रुग्णांना जेनेरिक औषधेच लिहून द्यावीत, तीही सुवाच्च अक्षरात

0
70

एमसीआयचे नवे परिपत्रक जारी
नवी दिल्ली, २३ एप्रिल 
रुग्णांना बाहेरून आणायची औषधे लिहून देताना ब्रँडेड नावे न लिहिता औषधांची फक्त जेनेरिक नावेच लिहून द्यावीत आणि औषधांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन ) सुवाच्य अक्षरात लिहावी, असे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) देशभरातील सर्व डॉक्टरांना सांगितले असून, याचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करण्याची तंबी दिली आहे. या संदर्भात एमसीआयने या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देणारे नवे परिपत्रक जारी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनच दिवसांपूर्वी सूरतमध्ये एका इस्पितळाचे उद्घाटन करताना डॉक्टरांनी जेनेरिक औषधे द्यावीत यासाठी सरकार कडक नियम करेल, असे सूतोवाच केले होते. डॉक्टर ‘गिचमिड’ अक्षरात जे लिहून देतात ते रुग्णांना वाचता येत नाही; परिणामी खाजगी मेडिकल स्टोअर्समधून गरिबांच्या हाती महागडी ब्रँडेड औषधे सोपविली जातात, असेही पंतप्रधानांनी सांगितले होते.
मोदींचा हा इशारा लक्षात घेऊन डॉक्टरी व्यवसायाचे नियमन करणार्‍या मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया या शीर्षस्थ संस्थेने यासंदर्भात गेल्या वर्षी दिलेल्या निर्देशांचे स्मरण देत नवे परिपत्रक जारी केले आहे.
गेल्या वर्षी मेडिकल कौन्सिलने डॉक्टरांसाठी आचारसंहितेमधील कलम १.५ मध्ये सुधारणा करून डॉक्टरांनी ब्रँडेड औषधांऐवजी फक्त जेनेरिक औषधेच लिहून देणे बंधनकारक केले होते. कौन्सिलकडे नोंदणी केलेल्या देशभरातील सर्व डॉक्टरांनी याचे कसोशीने पालन करावे, असे नवे परिपत्रक सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना, सर्व सार्वजनिक इस्पितळांच्या संचालकांना व सर्व राज्यांच्या मेडिकल कौन्सिलच्या अध्यक्षांना पाठविण्यात आले आहे.
डॉक्टरांनी तर्कसंगत औषधे लिहून द्यावीत व निष्कारण अव्वाच्या सव्वा औषधे लिहून देण्याचे टाळावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)