेहुणीचे मानपान दिले. ढोलकीच्या तालावर पारू, मैना, चिमना नाचते अन् रमतगमत नाटकांची बंडी रात्रभर चालते. लावणीचा साज आणि बाज, तिचा रंग आणि ढंग नाटकात रंग भरल्याशिवाय राहात नाही. ती मनोरंजन तर करतेच करते, परंतु थकल्या-भागल्या कष्टकर्‍यांच्या मनाला मालिश करण्याचं अन् ते श्रमिक मन ताजतवानं करण्याची मुख्य भूमिका निभावते.
त्याचप्रमाणे विनोद हा झाडीरसिकांचा जीव की प्राण! नाटकाला विनोदाच्या फोडणीशिवाय मजा नाही. हा विनोद अनेकपदरी असतो आणि तो नाटकात हटकून येतो. कधी तो स्वभावनिष्ठ असतो तर कधी प्रसंगनिष्ठ, कधी हास म्हणून तर कधी परिहास म्हणून, केव्हा कोटी तर केव्हा उपकोटी म्हणून असा हा अनेकपदरी विनोद कथानकातील गंभीर प्रसंगानंतर रसिकांना पुन्हा नाटक बघण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहतो. थिएटरमध्ये हंशा पिकवून सर्वांच्या चेहर्‍यांवर लकेर उमटविण्याचे महनीय काम विनोद करतो. त्यामुळेच झाडीतली माणसं रात्रभर नाटक बघायला तग धरतात. दु:खाचे गाठोडे घेऊन सुखाची वाट पाहात बसलेल्या रसिकांची इच्छापूर्ती या निमित्ताने झाल्याचा अनुभव त्यांना आल्याशिवाय राहात नाही.
या लोकरंगभूमीवरील या अनेकपदरी विनोदाने अनेक विनोदवीर लोकप्रिय केले. यात के. आत्माराम, डॉ. परशुराम खुणे, डॉ. शेखर डोंगरे, हिरालाल पेंटर, किसन येरम, नवरगाव येथील सदानंद बोरकरांचा पोपटराव इ. महत्त्वपूर्ण नावे घ्यावे लागतील. या कलावंताच्या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहिलेल्या आहेत. हसूनहसून कंबर कसत नाटक पाहायला हे विनोदवीर रसिकांना भाग पाडतात. विनोदवीरांची देहबोली आणि त्यांच्या वाटचाल भूमिकेतील कायिक, वाचिक, आहार्य, आंगिक अभिनयाची खोली यावर हे विनोदी कलावंत चर्चेचा विषय ठरतात. त्यांना मानपानही मिळतो.
या अनेकपदरी विनोदाच्या अंतरंगात जेव्हा मी जातो, तेव्हा हा विनोद मला माझ्या बापाने उन्हाळ्यात वावराची फोडलेली खवल वाटतो, तर तो कधी बांदीत चालविलेला वखरासारखा किंवा आईने तव्यावर थापलेल्या भाकरीसारखा सुखावह दिसतो. माझ्या माजघरातील जुन्या धानाच्या वखारीसारखा तो कधी असतो, तर तो कधी मला वखारीतील रात्रभर मनसोक्त खेळणार्‍या उंदरासमान भासतो. काहीही असले तरी विनोदाच्या या नानापरीने झाडीनाटकाचे वय वाढविले आहे, हे मात्र मान्य करावे लागेल.
लावणी आणि विनोदपेरणीशिवाय झाडीपट्‌टीच्या नाट्यवस्तूची जोडणी नव्हे. लावणीसाठी जसे रसिकांचे नाटकाकडे धावणे आहे तसेच विनोदासाठीही थिएटरमध्ये रात्रभर पाय रोवून बसणे आहे. हा लोकोत्सव शंभराहून अधिक वर्षांपासून निरंतर सजतो आहे. त्यात लावणीच्या वसंताचा अन् विनोदाच्या फोडणीचा सिंहवाटा नक्कीच राहिला आहे, हेही नसे थोडके!
प्रा. धनराज खानोरकर, ९४२३६१९८१३