पक्षविस्तारासाठी आज अमित शाह नक्षलबाडीत

0
46

दीनदयाल उपाध्याय योजनेचा आज शुभारंभ
नवी दिल्ली, २४ एप्रिल 
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उद्या मंगळवारी बंगालमधील नक्षलबाडी येथे देशव्यापी दीनदयाल उपाध्याय विस्तार योजनेचा शुभारंभ करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आणि भाजपाचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांनी आज दिली.
नक्षलबाडी येथे बुथ क्रमांक ९३ मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, अमित शाह या योजनेचा शुभारंभ करताना बंगालमधील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सबका साथ सबका विकास’सह गरिबांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचाही संदेश देणार असल्याचे भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगण्यात आले.
बंगालमध्ये भाजपा आणि संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांना डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हिंसाचाराचा सातत्याने सामना करावा लागतो. यात अनेकांना आपल्या प्राणालाही मुकावे लागले आहे. याच अनुषंगाने संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे, हा संदेश देऊन, कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले.
ज्या राज्यात भाजपाचे काम कमी आहे, त्या राज्यात भाजपाचे काम वाढविण्यासाठी दीनदयाल उपाध्याय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अमित शाह १५ दिवसांचा वेळ देत, बंगाल, ओडिशा, लक्षद्वीप, तेलंगणा आणि गुजरातमध्ये आयोजित बुथ स्तराच्या बैठकीत सहभागी होतील व कार्यकर्त्यांना पक्षाच्या विस्तार योजनेत सहभागी होण्याचा आदर्श आपल्या कृतीतून घालून देणार असल्याचे इराणी यांनी सांगितले.
तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतही भाजपा पक्ष विस्तारावर भर देणार असल्याचे त्या म्हणाल्या. दीनदयाल उपाध्याय विस्तार योजनेत सहभागी होण्यासाठी ३.६८ लाख कार्यकर्त्यांनी आपल्या नावाची नोंदणी पक्षाकडे केली असल्याचे स्मृती इराणी यांनी अतिशय अभिमानाने सांगितले. हे कार्यकर्ते पक्षाच्या विस्तारासाठी आपला १५ दिवसांचा पूर्ण वेळ देणार आहे. त्याच प्रमाणे चार हजार कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विस्तारासाठी सहा महिन्यांचा वेळ देण्याची तयारी दर्शविली आहे, याकडेही इराणी यांनी लक्ष वेधले. या काळात पक्षाचा विस्तार करताना हे कार्यकर्ते मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनाही जनतेपर्यंत पोहोचविणार असल्याचे त्या म्हणाल्या. (तभा वृत्तसेवा)