साप्ताहिक राशिभविष्य

0
514

रविवार, २३ ते २९ एप्रिल २०१७
सप्ताह विशेष
सोमवार, २४ एप्रिल – सोमप्रदोष, मासिक शिवरात्री, भद्रा (प्रारंभ २४.०२), श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी, संत गोरोबा कुंभार पुण्यतिथी; मंगळवार, २५ एप्रिल – भद्रा (समाप्त १०.३४), अमावास्या (प्रारंभ २१.०६); बुधवार, २६ एप्रिल – दर्श अमावास्या (समाप्त १७.४४); गुरुवार, २७ एप्रिल – संत भानुदास महाराज पुण्यतिथी- सातेफळ (अमरावती); शुक्रवार, २८ एप्रिल – अक्षय्यतृतिया, श्री परशुराम जयंती, साबान (मुस्लिम-८) मासारंभ ; शनिवार, २९ एप्रिल – विनायक चतुर्थी, भद्रा (१७.१५ ते २७.३७), श्री नाथ नंगे महाराज पुण्यतिथी- डव्हा, वाशिम), भगवती स्वामी येवलेकर जन्मोत्सव- टाकळी (नाशिक).
संक्षिप्त मुहूर्त- साखरपुडा- २८ एप्रिल; बारसे- २८ एप्रिल.

मेष- जुन्या संबंधांना उजाळा
एखादे नवे काम हाती घेण्यासाठी सुयोग्य असा हा काळ असणार आहे. जीवनातील रोजची कामें सुखासुखी पार पडत राहणार. त्यात कसलाही अडथळा वा अडचणी संभवत नाहीत. व्यवसायात असणार्‍यांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळावे. लाभ होईल. काही नवीन ओळखी होतील, त्याचप्रमाणे जुन्या संबंधांना नव्याने उजाळा मिळेल. जुने मित्र-मैत्रिणी, परिचित व्यक्ती वगैरेंची अचानक भेट होऊन जुन्या स्मृती दृढ होतील. दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेले एखादे कार्य ओळखीतून अथवा जनसंपर्कातून पूर्ण होऊ शकेल. समाजातील मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्तींचा स्नेह लाभेल. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचे प्रयत्न वेग घेतील.
शुभ दिनांक- २३,२६,२७.
वृषभ- जीवनात चांगल्या संधी
या आठवड्यात विशेषतः राशीस्वामी शुक्र आणि वक्री गुरुचे भ्रमण काही चमत्कार वाटावे असे योग देऊ शकेल. त्यामुळे आपली रास सध्याची सर्वोत्कृष्ट रास ठरू शकेल. या काळात जीवनातील चांगल्या संधी आपल्याला लाभू शकतात. त्यांचे सोने करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावयास हवेत. कारण भाग्यही उजळण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. क्रीडाक्षेत्रात असलेल्यांना मैदानात आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखविता येईल. काहींना व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने प्रवास घडू शकतो. त्यात अपेक्षित कार्यसिद्धी होईल. कुटुंबात मंगल वा धार्मिक कार्य ठरेल. उत्साहाचे व आनंदाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक- २४,२८,२९.
मिथुन- विशेष स्वरूपाचा खर्च
या आठवड्यात आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आलेला पैसा वेगवेगळ्या वाटा शोधून आपणांस खर्च करावयास लावणार आहे. खर्चाला वाटा हजार असे आपण म्हणतो. मात्र त्यासोबतच आपणांस काही विशेष स्वरूपाचा खर्च करावा लागणार आहे. परिवारातील मंगलकार्य, एखादी मोठी खरेदी , मुलांच्या शिक्षणावरील खर्च असे काही विशेष निमित्त समोर येऊ शकतात. यासोबतच पैशाची आवक देखील वाढणार आहे. व्यापार-व्यावसायात काही नवीन गुंतवणूक वा विस्ताराचा कार्यक्रम राबवू शकता. घरात महिला वर्गाच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. काही कार्याच्या निमित्ताने पाहुणेमंडळींचे आगमन व्हावे.
शुभ दिनांक- २३,२४,२५.
कर्क- कष्टाचे चीज होणार
आपल्याला लाभलेले शुभ ग्रहमान पाहता आपला तसेच आपल्या जवळच्या व्यक्तीचा, जोडीदाराचा भाग्योदय व्हावा असे दिसते. आपण आतापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज करणारा हा काळ असू शकतो. परीक्षेच्या निकालांमधून अपेक्षित यश मिळू शकते. उच्च शिक्षणासाठीचे मार्ग प्रशस्त होतील. नोकरी-व्यवसायात वैयक्तिक स्वरूपाचे यश मिळवून सहकार्‍यांकडून प्रशंसा होईल. अधिकारी वर्ग खूश राहील. काहींना पगारवाढ, पदोन्नती यासारखे लाभ मिळू शकतात. सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कामाची दखल घेतली जाईल. एखाद्या संस्थेचे निमंत्रण यावे. मानसन्मान, गौरव प्राप्त होईल.
शुभ दिनांक- २७,२८,२९.
सिंह- खर्च डोईजड होऊ नये
व्यावसायिक आणि कौटुंबिक कामात आपली जबर ओढाताण होण्याचा हा काळ राहील. कामाची भाऊगर्दी राहील. कोणाकडे लक्ष द्यावे याचा गोंधळ उडेल. परिणामी आपली प्रचंड धावपळ व दगदग होणार असली तरी व्यवसाय व कुटंबात आपल्याबाबत असमाधानाची भावना राहील. आर्थिक बाजू सबल राहणार आहे. मात्र पाहुणे मंडळी, मंगलकार्ये यांतील आपला सहभाग व त्यांत आपणांस खर्चाचा काही वाटा उचलावा लागू शकतो. हे सारे करताना खर्च डोईजड होणार नाही याचे भान ठेवावयास हवे. नसत्या लष्कराच्या भाकरी भाजणे नको. आपल्या प्रकृतीला जपावयास हवे. वाहने सावध चालवा.
शुभ दिनांक- २६,२७,२८.
कन्या- चौफेर यश मिळावे
समोर शुक्र आणि राशीत शुभंकर गुरु या योगामुळे आपल्याला हात घालाल तिथे यश मिळू शकेल. दैनंदिन कामात कसलाही उणेपणा येणार वा जाणवणार नाही. आपल्या वा जोडीदाराच्या भाग्योदयामुळे आनंद व उत्साह अनुभवाल. आपले बरेच दिवसापासून सुरू असलेले नोकरी मिळवण्याचे प्रयत्न या काळात पूर्णत्वास जाऊ शकतील, किमान त्या दिशेने काही सकारात्मक हालचाल होताना दिसेल. व्यवसायात मोठ्या फायद्याचे काही करार होऊ शकतात. कुटुंबातील विवाहयोग्य मुला-मुलींचे शुभमंगल ठरावे. नवपरिणितांना अपत्ययोग येऊ शकतो. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक- २४,२५,२८.
तुळ- खर्चामुळे तारेवरची कसरत
या आठवड्यात आपल्याला आवक आणि जावक असा पैशाचा मेळ जमवताना तारेवरची कसरत करावी लागू शकते. विशेषतः महिलांना गृहखर्चाची सांगड घालताना जरा आवडी-निवडीवर बंधने घालावी लागू शकतात. प्रसंगी खर्चाच्या प्राधान्यक्रमात बदल करावा लागू शकतो. हौस-मौजेला मुरड घालावी लागू शकते. सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या नोकरदारांना आपले कसब व क्षमता दाखवून पुढे जाण्याची संधी मिळू शकेल. तिचे वेळीच सोने करावे. प्रलंबित कमे, अडलेला पैसा याकाळात मार्गी लागू शकेल. सामाजिक- धार्मिक कार्यात पुढाकार राहील. कुंटुंबातही अशा कार्यक्रमांचे आयोजन होऊ शकते.
शुभ दिनांक- २३,२६,२७.

वृश्‍चिक- अनुकूल बदल घडणार
सप्तमातून राशीस्वामी मंगळाची दृष्टी लाभल्याने एकूणच ग्रहमान सुलभ झाले आहे. त्यामुळे प्रतिकूल वातावरणातून आपली सहजी सुटका होईल. उलट काही वैशिष्टयपूर्ण योगांमुळे आपल्या दैनंदिन जीवनमानात अनुकूल बदल घडून येऊ शकतील. आधी केलेल्या गुंतवणुकीतून आता उत्तम स्वरूपाचा लाभ होऊ शकतो. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. व्यवसाय विस्तार, व्यवसायात बदल किंवा काही नवी वाढीव गुंतवणूक करावीशी वाटत असल्यास या काळाचा कौल घेता येईल. आवक चांगली होणार असल्यामुळे जीवनमान उंचावेल. कुटुंबासाटी काही विशेष करून दाखवू शकाल. मोेठी खरेदी संभव.
शुभ दिनांक- २७,२८,२९.
धनू- योजलेल्या कामात यश
राशीस्वामी गुरु सध्या वक्री असून तो दशमातून आपणांस मनात योजलेल्या कामात यश देणारा ठरू शकतो. त्यामुळे आपण सर्व लहान-मोठ्या कामात थोडाशा मेहनतीने, काहीशा प्रयत्नाने, युक्तीने सहज मोठे यश मिळवू शकाल. विशेषतः तरुण वर्गाला या गुरुचा नोकरी-व्यवसाय व विवाहादी योगांच्या दृष्टीने चांगला लाभ होऊ शकतो. कुटुंबातील तरुण-तरुणींच्या विवाह विषयक हालचालींना गती प्राप्त होईल. काहींचे योग लवकरच जुळून येऊ शकतात. नोकरीच्या प्रयत्नात असणार्‍यांना सीमोल्लंघन करण्याची तयारी ठेवावी लागू शकते. घरगुती कार्यासाठी काहींना अचानक प्रवासाचा योग संभवतो.
शुभ दिनांक-२३,२६,२७.
मकर- मोठेपणा मिळण्याचे योग
वक्री गुरु सध्या भाग्यस्थानातून अतिशय उत्तम योग देत असल्यामुळे साडेसातीची सुरुवात असूनही तिचा फारसा प्रभाव किमान या काळात जाणवणार नाही. आपण ठरवलेली कामें अपेक्षेनुसार सफल होतील. आपल्या योजनांमध्ये यश मिळावे. कुटुंबातील सदस्यांचे प्रश्‍नही आपणांस कौशल्याने मार्गी लावता येवून त्यांनाही समाधान मिळवून देता येऊ शकेल. सामाजिक मान-सन्मान, कुटुंबात मोठेपणा मिळण्याचे योग संभवतात. काहींना विविध कार्यक्रम वा समारंभाची बोलावणे येऊन त्यांचा मान वाढू शकतो. आपल्या नोकरी-व्यावसायात यश व समाधानाचे एक पर्व सुरू व्हावे. थोडक्यात कष्टांचे चीज होऊन समाधान लाभेल.
शुभ दिनांक- २४,२७,२८.
कुंभ-आत्मविश्‍वास वाढविण्याची गरज
सध्या मिळत असलेल्या उत्तमोत्तम संधी अशाच कायम मिळत रहाव्या असे वाटत असेल तर आत्मविश्‍वास वाढविण्याची गरज आहे. सध्या राशीस्वामी शनि वक्री होऊन लाभात आला आहे. तो काहीसा विलंब करीत असून आपणाकडून मेहनतीची अपेक्षा बाळगून आहे. त्यामुळे प्रबळ विश्‍वासाने केलेल्या कामांना यश मिळणारच. आपली कामे सफल होऊ लागतील. व्यवसायातील कामकाज, खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत होताना दिसतील. नोकरी-व्यवसायात कोणतेही नवे धाडस करावयाचा मोह सध्या आवरला पाहिजे. चतुर्थातील मंगळ आपणांस जमीन-जुमल्याच्या व्यवहारात मोठे यश देऊ शकतो.
शुभ दिनांक- २३,२६,२८.
मीन- खर्चीक राहणीमान आवरा
राशीस्थानी असलेला उच्चीचा खुषमिजाज शुक्र आणि त्याला उसकावणारा सप्तमातील गुरु पाहता सध्या आपण मौज-मजा-चैन करण्याच्या मनस्थितीत आहात. पैशाची आवक सुरळीत आहे. तीत खंड पडावयाचा नाही. जावक मात्र किती असावी हे आपल्यालाच ठरवायचे आहे. आपले राहणीमान खर्चिक होत चालले आहे, मात्र मौज-मस्तीत आपले अंदाजपत्रक बिगडू नये याची काळजी घ्यायला हवी. व्यसनांच्या आहारी जाऊ नये. अनावश्यक खर्चास कात्री लावता आली तर बरे. मित्रमंडळीत आपली लोकप्रियता वाढेल, मात्र त्यातील खरे-खोटेपणा जाणून घेतला पाहिजे. प्रकृतीकडेही लक्ष द्यायला हवे.
शुभ दिनांक- २४,२५,२६.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६