अवैध दारू वाहतूक करणारे वाहन सरकारजमा

0
130

राज्यातील पहिलीच कारवाई
गडचिरोली, २३ एप्रिल 
अवैधरीत्या दारू वाहतुकीसाठी वाहन वापरल्यामुळे चंद्रकुमार मनोहर गुंडावार यांच्या मालकीचे हुंडाई कंपनीचे चारचाकी वाहन सरकारजमा करण्याचे आदेश २२ एप्रिलला देण्यात आले.
चंद्रकुमार मनोहर गुंडावार यांनी ११ डिसेंबर २०१६ ला आपल्या स्वत:च्या मालकीचे चारचाकी वाहन (क्र. एमएच ०१ जीए ५८७४) अरविंद भांडेकर या इसमास अवैधरीत्या दारू वाहतुकीसाठी दिले. सदर वाहनाने अरविंद भांडेकर, महेश सोनवणे, निखिल गेडाम, शाहू सदावर्ती यांनी उमरेड येथून गाडीत दारू भरून गडचिरोलीकडे आणत असताना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश सिरसाठ व सहकारी कर्मचार्‍यांनी गडचिरोली नजीकच्या गोगाव फाट्यावर नाकाबंदी करून तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीत दारूच्या दोन बॅग आढळल्या.
सदर मुद्देमाल व चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केली.
या प्रकरणी पोलिस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सतीश सिरसाठ यांनी सहायक सरकारी अभियोक्ता लीना गजभिये यांचा, सदर वाहन सरकारजमा करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये प्राधिकृत अधिकारी अप्पर पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या कार्यालयात पाठविला व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये राज्य शासनाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली.
लेखी पुराव्याच्या आधारे चंद्रकुमार गुंडावार यांच्या मालकीचे हुंडाई कंपनीचे चारचाकी वाहन सरकारजमा ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे. (तभा वृत्तसेवा