खरीप हंगामासाठी ६० हजार मेट्रिक टन खत!

0
176

जिपच्या कृषी विभागाचे नियोजन
गोंदिया, २३ एप्रिल 
जिल्ह्यातील शेतकर्‍यांची खतासाठी भटकंती होऊ नये, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून जि.प.च्या कृषी विभागाकडून खताचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मुबलक खत मिळत आहे.
यंदाही खरीप हंगामासाठी जि.प. च्या कृषी विभागामार्फत शासनाकडे खताची मागणी करण्यात आली असता शासनाकडून जिल्ह्याकरिता ६० हजार मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. शिवाय जिल्ह्यातील आठही तालुक्यात मुबलक प्रमाणात खत रहावे, यासाठी जिल्हा परिषदेकडून नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे.
गोंदिया भातपिकाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. धान पिकासह जिल्ह्यात फळबागायती व भाजीपाला शेतीसुद्धा केली जाते. जिल्ह्यात लहान-मोठे जवळपास अडीच लाखाहून अधिक शेतकरी आहेत. खरीप हंगामात जवळपास १ लाख ९० हजार क्षेत्राखाली पीक घेतले जाते. पिकासाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खताच्या तुटवड्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात भटकंती होते. तसेच खत विक्रेत्यांकडून शेतकर्‍यांची पिळवणूक होते. अनेक शेतकर्‍यांना नजिकच्या जिल्ह्यातून खरीप हंगामाच्या दिवसांत रासायनिक खत आणावे लागते. वेळप्रसंगी कृषी संचालक अवाच्यासवा किंमतीने खताची विक्री करतात.
यावर्षी अशी स्थिती जिल्ह्यात उद्‌भवू नये म्हणून कृषी विभागाच्यावतीने रासायनिक खताचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान यंदाच्या खरीप हंगामासाठी एकूण ६० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये युरीया खत ३० हजार मेट्रिक टन, डीएपी ३ हजार मेट्रिक टन, एमओपी ७२५ मेट्रिक टन, एसएसपी १२ हजार २०० मेट्रिक टन व १४ हजार ७५ संयुक्त मेट्रिक टन खताचा समावेश आहे.
मंजूर झालेल्या खताच्या साठ्यापैकी यंदाच्या खरीप हंगामासाठी रासायनिक खताचा तुटवडा कोणत्याही तालुक्यात जाणवू नये याचेदेखील नियोजन केले आहे. यामध्ये आमगाव तालुक्याकरिता ६९३३ मेट्रिक टन, देवरी ६२२९ मेट्रिक टन, गोंदिया १३,४७७ मेट्रिक टन, गोरेगाव ५५६० मेट्रिक टन, अर्जुनी-मोर ७५५२ मेट्रिक टन, सडक अर्जुनी ६८७२ मेट्रिक टन तर  तिरोडा तालुक्यासाठी ८०८७ मेट्रिक टन याप्रमाणे एकूण ६० हजार मेट्रिक टन रासायनिक खताचे नियोजन जि.प.च्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा निश्‍चितपणे खताचा मुबलक साठा राहणार असून शेतकर्‍यांची खतासाठी भटकंती होणार नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले (तभा वृत्तसेवा)