अनुवादक, दुभाषींची कमतरता हिंदी विद्यापीठाने दूर करावी

0
117

•-परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मत
– अरबी आणि रूसी भाषा सुरू करण्यावर एकमत
वर्धा, २३ एप्रिल
परराष्ट्र मंत्रालयाला हिंदी माध्यमातून विदेशी भाषा अवगत असणारे अनुवादक, दुभाषी आणि भाषांतरकारांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. ही आवश्यकता वर्धेतील हिंदी विश्‍वविद्यालयाने पूर्ण करावी, असे मत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले.
दिल्लीत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीला विश्‍वविद्यालयातील विदेशी भाषांचे प्राध्यापक आणि आठ विद्यार्थी तसेच मंत्रालयातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुषमा स्वराज यांच्याशी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. गिरीश्‍वर मिश्र यांनी चर्चा केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
चर्चेत विश्‍वविद्यालयात अरबी आणि रूसी भाषांचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. कुलगुरू प्रा. गिरीश्‍वर मिश्र यांनी विदेशी भाषा चिनी, फ्रेंच, स्पॅनिश आणि जपानी भाषा विश्‍वविद्यालयात शिकविण्यात येत असून आणखी विदेशी भाषा सुरू करण्यात येतील, असे सांगून विश्‍वविद्यालयात हिंदी शिकण्यासाठी अनेक राष्ट्रातील विद्यार्थी येताहेत, ही बाबही निदर्शनास आणून देत त्यासाठी आवश्यक सुविधा आणि मनुष्यबळ पुरविण्याची मागणी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली. यावर स्वराज यांनी मदतीचे आश्‍वासन कुलगुरूंना दिले. या बैठकीला अतिरिक्त विदेश सचिव एस. जयशंकर, संयुक्त सचिव राकेश वैष्णव यांच्यासह विदेशी भाषातज्ज्ञ तसेच महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयातील चिनी
भाषेचे प्रा. अनिर्बाण घोष, जपानीचे सन्मती जैन, फ्रेंचचे संदीप कुमार व रिंजत कुमार, पीयूष गाड़े, श्रद्धा गजभिये, वंदना रामटेके, प्रयाग माने, कपिल मुंजेवार, दर्शना धाबलिया, दिव्या गुप्ता हे आठ विद्यार्थी उपस्थित होते. (तभा वृत्तसेवा)