चिंतागुफा, सुकमातले नक्षली तांडव

0
79

प्रासंगिक
या घटनेतील तीनशेवर नक्षली जमिनी मार्गानेच आले असता इंटेलिजन्स एजन्सींना व स्थानिक पोलिसांना याची खबर का मिळू शकली नाही, हा प्रश्‍नदेखील अनुत्तरितच आहे.
सोमवार, २४ एप्रिल २०१७ ला दुपारी १ च्या सुमारास अंदाजे ३०० नक्षल्यांनी परत एकदा सेंट्रल रिझर्व्ह पोलिसांच्या (सीआरपीएफ) ७४ व्या बटालियनच्या एका रोड ओपनिंग कंपनीवर घात लावून गनिमी हल्ला केला. या हल्ल्यात २६ जवान शहीद आणि ४० च्या वर गंभीर जखमी झाले.
ही ताजी घटना छत्तीसगड राज्यातील सुकमाच्या चिंतागुफाजवळील जंगलात घडली. एवढ्या मोठ्या संख्येत नक्षली एकत्र झाले तरी कोणत्याही गुप्तवार्ता विभागाला याचा सुगावा लागू नये, हे फेल्युअर जबाबदार आहे असं म्हटल्यास ते वावगं नसेल. नक्षल्यांचे नेटवर्क त्यापेक्षा चांगवे दिसते. नक्षल्यांच्या सांप्रत रणनीतीनुसारच हा हल्ला झाला. छत्तीसगड, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, बंगाल आणि मध्यप्रदेशच्या ४४ नक्षल प्रभावी जिल्ह्यांमध्ये ५४१२ किलोमीटर्स सडक निर्माण परियोजनेला मोदी सरकारने मंजुरी दिली असली तरी विकासविरोधी नक्षली त्या इलाक्यातील पक्क्या सडक बांधणीच्या विरोधात आहेत. कारण, सडक तयार झाली तर त्या भागात विकास सुरू होईल आणि त्यामुळे स्थानिकांचा नक्षल्यांवरील विश्‍वास उडून आणि त्यांची पत कमी होऊन नक्षली संघटनेला (नेटवर्क) मोठा धक्का लागेल.
ही एक असमतोल चकमक होती. नक्षली सीआरपीएफच्या तिप्पट संख्येत होते आणि त्यांना स्थानिकांची मदत (लोकल सपोर्ट) होती. स्थानिकांचा उपयोग नक्षल्यांनी मानवी ढालीच्या (ह्युमन शिल्ड) रूपात केल्यामुळे सीआरपीएफ जवानांना जपून, काळजीपूर्वक जबाबी फायर करावा लागला. एका जखमी सीआरपीएफ अधिकार्‍यानुसार, ‘‘आम्ही निडरतेने नक्षल्यांचा सामना केला आणि अनेक नक्षल्यांना मारले. मात्र ज्याप्रमाणे नक्षली तैनात (डिप्लॉय) झालेत त्यावरून हे लक्षात येते की, स्थानिकांनी नक्षली हत्यारे रात्री गाव किंवा शेतात लपवून सकाळी नक्षली आपल्या घात करण्याच्या जागी पोहोचायच्या आधी त्यांना दिले असावेत. दुर्दैवाची गोष्ट ही की, या इलाक्याची खडान्‌खडा माहिती असणारी छत्तीसगडची स्थानिक पोलिस यंत्रणा आमची अजिबात मदत करत नाही. आम्हाला विना मदत अशा ऑपरेशन्समध्ये झोकल्या जाते.
प्रत्येक सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्थानिक पोलिसांची पोलिस चौकी असावी आणि त्यांनी आम्हाला इलाक्याची माहिती देऊन मदत करावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे अनेकदा केली असली तरी त्यावर कोणीच काहीच कारवाई करत नाहीत. प्रत्येक अँबुशनंतर याच मागण्या करण्यात येतात. प्रत्येक वेळी होकार मिळतो, पण अंतत: काहीच निष्कर्ष निघत नाही. ऑपरेशनच्या वेळी, ना स्थानिक, ग्रामीण ना स्थानिक पोलिस आमच्या मदतीला येतात.’’ हा ताजा हल्ला दलाई लामांच्या अरुणाचल भेटीमुळे संतापलेल्या चीनच्या चिथावणीने झाला असणार. २४ एप्रिल १७ ची घातकी कारवाई नक्षली कमांडर हिदमा याने तडीस नेली. परत एकदा रेड कॉरिडॉर लढाईमधील सीआरपीएफ व पोलिस दलांच्या कार्यप्रणालीमधल्या त्रुटी आणि असफलता उजागर झाली. अधिकार्‍यांची अकर्मण्यता ते जवानांची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरकडे (एसओपी) डोळेझाक या सर्व बहुचर्चित त्रुटीमुळे परत एकदा २६ जवानांना हकनाक आपले प्राण गमवावे लागले आहेत. पण प्रशासन व सुरक्षादल मात्र मागील घटनांपासून कुठलाही बोध न घेता, खालील त्रुटींना दूर न करताच पुढे वाटचाल करताहेत.
१) या वेळी जवानांवरील हल्ला ते माध्यान्ह भोजन करत असताना झाला. मिळालेल्या माहितीनुसार जवान दोन मोठ्या ग्रुप्समध्ये खाली बसून एकत्र भोजन करत होते. खरं तर भोजन करताना त्यांनी चार किंवा पाच जवानांचा एक याप्रमाणे लहान ग्रुप्स बनवून प्रत्येक ग्रुपसाठी एक जवानाला त्यांच्या रक्षणासाठी हत्यारबंद तैनात करायला पाहिजे होत. याला पाळीपाळीने अन्न ग्रहण अशी संज्ञा आहे. या क्षेत्रात मार्च करताना दोन जवानांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावं लागतं. जेव्हा एक कॉलम कूच करतो त्या वेळी एक क्विक रिस्पॉंस टीम (क्यूआरटी) त्यांच्या बरोबर असावी लागते. मात्र चिंतागुफामध्ये याची वानवा होती असे वाटते.
२) कमांडंट (सीओ) ते प्लाटून कमांडरस्तरीय सीआरपीएफ अधिकार्‍यांच्या सामरिक नेतृत्वाबद्दल संरक्षणतज्ज्ञ असमाधानी आहेत. एसओपीचे सदैव उल्लंघन, अधिकार्‍यांचा कमकुवतपणा जाहीर करते. जवानांना एकत्र बसू भोजन करू देणार्‍या, क्यूआरटी बरोबर न ठेवणार्‍या किंवा नक्षलबहुल क्षेत्रात स्वत: बेसावध राहात आणि जवानांनी सावधानता अंगीकारावी असा आग्रह न धरणार्‍या सीआरपीएफ अधिकार्‍यांबद्दल काय बोलावे, असा प्रश्‍न पडतो. एक मोठी चूक यात सरकारचीदेखील आहे. मागील जवळपास ५० दिवस डायरेक्टर जनरल सीआरपीफच्या पदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. अशा प्रशासकीय हलगर्जीपणामुळे फोर्सच्या मनोबलावर नि:संशय गंभीर परिणाम झाला असणार.
३) सर्वच नक्षलप्रभावी राज्यांमध्ये राज्य पोलिस दल आणि सीआरपीएफ/इतर अर्ध सैनिक बल यांच्यात समन्वयाचा संपूर्णत: अभाव दिसून पडतो आणि याला प्रामुख्याने प्रशासन जबाबदार आहे. सुकमाच्या या ताज्या हल्ल्यातील एका लघुस्तरीय अधिकार्‍याची वर उल्लेखित याचना याची ग्वाही देते. या समन्वयाअभावी नक्षल्यांची कुरघोडी सुरक्षादलांना नेहमी सहन करावी लागते. अशा ऑपरेशन्समध्ये राज्य पोलिस दल आणि त्यांच्या अधिकार्‍यांनी अग्रस्थानी असायला हवे. तेही होत नाही. नक्षलविरोधी लढा केवळ केंद्र सरकारचीच जबाबदारी नसून हे अभियान, अर्ध सैनिकदल, पोलिस व राज्य प्रशासनाची एकत्र कारवाई व त्यांच्यातील सर्वंकष समन्वयानेच साध्य होऊ शकते.
४) सीआरपीएफ नक्षलविरोधी लढा व गनिमी युद्धासाठी उपयुक्त आहे का, हा संरक्षणतज्ज्ञांना छळणारा दुसरा मोठा प्रश्‍न आहे. सीआरपीएफच्या अतुल्य, कोब्रा कमांडो बटालियन गनिमी युद्धात प्रवीण आहेत. बस्तरमधील नक्षली लढ्यासाठी त्या एकदम फिट आहेत. मात्र १२ लाखाच्या सीआरपीएफमध्ये केवळ सहा कोब्रा बटालियन्स सांप्रत नक्षलविरोधी अभियानात बस्तरमध्ये तैनात आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे सी सिक्स्टी आणि आंध्र प्रदेशच्या ग्रे हाऊंडसारखे तगडे नक्षलविरोधी कमांडो ग्रुप छत्तीसगडने आपल्या पोलिसांमधून का तयार केले नाहीत, हा एक अनुत्तरित प्रश्‍न आहे.
५) छत्तीसगडमधील ४६५ पोलिस स्टेशन्सपैकी ४०३ अस्तित्वात आहेत. त्यापैकी १७८ कडे एकही स्वयंचलित गाडी नाही. अर्ध्यापेक्षा जास्त पोलिस स्टेशन्समध्ये रेडिओ सेट नाहीत. नक्षलप्रभावी बहुतांश पोलिस स्टेशनमध्ये अर्ध्यापेक्षा कमी पोलिसांची उपस्थिती दिसून येते. कारण लोक तेथे जात नाहीत. महाराष्ट्रात गडचिरोली व गोंदियामध्ये हीच परिस्थिती आहे. या क्षेत्रात पोलिसांची इंटेलिजन्स सिस्टीम अतिशय कमजोर आहे. या घटनेतील तीनशेवर नक्षली जमिनी मार्गानेच आले असता इंटेलिजस एजन्सींना व स्थानिक पोलिसांना याची खबर का मिळू शकली नाही, हा प्रश्‍नदेखील अनुत्तरितच आहे.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सीआरपीएफला सर्वतोपरी साहाय्य करण्याची ग्वाही देत नक्षलविरोधी अभियान प्रणालीत संपूर्णत: बदलाची घोषणा केली. आता कोणाचीही पर्वा न करता नक्षल्यांचा नायनाट करण्याची ही नांदी आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये हे बदल होतील, असेही त्यांनी सांगितले. येत्या ८ मे रोजी दिल्लीत नक्षलप्रभावी दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे, त्यात यावर चर्चा होईल. आता या वेळी तरी सरकार काही ठोस उपाय करेल की परत ये रे माझ्या मागल्याचीच री ओढल्या जाईल हे पाहणे महत्त्वाचे असेल.
कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)
९४२२१४९८७६