अन्ननलिकेत अडकलेली पिन शस्त्रक्रियेद्वारे काढली

0
47

– १३ वर्षीय अफगाण मुलीवरील संकट टळले
– दिल्लीतील डॉक्टरांची किमया
नवी दिल्ली, २३ एप्रिल 
अफगाणिस्तानातल्या एका १३ वर्षांच्या मुलीने बुरखा घालताना तोंडात पकडलेली पिन चुकून गिळली. ही पिन तिच्या अन्ननलिकेत जाऊन फसली. अफगाणिस्तानच्या डॉक्टरांनी हात टेकल्यावर या मुलीच्या पालकांनी थेट दिल्ली गाठली. दिल्लीतल्या डॉक्टरांनी ही अवघड शस्त्रक्रिया करून पिन बाहेर काढली. त्यासाठी या मुलीच्या नाकातून एक सूक्ष्म कॅमेरा फुफ्फुसात सोडण्यात आला!
एका डॉक्टरांनी सांगितले, ‘अशा अनेक केसेस विशेषत: लहान मुलांच्या केसेस येत असतात. मुले नाणी किंवा असेच काहीही गिळतात, तेव्हा बहुतांश वेळी ती वस्तू पोटात जाते आणि मलाद्वारे आपोआप पडूनही जाते. पण जर वस्तू टोकदार असेल तर ती श्‍वास किंवा अन्ननलिकेतून फुफ्फुसात जाऊन अडकते. अशा वेळी आतून रक्तस्रावही होण्याची शक्यता असते, म्हणून तातडीचे उपाय योजायला हवेत.’
दक्षिण दिल्लीतल्या व्हीपीएस रॉकलँड रुग्णालयात या मुलीवर उपचार करणार्‍या डॉ. अरुणकुमार गिरी यांनी सांगितले, ‘पिन काढायला सुमारे एक तास लागला. डाव्या बाजूच्या फुफ्फुसाच्या धमनीत जाऊन अडकली होती. परिणामी फुफ्फुसात रक्तस्राव सुरू झाला होता. आम्ही रुग्णाच्या नाकातून एक कॅमेरा आत सोडला. कॅमेर्‍याच्या मदतीने एका विशिष्ट अवजाराने पिन बाहेर काढली.’
पिन काढल्यानंतर दोन दिवसांनी मुलीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की ‘शाळेत बुरखा नीट करताना चुकून तिने पिन गिळली. त्रास सुरू झाल्यावर शाळेने तिला स्थानिक रुग्णालयात नेले. तिथे एक्स-रे काढल्यावर फुफ्फुसात काहीतरी अडकल्याचे कळले.’ मुलीच्या पालकांनी तिला आपत्कालीन मेडिकल व्हिसा करून दिल्लीला आणले. या मुलीला प्रवासात काही झाले नाही, हा एक़ चमत्कारच आहे, असे तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले. (वृत्तसंस्था)