योगी पावन मनाचा

0
119

प्रासंगिक
तलाक दिलेल्या महिलांना सर्वांनीच वार्‍यावर सोडले होते. पण, आता त्यांच्यासाठी आश्रम बांधण्यात येणार आहेत. त्यांच्या निवासाची, जेवणाची मोफत सोय होणार आहे. त्यांची मुले शिक्षणात मागे राहू नयेत म्हणून, त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली आहेत.

प्रबळ इच्छाशक्ती, सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष मनोवृत्ती, अनासक्त, निरपेक्ष, निःस्वार्थी, निर्भीड, संन्यस्त जीवनाचा, गोरगरिबांच्या चरणी त्यागमय समर्पण, दीन-दुबळ्यांप्रती संवेदनशीलता, सहृदयता, समता, बंधुता, मानवता व माणुसकीच्या अद्वितीय जीवनमूल्यांचा उपासक, ‘सबका साथ सबका विकास’ या सिद्ध साध्य मंत्राच्या, तंत्राच्या प्रभावावर चमत्कार नव्हे, तर प्रत्यक्ष काय साक्षात्कार घडवू शकतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे योगी आदित्यनाथ! अवघ्या एक महिन्यापूर्वी महाकाय, अनेकविध समस्यांनी, अराजकतेने ग्रासलेल्या उत्तरप्रदेशाच्या सत्तेची सूत्रे योगी आदित्यनाथ यांच्याकडे दैवयोगाने आली. सर्वांच्या भुवया आश्‍चर्याने उंचावल्या. पण, क्षणार्धात हा कट्टर हिंदुत्ववादी, कर्मवादी झाला. धर्मनिरपेक्षतेचा निष्ठावान साधक झाला.
न्याय, स्वातंत्र्य, जातिधर्म, परंपरा, भेदरहित, समानता, बंधुत्व या भारतीय संविधानाने आदर्श मानलेल्या मूल्यांवर समाजकल्याण व राज्य विकासाच्या अविरत कामाला लागला. केवळ सत्तांतर नव्हे, तर एका उज्ज्वल लोकाभिमुख समाजक्रांतीचा जो श्रीगणेशा केला तो भारतीय लोकशाहीच्या इतिहासात स्पृहणीय अभिनंदनीय व अनुकरणीय आहे. सत्ता ही काही मोजक्या वंशाची, परिवाराची, घराणेशाहीची भोग्य वारसदारी नसून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी उभी केलेली आव्हानात्मक स्वायत्तता आहे. याची प्रचीती आजमितीला उत्तरप्रदेशात क्षणाक्षणाला जाणवत आहे. अन्न, वस्त्र, निवारा, स्वास्थ्य, शिक्षण, सुरक्षितता, संरक्षण, इतर दैनंदिन, प्राथमिक सोयीसुविधा पुरवून जनतेचे जीवन सुखदायी, स्पृहणीय व गतिमान करणार्‍या लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या सूत्रावर सर्वसमावेशक समाजरचनेला प्राधान्य, प्राथमिकता देण्यात आली. बहुजन समाजवादी, समाजवादी पक्षाच्या सत्तास्वार्थ संपत्तीच्या प्रलोभनाने प्रदीर्घ काळापासून उत्तरप्रदेशात अस्तित्वात असलेल्या जाती-जमातीच्या भेदभावाचे तुष्टीकरणाच्या राजकारणाला व सत्ताकारणाला पूर्णविराम दिला. अनागोंदी, भ्रष्टाचारी, जातीयवादी, राजकारण, समाजकारणावर मुख्यमंत्री योगींचा हा उतारा निश्‍चितच स्वागतार्ह व कौतुकास्पद आहे.
अवघ्या एक महिन्यातील या आमूलाग्र समाजव्यवस्था परिवर्तनाने जनता सुखावली आहे. त्यांच्यात ‘अच्छे दिन’चा आत्मविश्‍वास बळावला आहे. गोरगरिबांना, कामगार, कष्टकरी, शेतकरीवर्गाला अवघ्या तीन रुपयांत न्याहारी व पाच रुपयांत जेवण देण्याच्या अभिनव उपक्रमाने मुख्यमंत्र्यांनी अनंत उपकार केले आहे. पोटाला घास व राहण्याला निवास ही आजच्या समाजाची नितांत गरज आहे. घराघरातून, गावागावातून १८ ते २४ तास वीजपुरवठा देण्याचा संकल्प गरिबांचे भाग्य उजळून काढणारा आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणात विजेची चोरी थांबविण्याचा, वीज खात्याची कार्यक्षमता वाढविण्याचा, वीज संचालनातील होणारा अपव्यय थांबविण्याचा निर्धार सरकारने हाती घेतला आहे. सत्ताधार्‍यांशी लागेबांधे असलेल्या खाजगी शिक्षणसम्राटांची शिक्षणक्षेत्रातील मनमानी, मक्तेदारी व अतोनात लूट, भरमसाट फी आकारणीला प्रतिबंध घालून सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा खर्चात शिक्षणाची सोय म्हणजे मुख्यमंत्री योगींनी साक्षरतेच्या दृष्टीने उचललेले पुरोगामी सकारात्मक पाऊल आहे. सरकारी डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिसवर निर्बंध व ऍम्बुलन्सची सोय म्हणजे सर्वसामान्यांच्या स्वास्थ्यासाठी केलेला हा सहृदयात्मक भगीरथ प्रयत्न आहे.
युद्धपातळीवर रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश देऊन धोकारहित, सुखद दळणवळणाची व्यवस्था जनतेला प्रदान केली आहे. गलथान, सुस्तावलेल्या प्रशासनात नवचैतन्य निर्माण केले आहे. भ्रष्टाचारमुक्त, प्रामाणिक, पारदर्शक, प्रशासकीय सुविधा जनतेला बहाल करण्याच्या दृष्टीने विधायक पाऊल उचलले आहे. शिस्त, नियमितपणा व जनतेच्या कामाप्रती संवेदनशीलता ही प्रशासकीय सुधारणा निश्‍चितच कौतुकास्पद आहे. मुस्लिम महिलांच्या तीन तलाकच्या असामाजिक प्रथेचा विरोध करून त्यांना न्याय देण्याचा संकल्प महिलाजगताला स्वागतार्ह ठरला आहे. तलाक दिलेल्या मुस्लिम महिलांना आर्थिक सुरक्षिततेचे कवच देऊन सामाजिक प्रतिष्ठा उपलब्ध करून देणाची भाजपा सरकारची विचारधारा योजना स्वागतार्ह आहे. तलाक दिलेल्या महिलांना सर्वांनीच वार्‍यावर सोडले होते. पण, आता त्यांच्यासाठी आश्रम बांधण्यात येणार आहेत. त्यांच्या निवासाची, जेवणाची मोफत सोय होणार आहे. त्यांची मुले शिक्षणात मागे राहू नयेत म्हणून, त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली आहेत. आतापर्यंतच्या सरकारला हे करता आले असते. पण, केवळ तोंडी कळवळा तेवढा दाखवायचा, हेच तत्व त्यांचे राहिले. पण, योगींनी याकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्यांना जगण्याचा नवा आधार दिला. ढोंगी पुरोगाम्यांची तोंडे बंद केली. महिला, विद्यार्थिनींना संरक्षण व सुरक्षिततेच्या दृष्टीने रोड रोमिओंच्या विरोधातील एल्गार निश्‍चित अभिनंदनीय आहे. शेतकर्‍यांच्या गव्हाची व बटाट्याची निर्धारित भावात सरकारी खरेदी ही शेतकर्‍यांना आर्थिक संरक्षण देणारी, खुल्या बाजारातील शेतकर्‍यांचे आर्थिक शोषण मोडीत काढणारी, शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती भक्कम करणारी व शेतकर्‍यांना ‘अच्छे दिन’च्या दिशेने योगीजींनी ‘जनहिताय जनसुखाय’ घेतलेले निर्णय म्हणजे समाजातील सर्व घटकांना, आबालवृद्धांना, महिलांना सुखी-समृद्ध, सहजीवनाचा शासकीय परवानाच म्हणावा लागेल.
या लोकाभिमुख निर्णयामुळे उत्तरप्रदेशाची वाटचाल अराजकतेकडून उत्तम प्रदेशाच्या दिशेने होत असल्याचे हे पुरोगामी संकेत आहेत, असे भाजपाच्या ध्येयधोरणातून प्रकर्षाने जाणवत आहे. उत्तरप्रदेश तसा आर्थिकदृष्ट्या मागासलेला प्रदेश असतानादेखील, भाजपा सरकारने शेतकर्‍यांची केलेली ३८ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ही सरकारच्या संवेदनशीलतेचे, शेतकर्‍यांप्रतीच्या आत्मीयतेचे द्योतक आहे. हा आर्थिक भार जनतेवर न लादता तो प्रशासकीय काटकसरीतून पूर्ण करण्याचा योगीजींचा मनोदय त्यांच्या निर्भीडतेचा, समयसूचकतेचा, पुरोगामी विचारांची साक्ष देणारा आहे.
सर्वेऽपि सुखीना सन्तु, सर्वे सन्तु निरामया|
सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्‍चित् दुःख माप्नुयात॥
या सर्वव्यापक, महामंगल, सुखी, समृद्ध निर्भीड सामाजिक सहजीवन तत्त्वज्ञानाचा साक्षात्कार भाजपाच्या ध्येयधोरणातून ओतप्रोत दिसत आहे. एकहाती सत्ता असल्यामुळे उत्तरप्रदेशचा विकास दौडत आहे. समाजवादी पक्षाच्या स्वार्थी व जातिनिहाय समाजकारण व राजकारणाचा अंत होऊ पाहत आहे. स. पा.च्या सत्ताकाळातील तथाकथित सर्व लोकाभिमुख योजनांचा परामर्श घेऊन त्यातील सर्वसमावेशकता शोधण्याचा, त्यात जनहिताय जनसुखाय आमूलाग्र फेरबदल करण्याचा योगीजींचा निर्णय निश्‍चितच स्वागतार्ह आहे. लोकशाही म्हणजे लोकांनीच स्वतःसाठी स्वतःच प्रस्थापित केलेले सुराज्य, या संकल्पनेला दुजोरा देणारे, मजबूत करणारे आहे.
समाजजीवनातील सर्व अंगाचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक पुनरुज्जीवन, राष्ट्रधर्म व राष्ट्रीय अस्मितेचे संवर्धन हे भारतीय लोकशाहीत अभिप्रेत आहे. राजकीय स्वार्थापायी तसे परिवर्तन न झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. जातिवाद व तुष्टीकरणाला उधाण आले आहे. नव्हे, तो राजकारणाचा, सत्ताकारणाचा अधिकृत पाया झाला आहे. भारतीयांची मते भिन्न असू शकतात. परंतु, अंतिम ध्येय जनकल्याण व राज्याचा सर्वांगीण विकास हेच असायला हवे. एका उत्तम वैभवशाली राज्याची निर्मिती, हा योगीजींचा ध्यास, कटिबद्धता निश्‍चितच स्पृहणीय आहे, यात शंकाच नाही.
योगी पावन मनाचा| करी उद्धार सकल जनाचा॥
दिगंबर शं. पांडे
९४०३३४३२३९