उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून सचिंद्र प्रतापसिंह पुरस्कृत

0
173

यवतमाळ, २३ एप्रिल 
येथील जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांना नागरी सेवा दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे शानदार सोहळ्यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या दोन वर्षात त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कामांची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
सह्याद्री अतिथीगृह येथे पुरस्कार वितरणाचा हा सोहळा पार पडला. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय आदी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या वतीने नागरी सेवा दिनी दरवर्षी उत्कृष्ट काम करणार्‍या जिल्हाधिकार्‍यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. यावर्षी यवतमाळचे सचिंद्र प्रतापसिंह यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.
मे २०१५ मध्ये जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासनात शिस्त आणण्यासोबतच जिल्हा यंत्रणा प्रचंड गतिमान केली. सामान्य नागरिकांची कामे कुठेही अडणार नाहीत, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्याचे चांगले परिणाम गेल्या काही दिवसात दिसून आले.
सिंह यांच्या कार्यकाळात गेल्या दोन वर्षांत आतापर्यंतचे सर्वाधिक पीककर्ज वाटप झाले. जिल्ह्याच्या रब्बी क्षेत्रात दुप्पट वाढ झाली. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये जवळजवळ चाळीस टक्क्यांनी घट झाली. ई-डिस्ट्रिक्ट योजनेंतर्गत जिल्हा राज्यात सर्वाधिक ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण करणारा जिल्हा ठरला. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. रेल्वे भूसंपादनाची कार्यवाही गतीने झाली. बोरी-तुळजापूर महामार्ग बांधकामाच्या निविदाही जिल्हा प्रशासनाच्या जलद भूसंपादनाने प्रसिद्ध झाल्या आहे.
या विविध कामांची दखल घेत यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांना हा पुरस्कार देण्यात आला.
(तभा वृत्तसेवा)