छोटा राजनला सात वर्षांचा कारावास

0
66

तीन निवृत्त कर्मचार्‍यांनाही शिक्षा
बनावट पासपोर्ट प्रकरण
नवी दिल्ली, २५ एप्रिल
बनावट पासपोर्ट प्रकरणात दोषी आढळून आलेला अंडरवर्ल्डचा कुख्यात गँगस्टर छोटा राजन आणि तीन निवृत्त सरकारी अधिकार्‍यांना येथील विशेष न्यायालयाने आज मंगळवारी सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
विशेष न्या. वीरेंद्र कुमार गोयल यांच्या न्यायालयाने सोमवारी या राजन आणि अन्य तिघांना या प्रकरणात दोषी ठरविले होते. कायद्यातील ज्या कलमांचा वापर त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे, त्यात किमान जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.
न्यायालयाने राजनसोबतच त्याला बनावट पासपोर्ट तयार करण्यात मदत करणार्‍या निवृत्त सरकारी अधिकारी जयश्री दत्तात्रय राहाटे, दीपक नटवरलाल शाह आणि ललिता लक्ष्मणन् यांनाही सात वर्षांचा कारावास ठोठावला. सोबतच सर्व दोषींना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
या प्रकरणी गेल्या वर्षी ८ जूनला छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजेसह पासपोर्ट अधिकारी जयश्री राहाटे, दीपक शहा आणि ललिता लक्ष्मणन् यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. या सर्वांवर फसवणूक, खोटी स्वाक्षरी करणे आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, छोटा राजनने या तिघांच्या मदतीने १९९९ मध्ये बंगळुरूमधून मोहन कुमार या बोगस नावाने पासपोर्ट मिळविला होता. छोटा राजनवर खंडणी, मादक द्रव्यांची तस्करी आणि हत्येचे एकूण ८५ गुन्हे दाखल आहेत. २५ ऑक्टोबर २०१५ मध्ये राजनला इंडोनेशियाच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला भारताकडे सोपविण्यात आले होते.