रेणुका

0
356

जिजी ही माझ्या आईची आई. मेहकर-सेंदुर्जन इलाख्यात तिच्या चांगलेपणाची जाणीव होती. ती मेली कशी, त्याचीही कहाणी चित्तथरारक आहे. तिने आग्रहाने सर्वच्या सर्व नातेवाईकांना बोलावून घेतले. चांगले खाऊपिऊ घातले. माझे वडील निरोप घ्यायला गेले तर ती म्हणाली, ‘‘उद्या जा!’’ दुपारच्या वेळी सर्वांना बोलावून घेतले. आपल्या अवताली-भवताली उभे केले. सगळ्यांचा निरोप घेतला. म्हणाली, ‘‘मी आता समाधानाने गमन करीत आहे.’’ हात जोडून तिने तीन वेळा ‘श्रीरामा’च्या नावाचा उच्चार केला मोठ्याने आणि तिचे प्राणोत्क्रमण झाले!! सर्वदूर तिच्या या समाधानी इच्छामरणाच्या भक्तिभावपूर्वक चर्चा झाल्या.

कुठून तरी कोणी आले आणि म्हणाले, ‘‘रेणुका आईचा मुखवटा बसवायचा आहे. तर जिजीच्या चेहर्‍याचा बसवला तर चालेल का!!’’ माझी चूक होत नसेल तर बसवलाही! पण, तेव्हापासून माझ्या चित्तात रेणुका ही आई म्हणूनच ठसली आहे. मात्र; तिची कहाणी मला मुळीच आवडत नसे. थरकाप होऊन जाई, जिवाचा! तरीही माझी माय मेल्यावर भारतमाता आणि रेणुकामाता या माझ्या अंतराळात जन्मदात्र्या आईचे स्थान धारण करू जात आहेत!!

रेणुका म्हणजे रेणुक राजाची कन्या. प्रजेत सुख-शांती-समाधान नांदावे म्हणून त्याने यज्ञ केला. तसेच झाले; शिवाय, त्यासोबत अग्नीमधून त्याला एका दैवी कन्येचाही लाभ झाला. या चुणचुणीत मुलीने आपल्या वडिलांना परमसंतोष दिला. पुढे, राजकन्या रेणुका वयात आल्यावर राजाने, आपले गुरू अगस्त्य मुनी यांच्या सूचनेनुसार; रेणुकेचा विवाह जमदग्नीशी लावून दिला. जमदग्नीने आपल्या कठोरतम तपश्‍चर्येने देवांना प्रसन्न करून घेतले होते. जमदग्नी म्हणजे अगदी ‘जमदग्नीचाच अवतार’ होते!! एवढ्या तेवढ्याला संतापत. येता जाता, ऊठसूट, शाप बीप देत. त्यांच्या शाप देण्याच्या कपॅसिटीमुळे ‘मी मी’ म्हणणारे सुद्धा त्यांना केवळ टरकूनच असत, असे नाही; तर, भयगंडाने थरकापून असत! त्यामुळे त्यांच्या आज्ञा ऐकणे कोणी टाळत नसत. जमदग्नीचा आश्रम बेळगाव जिल्ह्यातल्या रामशृंग शिखरावर होता. पंच-पंच-उष:काली उठून, मलप्रभेत स्नानादी कर्मे करून रेणुका आपल्या पतीच्या पूजाअर्चेची तयारी करून देत असे! रेणुकेच्या सात्त्विकतेचे सामर्थ्य असे की, ती रोज वाळूचा कुंभ करीत असे. जिवंत सर्पाची चुंबळ करून ती त्यावर घट ठेवीत असे. त्या बिनभाजल्या माठातून आपल्या पतीच्या रिच्युअल्ससाठी पाणी आणीत असे. वस्तुत:, या शालीनपणाने पराक्रमी असलेल्या; सात्त्विकतेची पराकोटी पावलेल्या देवीस तिच्या पतीने भ्यायलाच हवे होते!! पण, नाही!-एक दिवस तिला यायला जरासा उशीर झाला तर जमदग्नीच्या चित्ताचा भडका उडाला.

जमदग्नीने तिचा वध करण्याचे आपल्या थोरल्या पुत्रास फर्मावले!! पित्याची आज्ञा पाळणे आणि माता, ही चिरंतन वंद्य असते; या दोन मूल्यांतले एक त्याने तडकाफडकी निवडले. त्याने मातेच्या वधास नकार दिला. एका कटाक्षात जमदग्नीने त्यास जाळून भस्म करून टाकले!! रेणुका शोक करू लागली. तिच्या रुदनाकडे जमदग्नीने पाऽर दुर्लक्ष केले. दुसरा पुत्र म्हणाला, ‘‘मातृवधासारखी नृशंस आणि निंदनीय घटना जगात दुसरी कोणतीच नाही. मी थोरल्याप्रमाणे जळून खाक झालो तरी चालेल. पण, मी आईस मारणार नाही!’’ एका कटाक्षाने जमदग्नीने अग्नी दिला!! तिसर्‍या पुत्राचीही तशीच कथा झाली. त्याच्या वाग्जल्पाची परिणती त्याच्या कटाक्षदहनात झाली. ‘‘मृत्यू ही जीवनातली अटळ आणि अपरिहार्य घटना आहे. तथापि, कोणी-कुठे-कसे मरावे, हे ठरविण्याचा मुळातच आपल्याला अधिकार नाही.’’ चौथा म्हणाला, ‘‘मिस नियतीच्या मनांत काय आहे ते मला हुडकता येणार नाही. तथापि, पित्याकडून पुत्राचा वध झालेला चालतो; पुत्राकडून मातेचा वध कालत्रयीही होऊ नये!!’’ चौथ्याही पुत्रास जमदग्नीने असेच जाळून टाकले! रेणुकेच्या समक्ष तिच्या पतीने तिचे चार पुत्र जाळून भस्म केले. तिच्या विलापाने अवघे त्रिभुवन झाकोळून गेले.

पाचवा पुत्र परशुराम तेथे उपस्थित नव्हता. तो येऊन जेव्हा पोहोचला तेव्हा त्याचा आपल्या नजरेवरच विश्‍वास बसेना. त्याच्या बापाचा संताप अद्यापही थंडावला नव्हता. त्यास एवढेच कळले की, आपल्या चारही भावांचा आपल्या बापाने वध केलेला आहे!! जमदग्नीला प्रश्‍न विचारण्याची परमात्मा विष्णूच्या या सहाव्या अवताराचीसुद्धा प्राज्ञा नव्हती! आता तर भविष्य स्पष्ट होते. आपल्या मातेचा आक्रोश कशामुळे, ते त्यास कळले! रेणुका देखील आपल्या या पाचव्या पुत्राकडे अशी पाहात होती की, जणू ती एक असा मनुष्यमात्र पाहात आहे की, याची पुढल्या क्षणी राखरांगोळी होणार आहे! आपल्या पतीने आपल्यास निपुत्रिक करण्याचा कट का तडीस नेण्याचा प्रयत्न केला आहे, असा विचार तिच्या मनात उद्भवला असेल!

धरणीवरल्या आपल्या आक्रोशाने सारे आकाश कोंदाटून टाकणार्‍या आपल्या मातेला परशुराम विषण्णपणे पाहात राहिला. जमदग्नी म्हणाला, ‘‘मार आपल्या मातेस!’’ परशुरामाने आपला परशू उपसला आणि आपली माता रेणुका हिचा तडकाफडकी वध केला. जमदग्नी खुष झाला. ‘‘मुला, तुला हवा तो वर तू मागून घे! तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे!’’ परशुरामाने त्वरित म्हटले की, ‘‘माझ्या मातेला जिवंत करा! माझ्या चारही भावंडांना जिवंत करा.’’  जमदग्नीने रेणुकेस व परशुरामाच्या चारही भावांना जिवंत केले.

जमदग्नी इतका शिकला-सवरलेला होता. बुद्धिमान होता. पण, कोपीष्टपणामुळे बुद्धी वाया गेली! नुसती प्रज्ञा असून भागत नाही. तिचा उपयोग कसा करावा, याची प्रतिभा असावी लागते. ती चाणक्यापाशी, शिवाजी महाराजांपाशी आणि आईन्स्टाईनपाशी होती. आपल्या घरात साक्षात आदिशक्ती आहे, हे जमदग्नीस कळले नाही. जमदग्नीला हे कळलेच नाही की, ती जर जगन्माता असेल तर तो स्वत: परमात्मतत्त्व आहे! जसे ग. दि. माडगूळकरांना आयुष्यभरात कधी कळलेच नाही की, ते स्वत: ‘कुरूप वेडे पिल्लू’ म्हणजे ‘राजहंस’ आहेत!! जमदग्नीस हे कळावयास हवे होते की, ‘रेणू’ म्हणजे परमाणू; लहानात लहान कण! विश्‍वाची उत्पत्ती झाली ती प्रायमिव्हल ऍटॉमिक न्यूक्लियसमधून; म्हणजे आदिम परमाणू केंद्रातून!! सबब, रेणू म्हणजे जगन्माता! हिच्यापासून फक्त श्रीविष्णूचा सहावा अवतार परशुरामच नव्हे, तर अलम विश्‍व निर्माण झाले आहे!!

डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे